ग्राहक म्हणून काय आहेत तुमचे अधिकार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



१५ मार्च म्हणजे 'जागतिक ग्राहक हक्क दिन'... यानिमित्ताने जाणून घेऊया काय आहेत ग्राहकांचे हक्क? फसवणूक झाल्यास कशी कराल कारवाई? आणि इतर अशा गोष्टी ज्या 'जागरूक ग्राहक' म्हणून जाणून घेऊयात...


जागतिक ग्राहक हक्क दिनाची सुरुवात ५७ वर्षांपूर्वी म्हणजेच १५ मार्च १९६२ रोजी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी औपचारिकपणे 'ग्राहक हक्क' यासंदर्भात संकल्पना सादर केली होती. ते पहिले जागतिक नेते होते, ज्यांनी हा मुद्दा जगासमोर मांडला.

 

काही मूलभूत हक्क जे केनेडींनी जगासमोर मांडले होते...

 

१. सुरक्षिततेचा हक्क : ग्राहकांच्या आरोग्याला अथवा जीवाला अपायकारक उत्पादने, उत्पादन प्रक्रिया, सेवा यांच्या पासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.

 

२. माहितीचा हक्क : वस्तु व सेवांची डोळसपणे निवड करण्यासाठी आवश्यक असलेली व पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क आहे. तसेच, जाहिरात, वस्तूवरील लेबल, वेष्टण याद्वारे किंवा अन्य मार्गांनी दिलेली माहिती चुकीची, किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्यापासून संरक्षण मिळण्याचा हक्क.

 

३. निवड करण्याच्या हक्क : विविध वस्तु/सेवा स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध असण्याचा व त्यातून आपल्या पसंतीप्रमाणे निवड करण्याचा हक्क आहे. ज्या उद्योगांमध्ये स्पर्धा शक्य नसेल आणि शासनाचे नियंत्रण लागू असेल तेथे वस्तू/सेवा यांचा समाधानकारक दर्जा आणि रास्त दर यांची हमी असणे आवश्यक आहे.

 

४. मत ऐकले जाण्याचा हक्क : ग्राहकांवर परिणाम करणारी आर्थिक व इतर धोरणे ठरवताना व उत्पादनविषयक निर्णय घेताना ग्राहकांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक व साकल्याने विचार केला जाण्याचा हक्क आहे. ग्राहक हिताचे प्रतिनिधीत्व करण्याचा हक्क यात अंतर्भूत आहे.

 

५. ग्राहक शिक्षणाचा हक्क : ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये यांची जाणीव ठेऊन वस्तू व सेवांची आत्मविश्वासाने आणि काळजीपूर्वक निवड करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य मिळवण्याचा हक्क आहे.

 

६. तक्रार निवारणाचा हक्क : तक्रार उद्भवल्यावर ग्राहकाच्या न्याय्य मागणीचे योग्य प्रकारे निवारण होण्याचा हक्क आहे. तसेच, सदोष वस्तु/सेवा यांमुळे ग्राहकाचे नुकसान झाल्यास ग्राहकाला त्याबद्दल भरपाई मिळण्याचा हक्क आहे.

 

७. आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क : मानवी जीवनाचा दर्जाउंचावणारे आरोग्यदायी पर्यावरण मिळण्याचा हक्क आहे. प्रदुषणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. या हक्काच्या संरक्षणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा तसेच वाहने, कारखाने यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम केलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावरही निर्बंध आहेत.

 

वरीलपैकी पहिल्या सहा हक्कांचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश केलेला आहे.

 

जागो ग्राहक जागो

 

ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jagograhakjago.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ग्राहकांचे अधिकार, तक्रार आणि इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. या वेबसाईटवर कोणत्याही कंपनीची तक्रार करणे सोपे होणार आहे. तरी टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करता येऊ शकते. आपल्या तक्रारीची स्थितीही ग्राहक वेबसाईटद्वारे ट्रॅक करु शकतात. लवकरच प्रादेशिक भाषांमध्ये हेल्पलाईन सुरु केली जाणार असल्याचीही माहिती आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@