आता का मिरच्या झोंबल्या?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2019
Total Views |


 
 
 
 
जितेंद्र आव्हाडांनीही शरद पवारांच्या खणतेगिरीविरोधात कधी तोंड उघडल्याचे आठवत नाही. उलट टाळ्या पिटण्यात अन् गळ्यात उपरणे घालून स्वागत करण्यातच सुखानुभूती घेतली. तेव्हा दुसऱ्याची घरे तोडताना आव्हाडांना ‘कसं वाटतंय, गार गार वाटतंय’चा फील आला असेल नाही? अन् आता सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आव्हाडांना मिरच्या झोंबल्या? आगी लागल्या, धूर निघाला?
 

महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी!” राज्य विधानसभेतले विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सुपुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवरील हे ट्विट केले कोणी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी. आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत नाही, तोच सध्या देशासह राज्यपातळीवरही सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसतात. परंतु, कोट्यवधी मतदारांच्या आशीर्वादाने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने सर्वच ठिकाणी आघाडी घेतल्याचे व अनेक दिग्गज-मातब्बर नेते, घराण्यातील मंडळीही भाजपचा झेंडा हाती घेत असल्याचे दिसते. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजपप्रवेशही त्याच मालिकेतील एक घटना. पण, सत्तेविना गेल्या पाच वर्षांपासून तडफडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांना ते काही रुचल्याचे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी सुजय यांच्या भाजपप्रवेशावर टीका करत भाजपला ‘मुले पळवणारी टोळी’ असे संबोधले. खरे म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी वापरलेले शब्द बरोबर असले तरी ते ज्यांच्याबद्दल वापरले ते मात्र सपशेल चुकीचे असल्याचे काही उदाहरणांतून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योगांतून अन् शरद पवारांच्याच आतापर्यंतच्या कामगिरीतून सिद्ध होते. कारण, मुलांपासून पुतण्यांपर्यंत आणि थेट साहेबा-आजोबांपर्यंत प्रत्येकालाच पळविण्याचा, उचलण्याचा, कुटुंबातच कलगीतुरा लावून देण्याचा दांडगा अनुभव जितेंद्र आव्हाडांच्या मालकांना आहे.

 

योगायोगाने आज दिवंगत अष्टपैलू कलाकार दादा कोंडके यांची पुण्यतिथी. दादांनी १९९० साली ‘पळवापळवी’ नावाचा एक धमाल विनोदपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाची कथा काय हा भाग निराळा, पण दादांनी दिलेल्या ‘पळवापळवी’ या शीर्षकाला शोभेलशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या राजकारणात चांगलीच वठवली. पळवापळवीचा प्रत्यक्ष प्रयोग करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी कामाला येईल अशा प्रत्येकालाच पोतडीत भरण्याचे उद्योग केले. बाळासाहेब ठाकरेंच्या वेधक नजरेने हेरलेल्या व नंतर राजकारणात अनेक महत्त्वाची पदे उपभोगलेल्या छगन भुजबळांना पळविण्याचे महत्कार्य शरद पवारांनीच केले होते. तद्नंतर शरद पवारांना हा पळवापळवीचा खेळ इतका आवडला की, त्यांनी त्याच्याच जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसमधून पळवलेल्या पोरासोरांच्याच नव्हे, तर पिकल्या पानांच्या साह्याने पवारांनी राज्याची सत्ताही प्रदीर्घ काळपर्यंत पुतण्याला धरण भरण्याचे निराळेच कौशल्य दाखविण्याची संधी देत देत उपभोगली. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते गणेश नाईकांना शिवसेनेतून शरद पवारांनीच फोडले आणि ठाण्याचेच दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे यांना शिवसेनेतून पकडून राष्ट्रवादीत खेळविण्याचे डाव पवारांनीच तडीस नेले. इतकेच नव्हे तर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याला आपल्या कळपात ओढण्यासाठी मुंडे कुटुंबीयांत काडी लावण्याचा कारनामाही पवारांनीच केला. सोबतच गेल्या काही काळापासून ठाकरेंच्या ‘राज’पुत्राशी सूत जुळवून गळाला लावण्याच्या उचापतीही शरद पवारांनी केल्या. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने या सगळ्याच पक्षीय वा कौटुंबिक पोरांना काय कळा सोसून जन्म दिला? हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

 

दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनीही शरद पवारांच्या या खणतेगिरीविरोधात कधी तोंड उघडल्याचे आठवत नाही. उलट टाळ्या पिटण्यात अन् गळ्यात उपरणे घालून स्वागत करण्यातच सुखानुभूती घेतली. तेव्हा दुसऱ्याची घरे तोडताना आव्हाडांना ‘कसं वाटतंय, गार गार वाटतंय’चा फील आला असेल नाही? अन् आता सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आव्हाडांना मिरच्या झोंबल्या? आगी लागल्या, धूर निघाला? निदान सुजय विखे-पाटील भाजपसारख्या भ्रष्टाचाराला, लाचखोरीला, दलालीला अजिबात थारा न देणाऱ्या पक्षात आले. पण शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्यांच्या घरातली पोरे पळवून राष्ट्रवादाची नव्हे तर जातीयवादाची, भ्रष्टवादाचीच मात्रा दिली. म्हणूनच जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर टीका करण्याआधी दुसऱ्याचे वाकून पाहताना स्वतःच्या टोपी की टोपलीखाली काय काय झाकून ठेवले, हेही एकदा पाहावे.

 

आज सुजय विखे-पाटलांच्या रूपात भाजपने खरे म्हणजे एका राजकीय नेत्याच्या मुलालाच पक्षात प्रवेश दिला. पण, जितेंद्र आव्हाडांचे स्वतःचे उद्योग तर सर्वांवर कडी करणारेच होते व आहेत. मुसलमानी मतांसाठी लाचार झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी इशरत जहाँसारख्या जिहादी-दहशतवादी मुलीच्या पालकत्वाचीही जबाबदारी घेतली होती. इशरतच्या जनाजाला जितेंद्र आव्हाडांनी आपल्या गल्लीतल्या सवंगड्यांसह हजेरी लावली होती. नंतर तिच्या नावाने सुरू केलेल्या रुग्णवाहिकेला अर्थपूर्ण हातभार लावण्याचे कामही जितेंद्रानेच केले. आता आव्हाडांना ही पळवापळवी आठवत नाही काय? इशरत जहाँ तर भारतातलीच होती, पण जितेंद्र आव्हाडांनी गाझापट्टीतली पोरंही आपलीच म्हटल्यासारखे ‘सेव्ह गाझा, सेव्ह गाझा’ची टूम काढली होती. ज्यांचा भारताशी संबंध नाही, राज्याशी संबंध नाही, त्यांचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसशी व स्वतःशी जोडण्यामागे आव्हाडांच्या मनात कसले उमाळे दाटून आले होते? घरची सोडून बाहेरच्यांची पोरे स्वतःची म्हणण्याचाच हा प्रकार नव्हता काय? अन् असली कामे करणारा, मुंबईतल्या एका कोपऱ्यातला इसम आज भाजपला ‘मुले पळवणारी टोळी’ म्हणतो! पण, जितेंद्र आव्हाडांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही, त्यांना वा त्यांच्यासारख्या कोणाला कोणीही पळवणार नाही. कारण इथे पोरांना प्रवेश दिला जातोय, नाठाळ वा इरसाल कार्ट्यांना नाही. म्हणूनच आव्हाडांनी निश्चिंत राहावे व आपल्या इटुकल्या-पिटुकल्या अंगणातच खेळावे, बागडावे.

 

इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की, बुडणाऱ्या जहाजात कधी कोणी राहत नाही. उलट जो तो जहाज बुडू द्या, पण स्वतःचा जीव वाचवण्यालाच प्राधान्य देतो. आज काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तशीच झाली आहे, म्हणूनच त्या पक्षातली मंडळी भाजपमध्ये येताना दिसतात. अर्थातच हे काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कर्माचे फळ आहे. म्हणतात ना, जैसी करनी, वैसी भरनी! सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही यात एक भूमिका असल्याचे दिसते. काँग्रेसमधील लोकांना आपल्या हायकमांडच्या नाकर्तेपणाची पुरती जाणीव असल्यानेच आज ते मोदींच्या कर्तृत्वाच्या व भाजपच्या राष्ट्रवादाच्या, विकासवादाच्या छायेखाली येत आहेत व पुढेही येतीलच. जितेंद्र आव्हाडादीकांनी कितीही जळफळाट वा आदळआपट केली तरी मोदींना पुन्हा एकदा सर्वोच्चस्थानी बसविण्यासाठी घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पाठीराखे, समर्थक स्वागतच करतील!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@