हिंमत नव्हती, त्याचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019
Total Views |




आमच्या काळात आम्ही १२ एअर स्ट्राईक केले म्हणणार्‍या मल्लिकार्जुन खर्गेंनी उत्तर द्यावे की, काँग्रेसी गुलाम पाकिस्तानातील दहशतवादी शिबिरे संपविण्यासाठी तिकडे गेले होते काय, म्हणून ही कारवाई तिन्ही सैन्यदलांपासूनही लपून राहिली? खरे म्हणजे बुळेपणा ठासून भरलेल्या काँग्रेस सरकारने तेव्हाही काही केले नाही नि आताही ते एअर स्ट्राईकचे कर्तृत्व नाकारतानाच दिसतात.


काँग्रेस आघाडीने १० वर्षांच्या कार्यकाळात १२ एअर स्ट्राईक केले मात्र
, आम्ही त्याचे कधीही राजकारण केले नाही,” असा एक अफलातून दावा काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते व खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकताच केला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती जिहाद्याने केलेल्या हल्ल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पुढे भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत ‘आम्ही अणुहल्ल्याच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही’चा संदेश दिला. सुरुवातीला भारताने एअर स्ट्राईक केल्याचे मान्य करणार्‍या पाकिस्तानने व देशातल्या विरोधी पक्षीयांनीही नंतर मात्र त्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. पाकिस्तानने तर असा हल्लाच झाला नसल्याचे म्हटले तर काँग्रेससह इथल्या तमाम शंकासुरांनी सरकारकडे एअर स्ट्राईकचे ‘पुरावे द्या’चाच धोशा लावला. म्हणजेच पाकिस्तान आणि विरोधकांचे शब्द एकच झाले, पण त्याचवेळी केवळ एवढे करून भागणार नाही, हेही काँग्रेसला कळून चुकले.

 

पाकिस्तान व दहशतवादाविरोधात देशातली १३० कोटी जनता सुडाने पेटून उठलेली असताना नुसत्याच एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपणही काहीतरी कर्तबगारी केल्याची बढाई मारणेही काँग्रेससाठी आवश्यक होते. म्हणूनच ज्यांनी १० वर्षांच्या कार्यकाळात तोंडावरची माशी मारण्याची कामगिरी करतानाही मागेपुढे पाहिले, त्यांनीही लढाऊपणाच्या फुशारक्या मारायला सुरुवात केली. जनतेला आपल्या कथित शूरपणाच्या कथा ऐकवल्या तर ४४ मध्ये एखाददुसर्‍या जागेची भर पडेल, असाही यामागे काँग्रेसी निष्ठावंतांचा होरा असावा. परिणामी गांधीघराणे शरणपरायणांच्या सुपीक डोक्यातून जन्म झाला तो डझनभर एअर स्ट्राईकचा! अर्थात स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसच्या कोणा सोम्यागोम्याने नव्हे तर एका अभ्यासू नेत्याने हे विधान केलेले असल्याने ते सत्यच असणार, याचीही खात्री सर्वसामान्यांना पटली. म्हणूनच देशातल्या जनतेनेही खर्गेंच्या वाणीवर विश्वास ठेवला व काँग्रेसच्या एअर स्ट्राईकचे दाखले द्यायलाही सुरुवात केली.

 

अगदी सुरुवातच करायची म्हटली तर संरक्षण दलांसाठी लागणार्‍या जीप खरेदीपासूनच केली पाहिजे आणि मल्लिकार्जुन खर्गेंच्या मनातल्या गोंधळाचेही समाधान करायला हवे. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने एअर स्ट्राईक हा काही सीमा पार करून दहशतवादी तळ नष्ट करण्याचा मुद्दा नव्हे तर देशाला पोखरून, जनतेला ओरबाडून भ्रष्टाचाराचे, लाचखोरीचे, दलालीचे निरनिराळे कारनामे करणे, हाच खरा एअर स्ट्राईक वा सर्जिकल स्ट्राईक असतो! मल्लिकार्जुन खर्गेंनी आधी हे समजून घेतले पाहिजे. काँग्रेसने आतापर्यंत फक्त डझनभरच नव्हे तर केंद्रासह राज्याराज्यांच्या सत्तेत असताना मोजण्यासाठी हातापायाची बोटे कमी पडतील, असे कितीतरी स्ट्राईक केले. बोफोर्स, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आदर्श, टूजी स्पेक्ट्रम, कोळसा खाण लिलाव, ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी, नॅशनल हेराल्ड प्रकरण, रॉबर्ट वडेरांचा जमीन ताब्यात घेण्याचा घोटाळा तर विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आदी बड्या माशांना भरमसाट कर्जवाटप करणे, असे कित्येक एअर/सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसने केले, तेही कशावर तर भारतीय अर्थव्यवस्थेवर, प्रशासकीय यंत्रणेवर. इंदिरा गांधींनी मात्र स्वपक्षीय इतिहासातील सगळ्याच स्ट्राईकला एका फटक्यासरशी बाजूला सारत थेट देशावर आणीबाणी लादण्याचा डेमोक्रेटिक स्ट्राईक केला.

 

भोपाळ विषारी वायुकांडानंतर प्रकरण दडपण्याचा, अँडरसनला पलायनासाठी मदत करण्याचा आणि इंदिराहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत हजारो शीख बांधवांचा जीव घेण्याचाही स्ट्राईक काँग्रेसनेच केला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र काँग्रेसच्या या वीरश्रीयुक्त स्ट्राईकचा साधा उल्लेखही केला नाही. खर्गेंचेही बरोबरच आहे म्हणा, कशाला उगीचच आपल्या गौरवास्पद, अभिमानास्पद कर्तृत्वाची उजळणी करायची व मोठेपण मिरवायचे, असे त्यांना वाटले असावे. शिवाय अशी उजळणी केली तर त्यावर राजकारण होण्याचाही धोका, अन् खर्गे तर म्हणालेच आहेत की, आमच्या स्ट्राईकचे आम्ही कधीही राजकारण केले नाही! परिणामी काँग्रेसने केलेल्या स्ट्राईकचा त्यांनी आकडा तेवढा सांगितला. पण खर्गेंनी चिंता करण्याची गरज नाही, कारण देशातल्या हुशार नागरिकांनी काँग्रेसच्या स्ट्राईकचा सगळाच तपशील बाहेर काढला आहे व सर्वांच्या नजरेसमोरही येत आहे आणि अर्थातच हीच जनता काँग्रेसच्या या सगळ्याच स्ट्राईकचा रोकडा हिशेबही येत्या दोन महिन्यांतच करणार आहे.

 

काँग्रेसच्या काळातील स्ट्राईकचा हा एक भाग झाला, आता दुसरा भागही पाहूया. मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात, त्याप्रमाणे २०१४ च्या आधी जर खरेच पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात कारवाई केलेली असेल तर नक्कीच त्याचे स्वागत केले पाहिजे. पण खर्गेंच्या विधानावरून काही प्रश्नही निर्माण होतात. काँग्रेस वा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी का कधी आपल्या सरकारने केलेल्या एअर स्ट्राईकची साधी माहितीही देशातल्या जनतेला दिली नाही? लोकशाही देशात जनता सार्वभौम असते, पण काँग्रेसला या सार्वभौम जनतेला आपल्या कार्यकाळातील एअर स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करण्याची जबाबदारीही कळत नव्हती का? म्हणजेच आपण जनतेला उत्तरदायी नाही, असेच काँग्रेसचे धोरण होते का? की गोपनीयतेच्या निकषामुळे काँग्रेसने ही माहिती देणे टाळले? तसेच असेल तर मग ही माहिती लष्कराला, प्रसारमाध्यमांना तरी कशी समजली नाही? की काँग्रेसी गुलाम पाकिस्तानातील दहशवादी शिबिरे संपविण्यासाठी तिकडे गेले होते, म्हणून ही कारवाई तिन्ही सैन्यदलांपासूनही लपून राहिली? बरं, काँग्रेसने अशी काही स्ट्राईक केली असेल तर मग २००८ सालचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा त्या एअर स्ट्राईकला दिलेले उत्तर होते का? सोबतच आता मोदी सरकारच्या दोन्ही स्ट्राईकनंतर जसा संपूर्ण जगातून भारताला पाठिंबा मिळाला, तसा ‘त्या’ दहा वर्षांत का कधी मिळाला नाही? या प्रश्नांची उत्तरे मल्लिकार्जुन खर्गे देतील का? खरे म्हणजे भारतीय सैन्यदलांत पाकिस्तानच्या अन् दहशतवाद्यांच्या प्रत्येक वाराविरोधात पलटवार करण्याची, शत्रूला नेस्तनाबूत करण्याची क्षमता आणि शक्ती तेव्हाही होती व आताही आहेच. पण देशाच्या सैन्यदलांना मोदींच्याआधी मिळालेल्या राजकीय नेतृत्वात बुळेपणा ठासून भरलेला होता, म्हणूनच देशभरात एकामागोमाग बॉम्बस्फोट होत राहिले आणि यांच्या तोंडातून ‘कडी निंदा’ व्यतिरिक्त काहीही निघाले नाही.

 
मुसलमानी मतांच्या लाचारीपायी काँग्रेसने पाकिस्तान वा दहशतवाद्यांविरोधात कधीही कठोर भूमिका घेतली नाही अन् असे लोक आज मोदींविरोधात सवाल करतात, एअर स्ट्राईकचे पुरावे मागतात व स्वतःची महती गाताना दिसतात! अरे तुम्हा लोकांना तर सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात, हेही माहिती नव्हते, तो करणे तर दूरच! एअर स्ट्राईकचा तर तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नव्हता! कारण देशसुरक्षेवरील निष्ठेचा अभाव! अन् अशी माणसे आज आम्ही यंव केले, त्यंव केले म्हणतात! अर्थात इतक्या वर्षांनी का होईना काँग्रेसी लोकांच्या मनात आपण असे काही केल्याचे खोटे का होईना, सांगण्याची हिंमत आली, ते बरेच झाले. पण ही हिंमतही कोणामुळे आली, तर विद्यमान केंद्र सरकारमुळे, नरेंद्र मोदींमुळे, हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. कारण त्यांच्या सत्ताकाळात तर असे काही बोलण्याचीही काँग्रेसींची हिंमतच होत नसे, कारवाई करणे तर लांबचीच गोष्ट!
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@