फलश्रुती : एका फिसकटलेल्या वाटाघाटींची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |





घरातील श्रेयप्राप्तीबाबतची बेरीज
-वजाबाकी बाजूला ठेवली, तरी हॅनॉई वाटाघाटी फिसकटल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिक्रियाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील, व्हिएतनामची राजधानी हॅनॉई येथील बोलणी फिसकटली, असे जाहीर झाले आहे. हॅनॉईमधील मेट्रोपोल या आलिशान हॉटेलमधील सहभोजनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. इतके सर्व होऊनही हा मैत्रीयुक्त सभात्याग होता, असे ट्रम्प यांनी नंतर जाहीर केले व वाटाघाटीचे दार किलकिले ठेवले, ते बंद केले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात हे असेच करायचे असते.

तयारी वाया गेली?


याउलट
“आमचे प्रस्ताव वाजवी होते, सर्व निर्बंध रद्द करा, असा आमचा आग्रह नव्हता,” असे किम यांचे म्हणणे पडले. आण्विक शस्त्रास्त्रांच्या साठ्याबाबत तसेच युरेनियम व प्लुटोनियमचे सर्व कारखाने नष्ट करण्याबाबत अमेरिकेचा आग्रह होता. याविषयी संयुक्त पत्रक निघेल, छानसा समारंभ आयोजित होईल, लंच खाताखाता दोस्तीच्या आणाभाका घेतल्या जातील, हस्तांदोलने टिपण्यासाठी कॅमेरांचा क्लिकक्लिकाट होईल, हे सर्व अंदाज फोल ठरले. दोन पावलं तुम्ही पुढे टाका, दोन आम्ही टाकतो, असे झाले नाही आणि बोलणी मध्येच एकदम तुटली व दोघेही दोन वाटांनी चालते झाले. याउलट, दोघेही एकाच दिशेने जात राहिल्यामुळे परस्परातले अंतर होते, तेवढेच नंतरही कायम राहिले, असेही म्हटले जाते. म्हणूनच कदाचित डोनाल्ड ट्रम्प म्हणाले असतील की, कधीकधी आपण नुसतेच चाललो, असेही होते. यावेळी तेच झाले. मुळात या वाटाघाटी आयोजितच का केल्या गेल्या? याबाबत अमेरिकेत असे बोलले जाते की, ट्रम्प यांचा हा खटाटोप शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळावे यासाठी होता. कारण, उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग करण्यास तयार झाला असता, तर शांततेसाठीची ही फार मोठी उपलब्धी ठरली असती. आर्थिक निर्बंधांची जागा परस्परसहकार्याने घेतली असती.



 

मतभेदाचे मुद्दे


याँगबायॉन येथील आपला न्यूक्लिअर प्रकल्प गुंडाळायला किम तयार होते
. यात उत्पादनासोबत संशोधनही सुरू असायचे. पण, या बदल्यात सर्व निर्बंध हटवा, अशी त्यांची मागणी होती. हे अर्थातच अमेरिकेला मान्य नव्हते. याँगबायॉन प्रकल्प काही लहानसहान प्रकल्प नव्हता. त्याचा नकाशा डोनाल्ड ट्रम्प यांच्या खिशातच होता. त्यात सर्व तपशील नोंदवलेले होते. प्ल्युटोनियम लॅब, डिकाँटॅमिनेशन बिल्डिंग, रिप्रोसेसिंग बिल्डिंग, व्हेंटिलेशन बिल्डिंग, कूलिंग टॉवर, स्पेंट फ्युएल रिसेप्शन बिल्डिंग, असे सर्व तपशील डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळील नकाशात, मापे व आकारासह आहेत, हे किम यांनाही माहीत होते. म्हणून पहिल्याच धडाक्याला किम यांनी या सर्वांवर पाणी सोडायला आपण तयार आहोत, असा पवित्रा घेतला. पण, जे आपल्याला माहीत आहे, ते किम यांनाही माहीत असणार, हे ट्रम्प जाणून होते. म्हणून एवढ्याने ट्रम्प यांचे समाधान होणार नव्हते. युरेनियम व प्लुटोनियम शुद्धीकरणाचे आणखीही जे प्रकल्प तुमच्याकडे आहेत, त्यांचे काय, असा प्रश्न ट्रम्प यांनी विचारताच किम थक्कच झाले! नंतर सारवासारव करीत उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, “आम्हाला बंधने अंशत: सैल करून हवी होती, संपूर्ण सूट आम्ही मागितली नव्हतीच मुळी! दीर्घपल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आम्ही कायमचे थांबवू, एवढेच आमचे म्हणणे होते.”


कोण जिंकले
? कोण हरले?


२०१८च्या जूनमध्ये सिंगापूरला अमेरिका व उत्तर कोरियात पहिली शिखर परिषद पार पडल्यानंतर पूर्ण अपयश पदरी पडले होते
. यावर टीकाही खूप झाली होती. त्यामुळे हॅनॉई बैठकीत ट्रम्प काय वाटेल ते करून आण्विक नि:शस्त्रीकरण करार घडवून आणतील, असा अनेकांचा कयास होता. त्यामुळे ट्रम्पसाठी येत्या निवडणुकीच्या तोंडावर ही फार मोठी खीळ ठरणार आहे. किमसोबत दिलजमाई, हा परराष्ट्रीय धोरणातील सर्वात मोठा विजय आहे, हा मुद्दा ट्रम्प निवडणूक प्रचारात मांडणार होते. ते आता शक्य होणार नाही. पण, अनेक राजकीय निरीक्षकांना असे वाटत नाही. नुकसानकारक करार करण्याचे टाळून ट्रम्प यांनी देशहिताचाच निर्णय घेतला आहे, असे ट्रम्प म्हणू शकतील. पण, ट्रम्प यांचे रशियाशी संबंध व व्यवहार हा अमेरिकेतील ट्रम्प यांच्यावरील टीकेचा एक प्रमुख मुद्दा होता व पुढेही राहणार आहे. त्यामुळे एखादा सकारात्मक मुद्दा त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार होता, असेही म्हटले जात आहे. आता या दृष्टीने नवीन शोध हाती घ्यावा लागणार आहे.


आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया


घरातील श्रेयप्राप्तीबाबतची बेरीज
-वजाबाकी बाजूला ठेवली, तरी हॅनॉई वाटाघाटी फिसकटल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिक्रियाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यातही दक्षिण कोरियाच्या प्रतिक्रियेला तर विशेष महत्त्व आहे. कारण, दक्षिण कोरियाचे हितसंबंध या करारावर सर्वात जास्त प्रमाणावर अवलंबून होते/आहेत/असणार आहेत. वाटाघाटी फिसकटल्या, हे खेदजनक व दुर्दैवी असले, तरी या वाटाघाटीत प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने काहीच झाले नाही, असे म्हणता येणार नाही, असे दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे; तर त्यांना असे म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही/ नव्हते, असे टीकाकार म्हणत आहेत. या वाटाघाटी व्हाव्यात/सफल व्हाव्यात, यासाठी दक्षिण कोरियाने आपल्या परीने खूप प्रयत्न केले होते. एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसलेल्या, एकमेकांवर सतत गुरगुरत असणार्‍या व टोकाची भूमिका घेणार्‍या अमेरिका व उत्तर कोरिया या कट्टर वैर्‍यांना आपण दोनदा समोरासमोर आणून बसविले, ही आपली फार मोठी उपलब्धी आहे, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून मनापासून म्हणत आहेत. म्हणूनच त्यांनी वाटाघाटी फिसकटल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चांगली २५ मिनिटे बातचीत केली व या फिसकटलेल्या वाटाघाटीच्या निमित्तानेही अंतिम उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे म्हटले आहे. दुसरे असे की, आजघडीला चीन हा उत्तर कोरियाचा खरा साथीदार नव्हे, गॉडफादर आहे. यापुढेही बोलणी चालूच असू देत. आज ना उद्या यश मिळेलच. इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या एकाच बैठकीत सुटणार आहेत थोड्याच? चीनची ही भूमिका समजूतदारपणाची की तोंडदेखली, ते कळायला वेळ लागेल.

वाटाघाटींकडे डोळे लावून बसलेला तिसरा व महत्त्वाचा भिडू म्हणजे जपान. वाटाघाटी फिसकटल्या, ही बाब दुर्दैवी आहे, असे जपाननेही म्हटले आहे. जपानने आपली निराशा लपविण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधानांशीही फोनवर बातचीत केली व आज ना उद्या वाटाघाटी यशस्वी होतीलच व काहीतरी चांगले निष्पन्न होईलच, असे म्हणत त्यांना दिलासा दिला.

रशियाने हॅनॉई वाटाघाटी फिसकटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची कशी जिरली, असे म्हणत टर उडविली आहे. ट्रम्प स्वत:ला ‘डील मेकिंगचे तज्ज्ञ’ म्हणवतात. हे व्यापारी कौशल्य राजकारणात वापरण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नाचा पार फज्जा उडाला आहे, असे म्हणत रशियाने (पुतिनने) त्यांची खिल्ली उडविली आहे. (डोनाल्ड ट्रम्प हे बडे उद्योगपती होते/आहेत). आता याच विषयावर आम्ही उत्तर कोरियाशी मास्कोत चर्चा करण्याच्या विचारात आहोत, असे म्हणत रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना खिजवले आहे. ‘डील मेकिंगचा बादशहा’ तोंडावर आपटला असताना रशिया त्याला डिवचण्याची संधी सोडेल, हे शक्यच नव्हते. उत्तर कोरियात एक लाखांवर राजकीय हत्या, छळाच्या घटना व बलात्कार झाले आहेत, त्याचे काय? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.



अण्वस्त्रसंन्यास म्हणजे नक्की काय?

अगोदर सर्व अण्वस्त्रे व शस्त्रनिर्मितीचे कारखाने नष्ट करा, मग बंधने काढण्याची प्रक्रिया सुरू करू, असे अमेरिकेचे म्हणणे होते व आहे; तर या दोन्ही बाबी एकाच वेळी पार पडल्या पाहिजेत, अशी उत्तर कोरियाची भूमिका होती. त्यात कोरियन द्वीपकल्पातून अमेरिकन फौजा परत घेणेसुद्धा समाविष्ट आहे, गृहीत होते. यावरून उभयपक्षी एकमेकांवर किती विश्वास आहे, हे उघड होते. पण, दोन्ही पक्ष एकमेकांना कसे व किती ओळखून आहेत, संशयपिशाच्चाने दोघांनाही कसे ग्रासले आहे, हे उभयपक्षी स्पष्ट झाले, हीही एक फलश्रुतीच नाही का? त्यामुळे आता सुरुवात कुठून करायची आहे, हे तर स्पष्ट झाले ना! हेही नसे थोडके!



- वसंत गणेश काणे

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



@@AUTHORINFO_V1@@