डॉ. सुजय विखेंचा अखेर भाजपप्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 

काँग्रेसला मोठा धक्का, लोकसभासाठी भाजपकडून शिफारस

 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांच्या उपस्थितीत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांचा भाजपप्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात असून विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याची अतिदुर्मीळ घटना यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून, त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची मान्यता मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. डॉ. सुजय विखे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी त्यासाठी बांधणीही सुरू केली होती. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. ती काँग्रेसला सोडली जाईल, अशीही आशा त्यांना होती. मात्र नेहमीप्रमाणे सुरुवातीला हो-ना करत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा राष्ट्रवादीचीच आहे, असा दावा केला. त्यानंतर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला. डॉ. सुजय यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र ते सगळे प्रयत्न फोल ठरले आणि मंगळवारी दुपारी सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

डॉ. सुजय यांचा भाजप प्रवेश आणि त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सुजय विखे-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. मात्र भाजपमध्ये सुजय विखे यांचे नेतृत्व चांगल्याप्रकारे उदयास येईल. त्यामुळे पक्षानेही त्यांच्याबाबत योग्य असा निर्णय घेताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी देण्याचे सर्वाधिकार संसदीय समितीकडे आहेत. मात्र आमच्याकडून झालेल्या शिफारशीला मान्यता मिळेल, असा विश्वास आहे. डॉ. सुजय यांना घरच्यांच्या मताविरोधात भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला पण त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे काही दिवसांनंतर त्यांच्या घरच्यांच्याही लक्षात येईल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

राष्ट्रवादीच्या अडेलतट्टूपणामुळे आघाडीत बिघाडी

 

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यावर सुरुवातीला शरद पवारांनी अडखळत का होईना होकार कळवला होता. पण नंतर पक्षाचे तसे म्हणणे नसून पक्षाचे राज्यातील नेते याबाबत काय तो निर्णय घेतील, अशी भूमिका पवारांनी घेतली होती. त्यानंतर अलीकडे दोनच दिवसांपूर्वी,“सुजय विखे यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत योगदान काय?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर विखे पिता-पुत्र काय ते समजून गेल्याचे बोलले जाते. अखेर जागेचा तिढा सोडविण्यासाठी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याचीही माहिती होती. मात्र राष्ट्रवादीच्या अडेलतट्टूपणामुळे शेवटपर्यंत जागेचा हा तिढा काही सुटला नाही आणि डॉ. सुजय थेट भाजपमध्ये रवाना झाले.

 

देशाच्या संरक्षणासाठी पंतप्रधान मोदी यांनी उचललेल्या पावलांनी मी प्रभावित झालो. कुटुंबीयांचा विरोध पत्करून मी भाजपमध्ये आलो, याची थोडी खंत वाटते. पण मी माझा हा निर्णय योग्य असल्याचं कुटुंबीयांना दाखवून देईन व अहमदनगर जिल्ह्यात भाजप जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न करेन.”

- डॉ. सुजय विखे-पाटील

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@