'राजा' एकटा ! एकमेवाद्वितीय आमदार शरद सोनावणेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019
Total Views |



 

मुंबई : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार सोनवणेंना शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश दिला.

 

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. आज सोमवारी दुपारी सोनावणेंचा शिवसेनेत रीतसर प्रवेश झाल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. २००९ मध्ये मनसेचे तेरा आमदार होते. मात्र २०१४ मध्ये हा आकडा एकवर आला. शरद सोनावणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवत मनसेची लाज राखली होती. मात्र, आता मनसेचा हा एकमेव आमदार देखील शिवसेनेत गेल्यामुळे मनसेची विधानसभेतील संख्या शून्य झाली आहे. शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारले गेल्याने त्यांनी शिवसेनासोडून मनसेत प्रवेश केला होता.

 

स्वगृहाची ओढ लागल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे आमदार सोनावणे यांनी प्रवेश करताना सांगितले. शिरुर लोकसभा मतदारसंघात खा. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना मोठा विजय मिळवून देणार, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी खा. आढळराव यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. विशेषतः या भागातील अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सोनावणे यांच्या प्रवेशाची घाई करण्यात आली.

 

बोलक्या 'राजा'ची मनसे कुठेच नाही!

भारत-पाकिस्तानपासून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत सर्वच विषयांवर मत व्यक्त करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेची राज्यातील अवस्था अक्षरशः केविलवाणी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात नगरसेवकांपैकी तब्बल सहा नगरसेवकांनी पक्षांतर केले. आता एकुलता एक आमदारही पक्ष सोडून गेले. बरेच नेते अन्य पक्षात गेले. पक्षाकडे असलेल्या नाशिक महापालिकेची सत्ताही गेली. राज्यातील एमआयएम, भारिप, माकप, जनता दल सारखे छोटे-छोटे पक्षही संख्याबलामध्ये मनसेच्या कितीतरी पुढे निघून गेल्याचे चित्र मनसैनिकांना मात्र भयंकर अस्वस्थ करत आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@