सुजय पर्वाची सुरुवात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2019   
Total Views |


 


जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणाचा विचार केल्यास डॉ. सुजय यांचा मार्ग सहज असला तरी गांधी, कर्डिले यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर आता खा. दिलीप गांधी हे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे, तर दुसरीकडे पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन खासदारकी देऊ, अशी गर्जना करणारे आ. शिवाजी कर्डिले हे चक्रव्यूहात अडकले आहेत.

 

मागील अनेक दिवसांपासून सुजय विखेंचे काय होणार? असा प्रश्न मायबाप मतदारांना, राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना व माध्यमांना पडला होता. अखेर सुजय विखे-पाटलांच्या बहुचर्चित विषयाला नुकताच भाजप प्रवेशाने पूर्णविराम मिळाला. पवार व विखे कुटुंबीयांच्या पक्षांची आघाडी असली तरी दोन्ही कुटुंबीयांच्या खुनशी राजकारणाचे बळी डॉ. सुजय विखे ठरले. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणारच यावर ठाम असल्याने डॉ. सुजय यांनी बंडखोरी करत 'कमळ' हाती घेतले. डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे विखे घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. मागील दोन वर्षांपासून नगर जिल्ह्यात डॉ. सुजय यांचं व्यक्तिमत्त्व खुलून येत होतं. आजोबांसारखी साधी राहणी, बोलण्याचा लहेजा, माणसांना आपलं करून घेण्याचे कौशल्य यामुळे जिल्ह्यातील जनतेत बाळासाहेब पुन्हा एकदा सुजय यांच्या रूपाने आपल्यात परत आले, अशी चर्चा चालू होती. मागील दोन महिन्यांच्या राजकीय घडामोडींनंतर सुजय यांनी ज्या पद्धतीने भाजपशी घरोबा केला, त्या पद्धतीने आपण आपल्या आजोबांप्रमाणे बेरकी राजकारणात माहीर असल्याचे सुजय यांनी विरोधकांना दाखवून दिले.

 

भाजप प्रवेशानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखेंना उमेदवारी जवळपास निश्चितच आहे. उमेदवारी निश्चित असली तरी डॉ. सुजय विखे यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सुजय यांचे वडील महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. आई अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. अद्याप त्याही आपल्या पदावर कायम आहेत. अशावेळी घरातूनच डॉ. सुजय यांना उघड पाठिंबा मिळणार नाही. तर भाजपामधील निष्ठावंतांची व विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. दुसरीकडे नगर-राहुरीचे किंगमेकर म्हणून ख्याती असलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका काय असणार हेही महत्त्वाचे असणार आहे. कारण कर्डिले यांचे व्याही अरुण जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जवळपास निश्चित करून विखे व कर्डिले यांच्यासमोर फासा टाकला आहे. नगरी भाषेत सांगायचं तर राष्ट्रवादीने मोठा 'गेम' खेळला आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेला जुना इतिहास आहे. शंकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत काँग्रेसमध्ये शंकरराव चव्हाण व शरद पवार असे दोन गट होते. यावेळी शंकरराव यांना बाळासाहेब विखे यांचा मोठा पाठिंबा होता. बाळासाहेब विखे यांनी तब्बल ४० वर्ष खासदारकी आपल्या घरात ठेवली होती. याच काँग्रेसने बाळासाहेब यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचे १९९१ साली लोकसभेचे तिकीट कापले होते. यावेळी बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत बाळासाहेब पराभूत झाले. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांनी गडाख व पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला भरला. या खटल्यात गडाख यांची खासदारकी रद्द झाली खरी पण शरद पवार यामुळे गोत्यात आले होते. यातून पवार वाचले मात्र त्यांनी विखे घराण्यावर जो डूख धरला तो आजतागायत असल्याचे दिसून आले आहे.

 

राष्ट्रवादीचा फास, स्वकीयांचा पाठिंबा मिळणार का ?, कर्डिलेंची भूमिका काय ? माधव पॅटर्न कोणाला साथ देणार ? अशा अनेक चर्चा चालू असल्या तरी विखे घराण्याची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची ख्याती असली तरी या जिल्ह्यावर खऱ्या अर्थाने विखे घराण्याने राज्य केले. बाळासाहेब विखे यांची या जिल्ह्यावर मोठी पकड होती. शिक्षणसंस्था, सहकार, कारखाने, उद्योगधंदे असे मोठे साम्राज्य या घराण्याने उभे केले. पुढे याच साम्राज्याचा उपयोग राधाकृष्ण विखे-पाटील यांना झाला. आता या साम्राज्याच्या जीवावर डॉ. सुजय विरोधकांशी दोन हात करायला उभे ठाकले आहेत. विखे घराण्याला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहेत. या वर्गात डॉ. सुजय हे सक्रिय झाल्यापासून उत्साह संचारला आहे. तसेच डॉ. सुजय यांच्यासारखा तरुण, उच्चशिक्षित व दूरदृष्टी असलेला नेता मिळाला म्हणून नव्याने आकर्षित झालेला मोठा वर्गही येथे आहे. जामखेड, कर्जत, पारनेर, पाथर्डी भागातील दुष्काळाने होरपळलेल्या, विकासापासून वंचित राहिलेल्या जनतेच्या मनात सुजय यांच्या रूपाने पालवी फुटली आहे. डॉ. सुजय विखे यांनीही मागील दोन वर्षांपासून डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशन व डॉ. विखे पा. मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज विळद घाट यांच्या माध्यमातून गावोगावी मोफत आरोग्य शिबिरे राबविली, जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून गावोगाव संपर्क कार्यालये उघडत जनतेशी संपर्क वाढविला. जनतेत जाऊन मिसळले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, बैठका घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खासदाराचा चेहरा फक्त फोटोत पाहायला मिळतो पण, हा बाळासाहेबांचा नातू आपल्या मांडीला मांडी लावून चहा घेतो, गप्पा मारतो यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. याचा फायदा नक्कीच त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे. यासोबतच शैक्षणिक संस्था, कारखाने यामधील भलामोठ्ठा कामगारवर्ग, त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी त्यांचे नातेवाईक, विखे घराण्याचे नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, शेकडो कार्यकर्ते, कमळ चिन्ह पाहून मतदान करणारा माळी, धनगर, वंजारी म्हणजे 'माधव पॅटर्न' हा हक्काचा मतदार, जामखेड, कर्जत, नगर शहर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील पंकजा मुंडे यांचे वर्चस्व, त्यांचे शिलेदार आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, हर्षदा काकडे, श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते, पारनेरमधून शिवसेनेचे आ. विजय औटी यांची हमखास मिळणारी साथ ही डॉ. सुजय यांचा विजयाचा मार्ग सुकर करणारी आहे.

 

जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणाचा विचार केल्यास डॉ. सुजय यांचा मार्ग सहज असला तरी गांधी, कर्डिले यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर आता खा. दिलीप गांधी हे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे, तर दुसरीकडे पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन खासदारकी देऊ, अशी गर्जना करणारे आ. शिवाजी कर्डिले हे चक्रव्यूहात अडकले आहेत. सुजय यांचा प्रचार करायचा की, आपल्या मुलीच्या सासऱ्याला मदत करायची असा पेचप्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या दोन नेत्यांचा पाठिंबा मिळवून त्याचे मतात परिवर्तन करणे मोठे दिव्य काम असणार आहे. जर डॉ. सुजय विखे हे यात यशस्वी झाले तर मोठ्या मताधिक्याने ते निवडून येऊ शकतात. मात्र, जर त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला तर विखे घराण्याच्या हातून बालेकिल्ला निसटण्याची शक्यता आहे. कारण विखे घराण्याचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, गडाख घराणे त्यांचे पंख छाटायला तयारच आहेत. यामुळे डॉ. सुजय व राधाकृष्ण विखे यांना अहमदनगर दक्षिणेची जागा जिंकून आणावीच लागेल. यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकांत जिल्ह्यात १२ पैकी भाजपचे १० आमदार निवडून आणण्याचे दिव्य काम त्यांना पार पाडावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@