प्रकाशबापूंचा कच्चा लिंबू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुळातच कच्चा लिंबू असल्याने त्याच्या म्हणण्याकडे ना कोणी लक्ष देत, ना कोणी थेट झिडकारून टाकत. तेव्हा मात्र हा कच्चा लिंबू मानभावीपणाने ‘मी नाही येणार बुवा तुमच्यात,’ असे म्हणत स्वतःच फार मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात वागताना पाहायला मिळते. आज काँग्रेसशी डाव मोडल्याचे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची अवस्था अगदी तशीच झाल्याचे दिसते.
 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी संभाव्य आघाडी तोडण्याची घोषणा केली व आठवला तो कच्चा लिंबू! आपल्याला माहितीच असेल की, कोणी विचारत नसले तरी मध्ये मध्ये करत ‘मला तुमच्यात घ्या, मला तुमच्यात घ्या’ असे म्हणत कच्चा लिंबू जिथे-तिथे लुडबुडण्याचे काम सातत्याने करत असतो. पण मुळातच कच्चा लिंबू असल्याने त्याच्या म्हणण्याकडे ना कोणी लक्ष देत, ना कोणी थेट झिडकारून टाकत. तेव्हा मात्र हा कच्चा लिंबू मानभावीपणाने ‘मी नाही येणार बुवा तुमच्यात,’ असे म्हणत स्वतःच फार मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात वागताना पाहायला मिळते. आज काँग्रेसशी डाव मोडल्याचे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची अवस्था अगदी तशीच झाल्याचे दिसते. दुसरीकडे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून पेशवाई, मनुवादी, ब्राह्मण्यवादी, जातीयवादी आदी विखारी शब्दांची पेरणी करून एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करण्याचे उद्योग प्रकाश आंबेडकरांनी केल्याचे सर्वच जाणतात. कोरेगाव-भीमा व वढू बुद्रुक येथून उसळलेल्या दंगलीने तर आंबेडकरांच्या विशिष्ट समाजद्वेषी, समाजद्रोही राजकारणाने जातीयतेचा कळस गाठला. वर पुन्हा ही दंगल हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनीच केल्याचे म्हणत राज्यातल्या जनतेने चोराच्या उलट्या बोंबांचाही अनुभव घेतला. मात्र, प्रकाशबापूंचा हा कांगावा काही फार काळ टिकला नाही व त्यांनी स्वतःच चौकशी आयोगासमोर हिंदुत्वनिष्ठांचे नाव घेण्याऐवजी शेपूट घालणेच इष्ट समजले. अर्थातच प्रकाश आंबेडकरांनी हे सगळेच कारनामे केले ते राज्याच्या राजकारणात व अनुसूचित जाती-जमातींच्या गटातटांत स्वतःची स्पेस निर्माण करण्यासाठीच, हे कोणीही सांगू शकेल. चांगले काही करण्याची क्षमता नसली की वाईट कामे करून नक्कीच प्रसिद्धी मिळते व लोकांनाही मागे-पुढे फिरवता येते, असे म्हणतात. प्रकाश आंबेडकरांनीदेखील हाच उदात्त, उन्नत अन् उत्तम विचार आपल्या कारवायांमागे ठेवला असेल.

 

एका बाजूला आंबेडकरांच्या या उचापत्या चालू असतानाच रा. स्व. संघाशी आम्ही उभा दावा मांडल्याचे म्हणणाऱ्या काँग्रेसच्या गोटात शिरण्यासाठी त्यांनी संघाला संवैधानिक चौकटीत बसविण्याचीही मागणी केली. आपल्या या चातुर्याची तारीफ करत काँग्रेसवाले निदान थोडाफार तरी भाव देतील, असेही प्रकाश आंबेडकरांना वाटले असेल. म्हणूनच गेले दीड-दोन महिने प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी, जागावाटप करण्यासाठी तयार असल्याचे चित्र निर्माण झाले व आंबेडकरांनीही तसे बऱ्याचदा बोलून दाखवले. पण काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांचा वकूब व पात्रता, मागे उभी ठाकलेली (!) जनता या सगळ्यांची चांगलीच कल्पना असल्याने राज्यापासून ते केंद्रापर्यंतच्या नेतृत्वाने त्यांचा फुटबॉल करण्यातच शहाणपण मानले. कधी चार जागा, कधी १० जागा तर कधी २२ जागा मागणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या याचनेकडे काँग्रेसने ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी प्रकाश आंबेडकरांकडे कच्चा लिंबू होण्याची संधी चालून आली व त्यांनी स्वतःच काँग्रेसबरोबर न सांधलेल्या आघाडीत बिघाडी झाल्याचे जाहीर केले.

 

वस्तुतः बुद्धीमान असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी भारतीय राजकारणाचा व त्यातल्या त्यात काँग्रेसचा तरी व्यवस्थित अभ्यास करायला हवा होता. काँग्रेसने अनुसूचित जाती-जमातीतील समाजाच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी निवडणुका आल्या की, निळ्या झेंडेवाल्या कोणाला तरी हाताशी धरण्याचे धोरण प्रत्येकच वेळी अवलंबले. सोबतच आंबेडकरी जनतेची मते बळकावण्यासाठी रा. स्व. संघ व भाजपच्या नावाने खडे फोडत जातीयवादाचे भूत दाखविण्याचे कामही काँग्रेस करत आली. अनुसूचित जाती-जमातीची मते पदरात पाडून घ्यायची आणि संबंधित नेत्याची एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदी वा आमदारपदी बोळवण करायची, हेही काँग्रेसनेच केले. वंचित समाज निपचित पडून राहिल, असेच डावपेच काँग्रेसने आखले. अशा पक्षाबरोबर प्रकाश आंबेडकरांनी जाणे किती संयुक्तिक होते? बरे, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसींच्या इतक्या मिनतवाऱ्या केल्या, प्रस्ताव ठेवले, विनंती केली तरी त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम त्या पक्षाच्या नेत्यांनी केले. खरे म्हणजे इतकी वर्षे अनुसूचित जाती-जमातीच्या, आंबेडकरी समाजाच्या मतदारांनी काँग्रेससह समविचारी पक्षांना पोसले, त्यामुळे काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांशी जुळवून घ्यायला प्राधान्य द्यायला हवे होते. पण आंबेडकरी जनतेचा वापर करून घेण्यातच पटाईत असलेल्यांनी ते न करता प्रकाश आंबेडकरांना वाऱ्यावर सोडले. म्हणूनच आतातरी अनुसूचित जाती-जमाती समाज व आंबेडकरी जनता तसेच प्रकाशबापूंच्या मागे जाणाऱ्यांनीही काँग्रेसचा हा उद्दामपणा लक्षात ठेवावा व अद्दलही घडवावी. तरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसलाही वंचित, शोषित, बहुजन, पीडित समाजाची ताकद कळेल व ते जागेवर येतील. अर्थातच या सगळ्याच घडामोडी मतदारराजासमोरच घडत असल्याने तो नक्कीच आपल्या स्वाभिमानासाठी मतदानाच्या दिवशी बाहेर पडेल, असे वाटते.

 

आणखी एक मुद्दा म्हणजे राज्यातल्या विरोधी पक्षाचा. आज प्रकाश आंबेडकरांपाशी सत्तेत येण्याइतकी शक्ती दिसत नसली तरी ते राज्याच्या राजकारणात नक्कीच स्वतःची स्पेस निर्माण करू शकतात अन् तेही काँग्रेसला बाजूला सारूनच. प्रकाश आंबेडकरांनी यासाठी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, दक्षिणेतील एआयएडीएमके, डीएमके, तेलुगू देसम या पक्षांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. वरील सर्वच पक्षांनी काँग्रेसच्या इतरांना लाथाडून टाकण्याच्या अहंकारी वृत्तीशी संघर्ष करून स्वतःचे स्थान निर्माण केले. काँग्रेसला संपवूनच हे पक्ष आज त्या त्या राज्यात प्रबळ झाले व कधी का होईना सत्तेतही आले. आता हे पक्ष काँग्रेसला जवळही घेत नाहीत, कारण काँग्रेसचे राजकारण व दोघांचाही एकच मतदार, हे होय. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातही असे राजकारण करून आपली यशस्वी कारकीर्द नक्कीच घडवू शकतात. आज काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसकडे खंदा नेता असल्याचे दिसत नाही. परिणामी विरोधकांची स्पेस व्यापून टाकण्याची एक चांगली संधी प्रकाश आंबेडकरांपुढे आल्याचे वाटते. आपला झगडा भाजपशी नव्हे तर आश्वासने देऊन आशेला लावून नंतर फेकून देणाऱ्या काँग्रेसादी पक्षांशीच आहे, हे प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांनीही समजून घ्यावे. तरच प्रकाशबापू कच्चा लिंबूवरून पुढची उडी मारतील! मोठा पल्ला गाठतील!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@