हरिनामाचा अलौकिक प्रकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
कलियुग आणि विज्ञानयुग हातात हात घालून वावरत आहे. ‘भौतिकाचे शोध’ आणि ‘दूर जाणाराबोध’ यांची सांगड घालण अवघड! कलि बुद्धीमध्ये शिरलेला असल्यावर सत्याचा बोध कसा होणार? शोधामधून शाश्वत सुखाची प्राप्ती करणे म्हणजे मृगजळामागे धावणं! देहालायंत्रामुळे आराम मिळाला तरी, मनाचा आराम हरवला आहे. मनाला विश्रांती मिळाली की, ते ताजेतवाने, टवटवीत होते. मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी काय करावे, हे फार कमी लोकांना ज्ञात असते. बहुतेक सगळे संपत्ती, सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करताना दिसतात. पैसा, पद, प्रसिद्धी या तीन ‘प’पासून मनाला प्रसन्नता लाभणं कदापि शक्य नाही. आसक्त मनाच्या पायावर उभी राहणारी जीवनाची इमारत मजबूत कशी असेल, याचा खोलवर विचार करायला कोणाला वेळ नाही आणि त्याची आवश्यकता लक्षातही येत नाही.
 

नको त्या गोष्टी मनात साठल्या की, जीवन आनंदी कसं राहील? मनामध्ये लोभाचा, मोहाचा क्षोभ उसळला की, निरागसता नष्ट होते. संवदेनशीलता, सामंजस्य आणि संयम हे तीन ‘स’ समूळ नष्ट झाल्यावर विवेक कसा जागृत होणार? सारासार विचार येणार नाहीत. योग्य व अयोग्यातील फरक कळत नाही तोपर्यंत जीवनाला अर्थ नाही. अर्थप्रधानता असली की जीवन अर्थहीन होतं. मग निराशा, नैराश्य यामधून नकारात्मकता मनाला घेरते. अशा आत्मघातकी अवस्थेत माणसाकडून आत्म्याचा व परमात्म्याचा शोध होणं असंभव आहेशरीर विकलांग झालं तरी, मन विकलांग होणं फार धोकादायक आहे. हे सगळे धोके संतांना उमगले आणि त्यांनी मना...मनाला तसेच समाजमनाला सुदृढ करण्याचं व्रत अंगीकारलं.

 

ओढाळ, अशांत मनाला शांती लाभण्याचा उपाय शोधून काढला. या अवखळ मनाला संतांनी हरिनामाचा सोपा सुलभ मार्ग दाखवला.हरीचे सगुण रूप, सगुणाची भक्ती यामध्ये मन रमलं की इतर गोष्टी आपोआप दूर होतात. मनाची शक्ती भलतीकडे गेली की, ती क्षीण होणं स्वाभाविक आहे. हीच शक्ती भगवंताच्या भक्तीकडे वळली की तिची ताकद वाढते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दुर्गणी, पापी माणसांना प्रेमानं जवळ केलं. त्यांना नामाच्या नादाला लावलं. त्यामुळे इतर वाईट नाद आपोआप दूर झाले नामाच्या नादांन अवघ आगुण्य भरुन गेलं की रामनामाचा अनाहत नाद झंकारल्याशिवाय राहत नाही. राममय मन होण्यासाठी मनात नामाची वीणा झंकारायला हवी. मनात रामाने प्रवेश केला की रावण आपोआप नष्ट होतो. सत आणि असत दैवी आणि दानवी यांचे युद्ध कलियुगात चालू आहे. दानवांचा पराभव तर देवांचा जय होण्यासाठी ‘नाम’च या ब्रह्मास्त्राचा उपयोग करायला हवा. गोंदवलेकर महाराजांनी सगळ्या दुर्बलांना, दुर्जनांना रामानामाचे प्रभावी अस्त्र कसे वापरायचे याचे धडे दिले. त्यामुळे अनेकांच्या जीवनात पुनश्चआशयघनता आली. ते सकल समाजाला ठामपणानं सांगत-

 

जेथे नाम तेथे राम

 

नामाने मन भरलं की मनावरचा मणा मणाचा भार हलका होऊन जातो. असाच आत्मानुभव समर्थ रामदास स्वामींनी सांगितला. मनाला विश्रांती मिळण्याचे हमखास स्थान ‘रामनाम’ होय. त्यांनी रामरायाचा ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र देऊन समाजमनाला सशक्त, सुदृढ केलं. मनाच्या गाभ्याऱ्यात श्रीरामाच्या मंत्राचा, नामाचा निनाद घुमला की, त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात. रामदास स्वामी रामनामामुळे रामभक्तीमुळे समर्थ झाले. सकल समाजाला सजग करण्यासाठी २०५ मनाच्या श्लोकांची निर्मिती केली. मनाला उपदेश करणारे मनाचे श्लोक हे मनाचे ‘टॉनिक’ आहे.

 

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

 

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी रामाचं चिंतन करण्याचा त्यांनी अमूल्य उपदेश केला. प्रभात समयी त्यांनी संसाराच्या विचारांनी चिंता करून काही उपयोग नाही. रामाचं चिंतन केलं की, चिंता आपोआप दूर पळतात. मनावरची काजळी झटकण्याचा आणि सुयोग्य विचार करून प्रसन्नताप्राप्तीचा मार्ग म्हणजे दिवसाच्या प्रारंभी रामनाम व त्यांच्या गुणांचे चिंतन होयदत्तसंप्रदायातील थोर संत असणाऱ्या विष्णुदास महाराजांनी उपासनेचा सुंदर मार्ग दाखवला. भय, चिंता, काळजी यांनी भरलेले मन भगवंताच्या म्हणजे दत्ताच्या उपासनेने भरून टाकलं की भय हमखास संपून जाते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा।या सिद्धमंत्राचा जप सदैव केला की मन मजबूत होत जातं. निर्भयतेची प्राप्ती होते.हळूहळू लोभाची जागा नि:स्पृहता घेते. आसक्तीचं रूपांतर विरक्तीमध्ये होतं. संत तुकारामांनी विठ्ठलनामाचं महत्त्व लक्षात घेऊन विठ्ठलनामाची शक्ती अनुभवली. आपलाअनुभव अभंगातून अनेकांना कथन केला. विठ्ठलनामासारखे रामबाण औषध अन्य कोणतेही नसल्याचा निर्वाळा दिला. विठ्ठलाचं नाम भवसागरातून तरून जाण्यासाठी उपयुक्त असल्याची आत्मानुभूती विशद केली. संत ज्ञानदेव, संत नामदेव यांनीदेखील हेच सांगितले.

 

हरिमुखे म्हणा... हरिमुखे म्हणा...

पुण्याची गणना कोण करी॥

 

‘हरिपाठ’ हा महत्त्वाचा असून, ‘हरीकडे पाठ करणारा’ भवरोगातून मुक्त होणं शक्य नाही. परंतु, अखंड हरिनाम हा मनाच्या समस्त रोगांवरील उत्तम उपाय आहे. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या जीवनाचं सोन होतं. मनाच्या व्यथा, वेदना, क्लेश, चिंता नष्ट होतात. मन हरिनामाच्या प्रकाशाने उजळतं. मग मनाला चैतन्याची ओढ लागते. अपूर्व प्रकाशात आजच्या युगातहीसदैव परमार्थाच्या प्रगतिपथावर दमदार पावलं टाकत भक्त चालत राहतात.

 

- कौमुदी गोडबोले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@