भारतीय तोफखान्यात ‘धनुष’ दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



‘धनुष’ तोफ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय लष्कराच्या तोफखाना दलात दाखल झाली आहे. ‘ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड’ या संस्थेने बनवलेल्या या ‘धनुष’ तोफेची किंमत १४ कोटी रुपये, म्हणजे बोफोर्स तोफेच्या निम्मी आहे.

महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त आहे,” असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत. आपण हे विधान बरेचदा भावनिकदृष्ट्या घेतो. कारण, ‘खड्गहस्त’ म्हटल्यावर आपल्याला लगेच शिवराय आणि बाजीराव आठवतात. मग, आपण त्यांच्या स्फूर्तिदायक आठवणीत इतके गुंतून पडतो की, सावरकरांचं हे विधान आधुनिक काळातही तितकंच खरं आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही. म्हणजे असं की, आजच्या भारतीय स्थलसेनेचाजो अत्यंत महत्त्वाचा विभाग तोफखाना किंवा ‘रेजिमेंट ऑफ आर्टिलरी’ त्याचं मुख्यालय महाराष्ट्रात नाशिकला आहे, याचा आपल्याला पत्ताचनसतो. तर नुकतीच म्हणजे या गेल्या फेब्रुवारी महिन्यात आपल्या तोफखाना दलात ‘धनुष’ या नव्या तोफेची भर पडली आहे. १५५ मि.मी व्यासाची ही तोफ ३८ किमी एवढ्या पल्लापर्यंत अचूक मारा करू शकते. सुप्रसिद्ध बोफोर्स तोफेचीच ही पूर्णपणे भारतीय बनावटीची आणि आणखी सुधारित अशी आवृत्ती आहे.

१९६५च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेले अत्याधुनिक ‘पॅटन’ रणगाडे होेते,तर भारताकडे ‘शेरमन’ आणि ‘सेंच्युरियन’ रणगाडे होते. १९४५ साली दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटन आणि अमेरिकेने जुने म्हणून रद्दीत काढलेले हे रणगाडे आपण घेतले. पण, भारतीय लष्करी अभियंत्यांच्या बुद्धिमत्तेची कमाल अशी की, त्यांनी या रद्दी रणगाड्यांमध्ये आपल्याला आवश्यक ते बदल करून त्यांना चक्क युद्धात ‘पॅटन’ समोर उभं केलं, वापरलं आणि यश मिळवून दाखवलं. यंत्र महत्त्वाचं असतंच, पण यंत्राचा कुशल वापर करणारा माणूस ‘मॅन बिहाइंड दी मशीन’ हा जास्त महत्त्वाचा असतो. हे भारतीय अभियंत्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. लगेचच मध्यावधी निवडणुका झाल्या. सहानुभूतीच्या लाटेवर राजीव गांधी प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. १९८६ साली भारतीय लष्कराने स्वीडन या देशातल्या ‘बोफोर्स’ नामक कंपनीने बनवलेल्या ‘हॉबिट्स ७७’नावाच्या तोफांना पसंती दिली. तोफखाना दलाला अत्याधुनिक तोफांची गरज होती. त्यावेळी जगभरात ज्या विविध तोफा उपलब्ध होत्या, त्यापैकी बोफोर्स कंपनीच्या तोफा आपल्याला आपल्या गरजांची पूर्तता करणार्‍या अशा वाटल्या म्हणून आपल्या लष्कराने बोफोर्स कंपनीकडे ४१० तोफांची मागणी नोंदवली. १९८६ ते १९९१ या काळात ती पूर्णही करण्यात आली. भारतीय लष्कराव्यतिरिक्त स्वत: स्वीडन, नायजेरिया आणि इराण यांच्या तोफखान्यात आजही बोफोर्सच्या ‘हॉबिट्स ७७’ तोफा आहेत.

लष्कराने शस्त्रास्त्रांची मागणी केली. ती पुरवणे त्यासाठी आवश्यक त्या आर्थिक, राजकीय बाबींची पूर्तता करणे हे सरकारचे काम असते. ते करताना सरकारमधल्या उच्चपदस्थ राजकारण्यांनी जर भ्रष्टाचार केला, तर त्यात लष्कराचा काहीच संबंध नसतो. राजीव गांधींच्या कारकिर्दीतला बोफोर्स आर्थिक घोटाळा हा कदाचित अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या वॉटरगेट घोटाळ्याइतकाच महाप्रचंड असावा. ते कसंही असो. परंतु, बोफोर्सची तोफ अत्यंत कार्यक्षम आणि अगदी भारतीय सैन्याला जशी हवी तशी होती. १९९९च्या मे महिन्यात कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी उघडकीला आली आणि मे ते जुलै १९९९ मध्ये छोटं युद्ध झालं. या युद्धात प्रथमच बोफोर्स तोफांचा वापर झाला आणि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून पाकिस्तानी मोर्चे भाजून काढले.


पूर्वी युद्धातून पळून आलेल्या सैनिकाला, बायका स्वत:च्या हातातल्या बांगड्या काढून देत आणि म्हणत, “शत्रूकडून मार खाऊन पळून आलासना? या बांगड्या भर. मुडद्या! तीच तुझी लायकी!” अगदी हेच बोल खरे करीत बेनझिर भुत्तो त्यावेळी पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडियर जनरल असलेल्या परवेझ मुशर्रफना म्हणाल्या होत्या,“तू कसला पुरुष बुरखा घालून फिरत जा,” असा भुत्तो आणि मुशर्रफ बांगड्या भरू देत, बुरखे घालू देत, नाहीतर लुगडी नेसू देत आपल्याला त्यांच्याशी काही घेणं नाही. आपल्या तोफखाना दलातली बोफोर्स तोफ कामयाब सिद्ध झाली हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं. आता आपले लोक म्हणजे ‘ओ.एफ.बी.’ किंवा ‘ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड’ विचार करायला लागले की, बोफोर्स इतकीच, किंबहुना आणखी कार्यक्षम अशी तोफ आपण आपल्याकडेच का विकसित करू नये? बोफोर्स तोफ २४ किमीपर्यंत मारा करू शकते. पण, शेवटची बोफोर्स आपल्याला १९९१ साली मिळाली म्हणजे तिला आता २८ वर्षं झाली. त्यालाही २० वर्षे झाली. या काळात संगणकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान कुठच्या कुठे निघून गेलं. हे सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण प्रत्यक्षात वापरलंनाही, तर रणांगणावर आपली शस्त्रास्त्र जुनाट कालबाह्य ठरतील. झालं! ‘ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड’ डी.आर.ओ. म्हणजे ‘डीफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन’ वगैरे संंबंधित संस्था कामाला लागल्या.

आणि २०१६ सालच्या जुलै महिन्यात त्यांनी बोफोर्सपेक्षाही कार्यक्षम जास्त लांब पल्ल्याच्या म्हणजे ३८ किमीपर्यंत मारा करू शकणार्‍या तीन तोफा लष्कराच्या हवाली केल्या. त्याचं नाव ठरलं ‘धनुष!’ मात्र, अजून त्या प्रायोगिक अवस्थेतहोत्या. लष्कर त्यांची कसून परीक्षा घेणारहोतं. सियाचीनच्या हाडं गोठवणार्‍या बर्फात, राजस्थानच्या वाळवंटात, आसामामधील पावसात,कोणत्याही प्रतिकूल हवामानात, परिस्थिती त्या काम करू शकतात का? हे आजमावून पाहिल्याशिवाय तोफखाना दलात त्यांचा समावेश होऊ शकत नव्हता, तिथे रणांगणावर खर्‍याखुर्‍या शत्रूच्या खर्‍याखुर्‍या आगीच्या भडिमाराला तोड द्यायचं असतं. तिथे बोलघेवडे चरसी, नुसतेच गुरगुरणारे वाघ आणि बोलके पोपट चालत नाहीत. अक्षरश: इंचनइंच कसून पारखला जातो. अशा सगळ्या परीक्षांमधून पार पडून अखेर ‘धनुष’ तोफ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय लष्कराच्या तोफखाना दलात दाखल झाली आहेे. ‘ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड’ या संस्थेने बनवलेल्या या पूर्णपणे भारतीय संगणक रडारयुक्त ‘धनुष’ तोफेची किंमत १४ कोटी रुपये, म्हणजे बोफोर्स तोफेच्या निम्मी आहे. तिचा पल्ला बोफोर्सपेक्षा अधिक आहे. लष्कराने आत्ताच ओ.एफ.बी.कडे ११४ ‘धनुष’ तोफांची मागणी नोंदवली आहे.

तोफांमध्ये असंख्य प्रकार आहेत. ‘मॉर्टर’ आणि ‘हॉवित्झर’ हे त्यातले मुख्य दोन प्रकार. बोफोर्स ही ‘हॉवित्झर तोफ’ आहे आणि ‘धनुष’ ही देखील हॉवित्झर तोफ आहे. ‘हॉवित्झर’ या शब्दाबरोबरच अनेकांना पहिल्याच महायुद्धातल्या प्रलयंकारी जर्मन तोफांची आठवण होते. २०१४ ते २०१८ या कालखंडात पहिल्या महायुद्धातला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या काळातील अनेक घटनांवर पुस्तकं निघाली, चित्रपट निघाले, स्मारकांवर पुष्पचक्र वाहण्यात आली, ‘विग बेर्था’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या जर्मन हॉवित्झर तोफांनी बेल्जियम देशातले लीन आणि नामूर हे बुलंद किल्ले जमीनदोस्त करून सगळं युद्धतंत्रच बदलून टाकलं. पण, त्याहीपेक्षा लोक हादरले ते ‘पॅरिस गन’ या नावाने प्रसिद्धीस आलेल्या प्रचंड ‘हॉवित्झर’ तोफेने. तब्बल १११ फूट लांबीची नळी असलेल्या या जर्मन तोफेने पॅरिसपासून ८१ मैल किंवा १३० किमी अंतरावरून राजधानी पॅरिसवर तोफगोळ्यांचा भडिमार केला. लोक आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. तोफांचा आवाज तर नाही आणि दणादण गोळे येऊन आदळत आहेत.

 

आज आपल्याला आश्चर्य वाटतं की, १९९६ साली जर्मन ‘हॉवित्झर’ १३० किमी वरून मारा करत होती आणि आज २०१९ साली ३८ किमी वरून मारा करणारी ‘धनुष’ ‘हॉवित्झर’पेक्षा अत्याधुनिक कशी? याचं उत्तर असे आहे की, आज आपल्या तोफखान्याला विशिष्ट अंतरावर मारा करू शकतील, त्याचवेळी शत्रूचे मोर्चे कुठे आहेत ते शोधून नेमका तिथे मारा करू शकतील, दर पाच सेकंदात एक फैर झाडू शकतील, अशा तोफांची गरज आहे. खूप लांब अंतरावर मारा करायचा असेल, तर तोफेपेक्षा ‘रॉकेट लाँचर’ हा अधिक चांगला पर्याय उपलब्ध आहे. आपल्या ‘ओएफबी’ने ‘पिनाक’ नावाचा रॉकेट लाँचर विकसित केलेला आहे. त्यातून दर ४० सेकंदांना १२ रॉकेट्स डागली जाऊ शकतात. ती ८० किमी लांबीवरचे शत्रूचे मोर्चे उद्ध्वस्त करू शकतात. या ‘पिनाक’ने ही कारगिल युद्धात चांगली कामगिरी बजावली होती. ‘पिनाक’ हे पुन्हा भगवान शिवाच्या धनुषचंच नाव आहे, तर आता ‘धनुष’ भारतीय तोफखान्यात अधिकृतपणे दाखल झाली आहे. इमरान आणि मंडळींनो, बच के रहना रे बाबा!!


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@