होऊन जाऊ द्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू,” असा संकेत जेटली यांनी दिला होता. चीनच्या नकाराधिकाराने भारताला आता हाच इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाल्याचे त्यामुळेच वाटते. आता भारत या संधीचे सोने कसे, कधी करतो, तेच पाहायचे. तसेही मोदींच्या परराष्ट्रधोरणामुळे आज जग भारताच्याबरोबरच आहे. होऊन जाऊ द्या!
 

पाकिस्तानरूपी सुरक्षित बिळात दडून बसलेल्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून चीनने पुन्हा एकदा वाचवले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामासह देशातल्या कित्येक जिहादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने गेली १० वर्षे सातत्याने प्रयत्न केले. फ्रान्सच्या पुढाकाराने यंदा भारताने केलेला हा चौथा प्रयत्न होता, ज्यात नकाराधिकारप्राप्त चीनने नेहमीप्रमाणे आडकाठी आणत खोडा घातला. परंतु, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ज्या अधिकाराचा वापर करून चीनने हा खेळ खेळला, तो अधिकार मात्र भारतानेच भीक म्हणून दिल्याचे चिनी नेतृत्वाने लक्षात ठेवावे. दुसरीकडे आज चीनच्या मसूदप्रियतेमुळे वरवर पाहता, भारताचा चार विरुद्ध एक असा पराभव झाल्याचे दिसत असले तरी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय झाल्याचेही काही मुद्द्यांचा सूक्ष्मपणे विचार केल्यास स्पष्ट होईल. भारताच्या कृपेने झोळीत पडलेल्या अधिकाराचा वापर भारताविरोधातच करण्यातून चीन आज एका दहशतवाद्याच्या पाठीशी उभा ठाकल्याचे चित्र निर्माण झाले. मसूद अझहरचा बचाव करून पाकिस्तानसह चीनने पांघरलेला दहशतवादविरोधी लढवय्याचा बुरखा तर टराटरा फाटलाच, पण चीन हा दहशतवाद्यांचा नवा आश्रयदाता असल्याचेही सिद्ध झाले. ज्याचे दूरगामी परिणाम चीनवर होऊ शकतात; पण आपल्या अट्टाहासापायी मसूदला साह्य करण्यातून आपण नेमके काय गमावले व नरेंद्र मोदींनी काय कमावले, हे त्या देशाला तसेच राहुल गांधींसह भारतातल्या तमाम मोदीविरोधकांना व काही प्रमाणात स्वकीयांनादेखील समजण्याची शक्यता कमीच! म्हणून ते समजून सांगावेच लागेल.

 

मसूद अझहरचा बचाव करण्याच्या पवित्र्याने जागतिक समुदाय चीनवर मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्याचे व भारताला मोठ्या प्रमाणावर समर्थन देत असल्याचे दिसते. मसूदला अभय देण्याच्या चिनी भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील देशांनी दिलेल्या तीव्र प्रतिक्रियेवरून ते लक्षात येते. चीनला इशारा देताना मसूदविरोधात कारवाई करण्याचे अन्य पर्याय आमच्यासमोर खुले असल्याचे या देशांनी रोखठोक शब्दांत सांगितले. जागतिक पटलावर चीन वगळता अन्य देश भारताच्या बाजूने बोलत असल्याचे पाहायला मिळत असतानाच देशात मात्र राहुल गांधींसारखे बावळट राजकारणी आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी आनंदरंगात बुडाल्याचे पाहायला मिळाले. मसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करता न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मनसोक्त टीका करता येईल, टोमणे मारता येतील, म्हणून राहुल गांधींना हर्षवायु झाला. परिणामी, मोदींवर टीका करण्यासाठी आसुसलेल्या पण कोणताही मुद्दा हाताशी नसलेल्या विदूषकाच्या तोंडातून चित्रविचित्र शब्द वाहू लागले. “नरेंद्र मोदी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात, म्हणूनच ते चीनविरोधात चकार शब्दही काढत नाहीत. मोदींचे चीनबरोबरचे धोरण अपयशी ठरले, साबरमतीकाठी झोपाळ्यावर दोघांनी घेतलेल्या झोक्यांचा, दिल्लीतल्या गळाभेटीचा आणि चीनमध्ये जाऊन गुडघे टेकण्याचा काहीही उपयोग झाला नाही,” अशी बडबड राहुल गांधींनी केली. शेकडो भारतीयांचे बळी घेणारा क्रूरकर्मा वाचल्याचे समजून न घेणार्या राहुल गांधींच्या बालिश मनाला खरे म्हणजे मुत्सद्देगिरी कशाला म्हणतात, हेही कळत नसावे. म्हणूनच प्रियांका व रॉबर्ट वढेरा यांच्या जमीनघोटाळ्यात नाव आल्याचे पाहून अवसान गळालेला हा इसम मसूदप्रकरणावरून टाळ्या पिटताना दिसतो. राहुल गांधींना हे दिसत नाही की, आज मोदींनी चीनला कोणत्या ठिकाणी आणून उभे केले? आपल्या डावपेच खेळण्याच्या कौशल्याने मोदींनी चीनची अवस्था अगदी पाकिस्तानसारखी केली आहे. आज दहशतवाद्यांचा पोशिंदा म्हणून जसे पाकिस्तानचे नाव घेतले जाते, तसेच मसूद अझहरमुळे उद्या चीनचेही घेतले जाईल, जो मोदींच्या परराष्ट्रधोरणाचा मोठा विजय ठरेल.

 

आता मसूद अझहरवरून मोदींविरोधात जे उड्या मारत बोंबलताना दिसतात, त्यांना स्वतःच्या घराण्याचा व पक्षाचाही थोडासा का होईना इतिहास सांगायलाच हवा. चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराचा वापर करून मसूदचा बचाव केला हे खरेच, पण त्याला ती ताकद, ती शक्ती मिळाली कुठून? राहुल गांधींना ते माहिती नाही का? आज ज्या नकाराधिकाराच्या बळावर चीन शिरजोर झाल्याचे दिसते, तो राहुलच्या पणजोबांनी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंनीच दिला. काश्मीरप्रश्न युनोत नेऊन जसा नेहरूंनी गुंता वाढवला, तसाच चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देऊ केल्याने भारतासमोर आव्हान उभे राहिले. अमेरिका जेव्हा भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देत होती, तेव्हा चीनचे शत्रुत्व नको म्हणत नेहरूंनी ते नाकारले. १९५० मध्ये नेहरूंनी जे केले, त्याचेच तोटे आज भारताला भोगावे लागत आहेत. राहुल गांधींसारख्या सुमार व्यक्तीने, भारताच्या जाऊ द्या, पण स्वतःच्या घराण्याच्या, पक्षाच्या इतिहासाचा जरी अभ्यास केला तरी त्यांना हे नक्कीच कळेल. पण, राहुलकडून तेही झाल्याचे दिसत नाही. म्हणूनच आज ते मोदींवर पातळी सोडून बेतालपणे टीका करण्याचा, त्यांना डरपोक म्हणण्याचा हुच्चपणा करताना दिसतात. पण, देशातल्या जनतेला डोकलाम संघर्षावेळी मोदींनी घेतलेली कणखर भूमिका चांगलीच स्मरते. म्हणूनच इथले जनमानस राहुलच्या उचापतींकडे पाहण्याऐवजी घराण्याचा इतिहासच समोर आणेल, ज्याची उत्तरे देता देता राहुलच्याच नाकी नऊ येईल.

 

चीनचे मसूद अझहरला जपण्याचे वा भारताविरोधात जाण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे दलाई लामा. तिबेटमधील बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना चीन आपला सर्वात मोठा शत्रू समजतो. कारण, चीनने तिबेट गिळल्यानंतर आपल्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध असलेली तिथली जनता दलाई लामांकडे आशेने पाहते, तर चीनला तिबेटचे स्वतंत्र अस्तित्वच मान्य नाही अन् चीनच्या दृष्टीने शत्रू असलेल्या दलाई लामांना आश्रय दिला तो भारताने. भारताच्या याच कृतीचा बदला घेण्याच्या भावनेने चीन आज मसूद अझहरसारख्या कुख्यात दहशतवाद्याची पाठराखण करताना दिसतो. मसूद अझहर भारताच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हेगार असल्याचे चीनला माहिती आहे. म्हणूनच चीन ‘तुम्ही आमच्या शत्रूला म्हणजेच दलाई लामांना घरात घेतले तर आम्हीही तुमच्या शत्रूला सुरक्षाकवच पुरवू,’ अशाप्रकारे वागताना दिसतो. पण इथेही भारताने चीनलाच आपल्या जाळ्यात अडकविल्याचे दिसते. कारण भारताने बौद्ध धर्मगुरूंना आश्रय दिला तर चीनने अतिशय उलट्या काळजाच्या धर्मांध दहशतवाद्याला! सोबतच मसूदविरोधात मत दिले तर पाकव्याप्त काश्मीरमधून जात असलेल्या सीपेक प्रकल्पाला जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लक्ष्य करतील, याचीही चीनला काळजी वाटते. कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या, १० हजार कर्मचारी राबणार्‍या सीपेकवर हल्ला झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. आधीच अमेरिकेबरोबर व्यापारयुद्ध व कित्येक देशांनी चिनी प्रकल्पांना दिलेल्या नकारामुळे अर्थव्यवस्थेला बसलेले हादरे व त्यातच अशाप्रकारे दहशतवादी मागे लागले तर काय, हा प्रश्न चीनसमोर असेल. शिवाय चीनमधील उईगर मुस्लिमांचे पाकिस्तानातील जिहाद्यांशी सूत जुळले तर काय, हे प्रश्नही चीनसमोर असतील. म्हणूनही त्याने सर्वच देश मसूदविरोधात असताना नकाराधिकाराचा वापर केला असावा. मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यात यश न आल्याने आता पुढे काय, हा भारतासमोरचा मात्र एक मोठा प्रश्न असल्याचे दिसते. पण, त्याचेही उत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याआधीच दिले आहे. “अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू,” असा संकेत जेटली यांनी दिला होता. चीनच्या नकाराधिकाराने भारताला आता हाच इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाल्याचे त्यामुळेच वाटते. आता भारत या संधीचे सोने कसे, कधी करतो, तेच पाहायचे, तसेही मोदींच्या परराष्ट्रधोरणामुळे आज जग भारताच्याबरोबरच आहे. होऊन जाऊ द्या!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@