घमेंडी नार, बडी चालबाज...
‘एक चतुर नार, बडी होशियार...’ किशोरकुमारचे गाणे. ती नार चतुर असून होशियारही आहे. आपल्याकडे अशी ‘चतुर’ आणि ‘होशियार’ नार आहे. कपाळावर तेरा त्रिकाल आठ्या पाडून सदान्कदा मोदींवर कटाक्ष साधणाऱ्या ममता बॅनर्जी क्षणार्धात आठवतात. त्या ‘चतुर’ आणि ‘होशियार’ आहेत असे वाटले, पण तेही क्षणार्धातच. कारण, ‘चतुर’ म्हणावे तर मागे त्यांनी सांगितले होते की, “काश्मीरच्या बाजूला एकच परकीय सीमा आहे, प. बंगालला तर दोन दोन सीमा आहेत.” याचाच अर्थ, भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरला लागून किती देशाच्या सीमा आहेत, हेसुद्धा या मुख्यमंत्रीबाईंना माहिती नाही. ज्यांना देशाचा आवश्यक भूगोल माहिती नाही, त्या व्यक्तीला चतुर, हुशार वगैरे म्हणणे म्हणजे अतीच होईल, असे वाटले. पण लगेच असेही वाटते की, जन्माने हिंदू पण सगळी भिस्त मुस्लीम विचारधारेवर असलेल्या ममता मुख्यमंत्रिपदावर आहेत. मुख्यमंत्री होणे येरागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे ममता ‘चतुर’ आणि ‘होशियार’ असतील. असो, पश्चिम बंगालबाहेर काय आहे, काय चालले आहे याचा मागमूसही नसणाऱ्या ममतांना पंतप्रधानही व्हायचे आहे. पण, आज देशात रा. स्व. संघाच्या मुशीतून घडलेला राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, कितीतरी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत, त्या रा. स्व. संघाबाबत ममता अनभिज्ञ आहेत. ममतांच्या मते रा. स्व. संघ आणि बजरंग दल या राजकीय सेना आहेत. अर्थात, ममतांच्या जाणीवपूर्वक अनभिज्ञतेचे रा. स्व. संघाला काही सोयरसुतक नसेलच म्हणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प. बंगालमधून लढावे, असे तिरस्काराने म्हणताना ममता म्हणाल्या, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनेलाही मोदींनी प. बंगालमध्ये आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा.” ममतांच्या मते प. बंगालची संस्कृती ही इतर भारतापेक्षा वेगळी आहे का? विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती ममतांना माहिती नसेल का? जी महिला देशाची संस्कृती, देशातील समाजकारण करणाऱ्या संस्था यांची माहिती स्वत:च्या चष्म्यातून पाहते. तिला ‘एक चतुर नार, बडी होशियार’ म्हणण्यापेक्षा ‘एक घमेंडी नार, बडी चालबाज’ असेच म्हणाचे लागेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat