पुलंचे सादर होणे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2019   
Total Views |

 
 
 
 
पुल ऐन बहरात असताना त्यांना भेटावं, ऐकावं असं वाटण्याचं वय नव्हतं. परिस्थितीही तशी नव्हती. परिस्थितीचा अर्थ केवळ आर्थिक असा नाही. वय, वर्तमान, भूगोल आणि सांस्कृतिक पर्यावरणही यात येतं. पुल मराठी लेखकांच्या पोहोचण्याच्या आणि लोकप्रियतेच्या सार्या मर्यादा तोडून केव्हाच बाहेर पडले होते. त्यांच्या आधी इतका उदंड स्वीकार आणि सर्वस्तरातले हवेहवेसेपण, लाडकेपण आचार्य अत्रे यांनाच मिळाले होते. पुलंनी त्याही कक्षा ओलांडल्या होत्या. त्यामुळे सांस्कृतिक समज असलेले शिक्षक असणार्या विद्यार्थ्यांपर्यंतही पुल लेखक म्हणून पोहोचले होते.
 
 
 
 
 
पुल पांढरकवड्यासारख्या आदिवासीबहुल गावातही पोहोचले होते. आताचे अत्यंत मोठे मराठी लेखकही कुणाला फारसे माहिती नसतात. पुल मात्र नावानी, चेहर्यानीच नाही तर लौकिकानीही पोहोचले होते. आपल्या हयातीतच एक दंतकथा होण्याचा प्रचंड रसिकाश्रय त्यांना मिळाला होता. याचे कारण होते, ते छापील पुस्तकांत अडकून पडले नाहीत. आपले साहित्य घेऊन ते थेट रसिकांपर्यंत पोहोचले. पुस्तकांच्या पोहोचण्याच्या मर्यादा अजूनही आहेत. आता तर त्याला नव्या माध्यमांचे आणखी अडथळे वाढले आहेत. डिजिटल अक्षरे पाहण्याच्या सवयीने नवी पिढीतर मुद्रित साहित्य वाचण्याची अन् छापील अक्षरांशी तादात्म्य पावण्याची क्षमताच गमावून बसली आहे. त्या काळातही वाचकांची संख्या फार नव्हती अन् ग्रामीण भागांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची साखळीही नव्हती. त्यामुळे चांगली, नवी पुस्तके नव्या सुपरहिट सिनेमांसारखीच खूप उशिराने पोहोचायची. आता पुल असते तर त्यांना स्वत:चे फेसबुक पेज करावे लागले असते का? आता अस्तित्वाची दखल समाजमाध्यमांवरच घेतली जाते. थेट माणसांत जाऊन त्यांच्या काळजाला हात घालणारे पुल, समाजमाध्यमांच्या आभास जगात हरवले असते का?
 
 
पुलंचे यश हे की, ते त्यांच्या पुस्तकांच्या, लेखनाच्याही आधी त्यांच्या रसिकांपर्यंत पोहोचत असत. कारण ते परफॉर्मर होते. त्यांना हे त्यांचे सादर असणे सहर्ष मान्य होते. कुठल्याही सृजनाची आपली एक कलात्मक भाषा असते. कुणी त्याला जे काय सांगायचे ते सृजनाच्या उचंबळीतून चित्रांच्या माध्यमातून सांगते, कुणी गाणे गाते, कुणी शिल्पातून व्यक्त होतं, तर कुणी लेखन करतं. त्यातही कविता, कथा, कादंबरी, नाटक अशीही मग या सृजन भाषेची अक्षरविभागणी होत राहते... पुलंना अशा खूप सार्या भाषा अवगत होत्या. त्यांना गाता येत होते, कविताही ते छान करत, अभिनय करत, नाटक लिहीत, विनोदी लेखक म्हणून तर ख्यातच होते. ते निर्मातेही होते. इतकी बहुमुखी प्रतिभा त्यांच्या ठायी होती, कारण ते मुळात परफॉर्मर होते. त्यांना काहीच स्वत:जवळ ठेवता येत नव्हते. जे काय आहे ते देऊन टाकायचे. प्रवाही असले तर सतत नवे काही येत राहील. त्यामुळे ते निखळ होते. समाजाकडे, माणसांच्या जगण्याकडे ते निकोप मिस्कीलपणे बघत. स्वत:ला मॅजिक आरशासारखे समाजासमोर धरीत. आपल्याच चेहर्याची अशी विदुषकी रूपं बघताना हसायला येई... चार्ली चॅप्लीन भारतात जन्मला असता तर तो पु. ल. देशपांडेच झाला असता, असे कधीकधी वाटून जाते. तो मूकपणे व्यंग्य करायचा आणि हे बोलता बोलता हसवत अंतर्मुख करायचे. किशोरकुमारच्या बाबतही असेच वाटते. त्याने कधी लेखन केले नाही... बाकी तीही एक बहुमुखी प्रतिभाच होती.
पुल सादरकर्तेच होते म्हणून ते विनोदी लेखक झाले, की विनोदी लेखकांचे रसिकांच्या समोर जाणे हे भागध्येयच असते? कारण आजवर जगात जितके विनोदी लेखक झाले ते परफॉर्मरच राहिले आहेत. अगदी आपल्या इकडेही द. मा. मिरासदारांपासून ते वि. आ. बुवा किंवा मग आता वर्हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांच्यापर्यंत सार्यांनाच सादर होणे आवश्यकच का वाटत आले असावे? ती रसिकांची अन् त्यांचीही गरजच असली पाहिजे. एकतर गंभीर, अतिचिंतनशील अन् शब्दजड साहित्य हे व्यासपीठीय नसते. ते अक्षरांच्या माध्यमातून वाचकांच्या मनात पोहोचते आणि मग तिथे ते मूर्त होते किंवा पूर्ण होते. व्यासपीठावर पूर्ण आकारातले चित्र उभे करणारे अन् थेट, सरळ असे उभे राहू शकते. रंगमंचावर उभे राहण्यासाठी त्याला स्वत:चा आपला एक आकार हवा असतो. पुलंकडे जी प्रतिभा होती तिची गरज रसिकांशी थेट संवादच साधण्याची होती. मध्ये कुठलेच दलाल नकोत. मग ते पुस्तकांच्या रूपातलेही का असेना... संगीत, विनोद, अभिनय, दिग्दर्शन या सार्यांची व्यासपीठ ही गरजच आहे. त्या शिवाय ते परिपूर्ण नाहीच. होऊदेखील शकत नाही.
पुल तर इतके नैसर्गिक सादरकर्ते होते की, त्यांना मग औपचारिक व्यासपीठाचीही गरज राहिली नव्हती. त्यांची साधी भेट, हादेखील त्यांचा एक विशेष आणि वेगळा परफॉर्मन्सच असायचा. त्या भेटणार्याची अनुभूती हीच असायची की, पुल आज भेटले तेव्हा खास माझ्यासाठी सादर झाले. मग ते कार्यक्रमानंतर कुणाकडे खास आग्रहाने जेवायला गेल्यावरही तिथेही आपला एक वेगळा परफॉर्मन्स द्यायचे आणि मग त्याची नोंद रसिकच ठेवायचे. त्यांच्या अशा अनौपचारिक सादरीकरणांची बखरच रसिकांनी लिहून काढली आणि मग त्यातून पुलंचे किस्से आणि कोट्या वेगळ्याने लिहिल्या गेल्या. प्रकाशित पुलंच्या पेक्षाही हे अप्रकाशित पुलच रसिकांना माहिती आहेत.
पुल नावाच्या लेखकाला वाचक नव्हे तर रसिकच होते. पुल पूर्ण वाचून काढले आहेत, कोळून प्यायलो आहे असे नाही, तरीही पुल पूर्ण माहिती असल्याची अनुभूती बाळगणारे आज ते गेल्यावरही इतकी वर्षे टिकून आहे. एकान्तात बसून लेखन करत राहणे, हा पुलंचा स्वभावच नव्हता. सतत लोकांमध्ये मिसळणे, गप्पा मारणे ही त्यांची गरज होती. सुनीताबाईंना त्यांचे असे लोकाभिमुख असणे, अगदी सामान्य चाहताही भेटायला आल्यावर वेळेचे भान न ठेवता बोलत राहणे आवडत नव्हते. त्यांना असे वाटे की, त्यामुळे या मनोहराचा वेळ जातो आहे. इतका वेळ असा घालविण्यापेक्षा त्यांनी लेखन केले तर याच रसिकांसाठी तो मोठा ठेवा असेल... सुनीताबाई जी. ए. कुळकर्णींच्या पठडीतल्या होत्या. शांत संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसलेल्या बगळ्यागत लेखकाने साधना करावी, असे त्यांचेही इतरांसारखेच मत होते. ते चूक असे काहीच नव्हते. मात्र, असे बेधूम लोकांमध्ये मिसळणे अन् अनुभवत राहणे, हा पुल नावाच्या लेखकाचा रियाज होता. ते लेखक नव्हते, परफॉर्मर होते, त्यामुळे त्यांना साधना नव्हे, तर रियाजाची गरज होती. पुल नखशिखान्त सादरकर्तेच होते. त्यामुळे, एका हिंदी चित्रपटात संवाद आहे, ‘‘हम जहॉं खडे हो जाते है, लाईन वहीसे शुरू हो जाती है...’’ तसेच पुलंच्या बाबत म्हणावे लागायचे, ‘‘वो जहॉं खडे हो जाते है, मैफल वहॉं शुरू हो जाती है...’’
अनेकदा तर त्यांचे विनोदी लेख, कथा हे त्यांनी प्रत्यक्ष लिहून काढण्याच्या आधीच त्यांच्या कार्यक्रमातच तयार व्हायचे. नंतर सुनीताबाई किंवा कुणी आप्त त्यांना आठवण करून देई, तो घर दाखविण्याचा किस्सा छान रंगतोय् अलीकडे तुमच्या कार्यक्रमांत. लिहून ठेवला पाहिजे तो... अनेक परफॉर्मर्सच्या बाबत हे असेच होते. वक्तादशसहस्रेषु राम शेवाळकरांच्या बाबतही हे असेच झाले आहे. सावरकरांवरचे किंवा मग कृष्ण, अर्जुन, दुर्योधनावरचे व्याख्यान खूप रंगले की, एकतर ते ध्वनिबद्ध करून ठेवलेले असायचे. श्रीमती विजयाताई शेवाळकर आयोजकांना आधीच तशा सूचना द्यायच्या आणि मग त्या ध्वनिफितीवरून ती व्याख्याने लिहून काढली गेली आहेत...
 
 
 
ते परफॉर्मर होते आणि लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हा परफॉर्मरचा निसर्गभाव असतो. त्यात अडथळा आणणारे घटक त्याला अन्यायकारकच वाटत राहतात. त्यामुळे सामान्यांच्या आयुष्यातला अनमोल आनंदाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पुलंनी त्याला विरोधच केला. मग ते आणिबाणी असो की नंतरच्या राज्यकर्त्यांची दंडेली असो. त्यांच्यातल्या परफॉर्मरला मुक्त अवकाशच हवं होतं आणि माणासाचेही तसेच जगणे हा त्याचा अधिकार आहे, हे त्यांचे मत होते. सारी माणसे प्रत्येक क्षणाला सादरच होत असतात. पुलंच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, हे माहिती नाही, मात्र ते गप्पांचे फड जमवीत. खासगी बैठका सतत होत राहत. त्यात हे असे अनेक किस्से सांगत असावेत आणि कधीतरी कुणीतरी, तू हे लिहून का नाही काढत? छान आहेत हे... असे म्हटले असावे आणि मग ते प्रकाशित झाल्यावर एक वेगळ्या लेखनाची वाट प्रशस्त झाली. शंकर बडेंच्या बाबत मी हा जिवंत अनुभव घेतला आहे. ते खासगी बैठकांत खूप किस्से रंगवून सांगत अन् मग मी ते त्यांच्याकडून लिहून घेतले.
 
 
 
 
 
पुलंचे लेखन म्हणजेही त्यांचा एक परफॉर्मन्सच होता. त्यांची एक मुलाखत पु. बा. भावे यांनी घेतली होती. त्यात त्यांच्या लाडक्या रूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला अन् अखेर ते संगीतकार, अभिनेते, नाटककार, लेखक की कोण... असा निष्कर्ष काढताना ते सादरकर्तेच आहेत, हेच सिद्ध झाले होते. त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षात, त्यांची होऊ न शकलेली भेट भळभळत राहतेय्...
@@AUTHORINFO_V1@@