बखतरमध्ये जावेद अख्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
जावेद अख्तर कोण, हे सामान्यपणे सर्वांना माहीत आहेच. शबाना आझमी या सिनेअभिनेत्रीचे पती आणि स्वतः एक शायर. गझल ऐकणाऱ्या वर्गातही ते लोकप्रिय आहेत. चित्रपट दुनियेतील असल्यामुळे प्रसिद्ध आहेतच आणि त्यांच्या नावामागे थोडे ग्लॅमरदेखील आहे. शीर्षकातील दुसरा शब्द ‘बखतर’ असा आहे, ज्याचा अर्थ होतो ‘कवच किंवा चिलखत’. आता या अख्तरचा बखतरशी नेमका काय संबंध? हे जाणून घेण्यासाठी हा लेखप्रपंच...
 

चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस दुनियेत वावरणारे जावेद अख्तर हे काहीही बोलले तरी त्याला प्रसिद्धी मिळणार, हे अगदी ठरलेले. मुंबईच्या ‘कलेक्टिव्ह फोरम’च्या कार्यक्रमात ते जे बोलले, ते मोठ्या श्रद्धेने गोळा करून वर्तमानपत्रांनी छापले. त्यात मियाँ अख्तर काय म्हणतात, ते बघूया! ते म्हणतात,“आरएसएस ही फॅसिस्ट संघटना आहे. त्यांच्या सर्व कार्यालयात गोळवलकर गुरुजी यांचे फोटो आहेत. याच आरएसएसला भारताचा तिरंगा मान्य नाही. राज्यघटनाही मान्य नाही. त्यांची बौद्धिक क्षमता एकदम खालच्या दर्जाची आहे.” पुढे ते म्हणतात की, “देशातील सेक्युलॅरिझमबद्दल बोलायचं झाल्यास ‘वन्स अपॉन ए टाईम’ असे म्हणावे लागेल. मोदीजी, आपण इंदिरा गांधींशी बरोबरी करू शकत नाही. तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील इंदिरा गांधींशी बरोबरी करायला. तुमच्या प्रत्येक गोष्टीत इंदिरा गांधी सरस आहेत. यांचं कोणी जेलमध्ये गेलं होतं का? लालकृष्ण अडवाणी यांनी ‘भारत छोडो’ ऐवजी आरएसएस जॉईन केली. संघाकडे कुणीच आदर्श नाही, म्हणून आरएसएसवर बंदी घालणाऱ्या सरदार पटेलांचा यांना पुतळा उभारावा लागतोय.”

 

ही झाली अख्तरसाहेबांची मुक्ताफळे. भाषणस्वातंत्र्य आपल्या देशात आहे, विचारस्वातंत्र्यदेखील आहे, त्यामुळे जीभ उचलून टाळ्याला लावायला कोणाच्या बापाचे काही जात नाही. अख्तरसाहेबांची बखतर (कवच) आहे, सेक्युलॅरिझम, बौद्धिक अहंकार आणि संघाविषयीचे घोर अज्ञान. या तीन कवचाच्या म्हणजे बखतरच्या आत गझलकार अख्तर बसलेले आहेतम्हणतात ना, अगोदरच माकड, त्यात दारू प्यायला आणि त्याला विंचू चावला, म्हणजे तो काय धमाल करील याची आपण कल्पना केलेलीच बरी. अख्तरसाहेबांनी सेक्युलॅरिझमची दारू प्यायलेली आहे, अहंकाराची थोडीशी भांग ओढली आहे आणि मोदीद्वेषाचा त्यांना विंचू चावलेला आहे. एवढे सगळे झाल्यानंतर वर ते जे काही बोलले, त्याशिवाय आणखी दुसरे काय बोलणार? ते त्यांचे भाषणस्वातंत्र्य आहे.

 

अख्तर चांगले गझलकार आहेत, पण गझलकार असणे आणि संघ जाणकार असणे, याचा काही संबंध नाही. संघाच्या कार्यालयात श्रीगुरुजी (त्यांच्या भाषेत गोळवलकर) यांच्या प्रतिमा असतात. त्यावर या गझलकाराचा आक्षेप आहे. संघटनेच्या कार्यालयात त्या संघटनेच्या श्रद्धेय नेत्याची प्रतिमा लावली जाते. एवढे साधे ज्ञान गझलकाराला नसावे? अरेरे, किती वाईट झाले! नंतर ते एकदम संघाच्या बौद्धिक क्षमतेवर घसरले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा केल्याचे त्यांना दुःख झाले, संघाने त्यांना स्वीकारल्याचे त्यांना वाईट वाटले. त्यांच्या तर्कशास्त्राप्रमाणे मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणजे अगदीच बुद्धू आहे, अशा बुद्धू माणसाला प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन विद्यापीठात भाषण करण्यास बोलावले जाते. एक तर मला बोलाविणारे ‘बुद्धू’ असले पाहिजेत किंवा बौद्धिक अहंकारात जगणारे अख्तर ‘निर्बुद्ध’ असावेत. आपण कोण आहोत, हे त्यांनी एका गझलमधून सांगावे. त्यांच्याच गझलचे शब्द घेऊन सांगायचे तर-

 

मैंने दिल से कहा,

ऐ दीवाने बता

जब से कोई मिला,

तू है खोया हुआ

ये कहानी है क्या?

है ये क्या सिलसिला?

ऐ दीवाने बता...

 

आशा करूया की, अख्तरसाहेब आपल्या बखतरमधून बाहेर येऊन आपण कोण आहोत, हे नक्की सांगतील.

 

बौद्धिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीकडून काही अपेक्षा असतात. त्यातील पहिली अपेक्षा अशी असते की, ज्याच्यावर टीका करायची आहे, त्याचा प्रथम नीट अभ्यास केला पाहिजे. मला कम्युनिझमवर टीका करायची असेल, तर मला प्रथम कम्युनिझम समजून घ्यावा लागतो. इस्लामवर टीका करायची असेल, तर इस्लामचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय काही बोलणे, ही मूर्खाची वटवट असते. डॉ. हेडगेवारांनी काँग्रेसच्या सर्व चळवळीत भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिनी सर्व संघाच्या कार्यालयावर तिरंगा लावला जातो. गेली काही वर्षे प्रजासत्ताक दिनी संघाची संचलने होतात आणि त्यावेळी संघ अधिकार्‍यांची भाषणे होतात. अख्तरसाहेबांनी बखतरमधून बाहेर पडून आणि गझलचे शब्द शोधण्याच्या कष्टातून थोडे बाहेर पडून या विषयाचा अभ्यास केला पाहिजेआरएसएसला राज्यघटना मान्य नाही,’ हा विषय गझलेचा होऊ शकत नाही, पण विवरणाचा नक्की आहे. मी आरएसएसचा. माझे संविधानावरील पुस्तक दोन महिन्यांत बारा हजार प्रतींच्या विक्रीचा विक्रम करणारे झाले. सहा हजार हिंदी प्रती संपल्या आणि नुकताच गुजरातचा प्रवास करून आलो. गुजराती आवृत्तीच्या दहा हजार प्रती संपण्याच्या मार्गावर आहेत. दिल्लीमध्ये डॉ. मोहनजी भागवत यांची तीन भाषणे झाली. त्यात त्यांनी राज्यघटनेची उद्देशिका वाचून दाखविली. अख्तर यांच्या बखतरमध्ये ही उद्देशिका असेल की नाही माहीत नाही, पण ती त्यांनी जरुर वाचली पाहिजे; गझल करण्यासाठी नाही, पण समजून घेण्यासाठी. आणि थोडे संघ वाङ्मयदेखील वाचले पाहिजे. फार वाचण्याची गरज नाही. डॉ. मोहनजी भागवत यांची भाषणे वाचावीत. त्यामुळे थोडासा तरी संघ समजेल. काहीही न समजता बेलगाम टीका करणे, ही बखतरात बंद असलेल्या अख्तरांना शोभत नाही.

 

मोदीजींनी कधी इंदिरा गांधींची बरोबरी केली? हा तुमचा शोध आहे. ही खास डाव्या लोकांची युक्तिवाद करण्याची पद्धती आहे. इंदिरा गांधी, इंदिरा गांधी आहेत आणि नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी आहेत. एक चाफ्याचे फूल आहे, तर दुसरा कवठी चाफा आहे. अशा फुलांची तुलना केली जात नाही. आंबा, आंबा असतो आणि फणस, फणस असतो. दोन फळांची तुलना करायची नसते, त्यांचा आस्वाद घ्यायचा असतो. जगात कोणताही राजनेता एकासारखा दुसरा नसतो. अमेरिकेचा विचार केला तर जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन नसतात आणि अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन नसतात. परंतु, दोघांची बेरीज झाली की, जे उत्तर येते त्याचे नाव असते - अमेरिका. तसे इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या बेरजेतून जे उत्तर येईल ते - महासत्ता भारत. 

 
डावी खोपडी असलेल्या आणि बखतरमध्ये बंद असलेल्या अख्तर यांच्या डोक्यात हे किती जाईल, हे मी सांगू शकत नाही. अहंकारात डाव्यांची बरोबरी करू शकेल, असे भारतात कुणी नाही. गाडीखालून चालणाऱ्या कुत्र्याला उगाचच वाटत असते की, गाडी मीच ओढतो. त्याचा हा आत्मिक आनंद त्याला घेऊ दिला पाहिजे. भारतातील डाव्यांनादेखील असेच वाटते की, जी काही बौद्धिक संपत्ती आहे ती आपल्याकडेच आहे, बाकी सगळे निर्बुद्ध आणि संघातील तर निर्बुद्धातील निर्बुद्ध.
 

हा काळ कोणता आहे, हे अख्तर यांना समजले पाहिजे. “ये वक्त क्या है?” असा प्रश्न कवी अख्तर एका कवितेत करतात, ते म्हणतात,

 

ये वक्त क्या है?

ये क्या है आखिर?

कि जो मुसलसल गुजर रहा है,

ये जब न गुजरा था, तब कहाँ था

कहीं तो होगा,

गुजर गया है तो अब कहाँ है?

कहीं तो होगा,

कहाँ से आया, किधर गया है?

ये कब से कब तक का सिलसिला है?

ये वक्त क्या है?”

ये वक्त क्या है’ या प्रश्नाचे उत्तर आहे -

ये वक्त है, राष्ट्रप्रेम का

देशपर मरने मिटने का

देश के लिये जिने का

देश के लिये कवी बनने का

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@