लहरी राजा, प्रजा शहाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता कदाचित मनसैनिक त्याचे उत्तर गर्वाने देऊ शकतील की, आम्हाला लोकांना घराबाहेर काढून मारण्याचा तरी कार्यक्रम मिळाला. अर्थात, हा कार्यक्रमही किती दिवस टिकेल, याची शाश्वती मनसैनिक देणार नाहीत. ‘टोल’च्या वेळी पोळून निघाल्याने ‘ट्रोल’च्या वेळी ते थोडे अधिक सावध असतील.
 

लोकशाहीमधील ‘लोक’ अर्थात, आपले राज्यकर्ते निवडून देणारी जनता हा एक अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. या जनतेच्या मनात काय चाललेय, ही जनता काय करेल, आपल्याला सिंहासनावर बसवेल की घरी बसवेल, याचा थांगपत्ता भल्याभल्या, धुरंधर-मुत्सद्दी वगैरे म्हणवून घेणार्‍यांनाही लागत नाही. त्यातही या जनतेला गृहीत धरण्याची चूक कुणीही मुद्दाम किंवा अगदी नकळत जरी केली तरी त्याची साडेसाती सुरू झालीच म्हणून समजा. भारतीय लोकशाहीच्या गेल्या सत्तरेक वर्षांच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतील.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यातील अगदी ताजे उदाहरण. राजकारण, राज्यव्यवस्था आणि पक्षसंघटना ही जणू आपली खासगी मालमत्ता आहे, आपण जे काही म्हणू ते लोक ऐकतील आणि आपल्यामागे धावतील अशा भ्रमात राहिल्यानंतर काय होते, हे राज ठाकरे आणि मनसेच्या गेल्या तेरा वर्षांच्या वाटचालीतून दिसून येते. खरेतर शनिवारचा कार्यक्रम मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. बाकी राजकीय सभा, आरोप-प्रत्यारोप होतच असतात परंतु वर्धापन दिनासारखे कार्यक्रम रोज येत नाहीत. आपली पक्ष आणि संघटना तळागाळात पोहोचली की तळात आणि गाळात पोहोचली, याचे चित्र स्पष्ट करणारे, आत्मपरीक्षण करण्याची संधी देणारे हे कार्यक्रम असतात. आपला नेता आपल्याला काय कार्यक्रम देतो, कार्यकर्ता म्हणून आपण आपल्या श्रद्धा या पक्षाला अर्पण केलेल्या असताना आपल्यातील उर्जेला आपला नेता काय दिशा देतो, याची वाट सर्वसामान्य कार्यकर्ते अशावेळी आतुरतेने पाहत असतात. या साऱ्या कसोट्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बघितला तरी राज आणि मनसेला जनता का वारंवार नाकारते, हे आपल्या लक्षात येईल.

 

मनसे लोकसभा निवडणुका लढवणार की नाही, याच्या चर्चा गेले दोन-तीन आठवडे जोरात सुरू आहेत. यातला ‘पॉलिटिकल गॉसिप’चा भाग वगळला तरी मनसेच्या (उरलेल्या) कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय असेल, याची उत्सुकता होतीच. वर्धापन दिनासारख्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या या उत्सुकतेला राज यांनी उत्तर काय दिले? “मला जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो मी तुमच्यासमोर नंतर जाहीर करेन,” असे एक काहीसे तुच्छतादर्शक वाक्य फेकून ते मोकळे झाले. पक्षाचा अध्यक्ष आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय किंमत देतो, हे यातून दिसते. मी काय तो निर्णय घेईन, माझे मी बघून घेईन वगैरे स्टाईलची वाक्य आणि त्यातले ‘मी’पण तुमची खरी मानसिकता दाखवून देत असतात. राज ठाकरेंनी या भाषणात ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’चा बराच वापर केला. राजकीय सभांच्या ठरलेल्या चौकटीपेक्षा काही वेगळा प्रयोग म्हणून याकडे जरूर बघता येईल. परंतु, या प्रेझेंटेशनमध्ये स्वतः एक कलाकार आणि व्यंगचित्रकार असलेल्या राज यांनी दिले काय? तर समाजमाध्यमांवर गेल्या महिन्याभरात इकडेतिकडे येऊन गेलेला मजकूरच पुन्हा एकदा दाखवला. फेसबुक-ट्विटरवरून आणि काही वृत्त संकेतस्थळांच्या बातम्या, छायाचित्र उचलून ती त्या प्रेझेंटेशनमध्ये चिकटवली. एका स्वतंत्र पक्षाचा अध्यक्ष, जो या राज्याच्या राजकारणात साधारण पंचवीसेक वर्षं कार्यरत आहे, त्याला एक ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’देखील स्वतःच्या मुद्द्यांवर देता येऊ शकत नाही. त्यातही पुन्हा राज यांना जे दाखवायचे होते, ते संगणकापुढे बसलेल्यांना मिळाले नाही, त्यामुळे ते पडद्यावर दिसले नाही, असेही दोन-तीनदा घडले. तांत्रिक चूक म्हणून एकवेळ याकडे दुर्लक्ष करताही येईल परंतु त्यानंतर समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया पाहा. “जो नेता नीट प्रेझेंटेशन देऊ शकत नाही, तो राज्य काय चालवणार?” अशा शब्दांत लोकांनी या सर्व प्रकाराचे वाभाडे काढलेत.

 

आता हे लोक म्हणजे ट्रोल असे म्हणून राज ठाकरे मोकळे झालेत. त्यामुळे या लोकभावनेलाही कदाचित राज तुच्छच लेखत असतील. आपल्या कुठल्याही गोष्टीला जर कोणी शिव्या घातल्या तर त्यांना घराबाहेर काढून मारायचे, असेही राज यांनी सांगितले आहेच. त्याबाबतीत प्रकाश आंबेडकरांचा कित्ता त्यांनी गिरवला, असे मानता येईल. त्यामुळे आता समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतानाही आता सर्वसामान्य जनतेला काळजी घ्यावी लागेल. चुकून एखादा मनसैनिक घराबाहेर येऊन उभा राहील, याची आता शाश्वती देता येणार नाही. कारण राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना तसा कार्यक्रमच दिला आहे. राज यांनी पक्ष कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला?, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता कदाचित मनसैनिक त्याचे उत्तर गर्वाने देऊ शकतील की, आम्हाला लोकांना घराबाहेर काढून मारण्याचा तरी कार्यक्रम मिळाला. अर्थात, हा कार्यक्रमही किती दिवस टिकेल, याची शाश्वती मनसैनिक देणार नाहीत. ‘टोल’च्या वेळी पोळून निघाल्यामुळे ‘ट्रोल’च्या वेळी ते थोडे अधिक सावध असतील. बाकी राज ठाकरेंनी पाकिस्तान आणि पुलवामा हल्ला, वायुसेनेच्या ‘एअर स्ट्राईक’च्या विषयात जी काही वक्तव्यं केली त्याबाबत इथे फारसे काही भाष्य करण्याची गरजच नाही. शिवाय, पाकिस्तानी मीडिया त्यावर भाष्य करेलच कारण आता राज यांची कीर्ती तिथपर्यंत पसरली आहे. शिवाय, राज यांनी ज्या संकेतस्थळांचे संदर्भ दिले, त्यांचे खरे चेहरे गेल्या काही दिवसांत उघड झालेच आहेत. एका संकेतस्थळाने पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या जाती शोधून काढण्याचा हलकटपणा नुकताच केला, आणि हे असे लोक आता राज यांना प्रिय वाटू लागले आहेत. आज बाळासाहेब असते आणि त्यांनी ही अवस्था पाहिली असती तर काय झाले असते, याचा विचारही न केलेला बरा.

 

बाकी राज यांना आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक राजकारणातले किती आणि काय कळते, हे जाणून घ्यायचे असेल तर डोकलामबद्दल ते जे काही बोलले ते जरूर बघावे. आपल्या विरोधकांना तुच्छ लेखण्याची ही त्यांची एक खास शैली आहे. लोकांची नावे उगाचंच विसरल्यासारखे दाखवून मागे बसलेल्यांना ती नावे विचारायची. म्हणजे जणू मी यांना काही किंमत देत नाही, ते किती किरकोळ आहेत, असा एक संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न. राजकीय विरोधकांबाबत बोलताना हे ठीक वाटेलही परंतु डोकलामसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित नाजूक विषयात तुम्ही हे असे इतक्या उथळपणे बोलणार? काहीतरी पाचकळ विनोद करून लोकांना हसवता येते पण त्यांची मते नाही मिळवता येत. पक्षस्थापनेला १३ वर्षं होऊनही राज यांच्या हे लक्षात येत नसावे किंवा अजूनही लोक आपल्या पाठीशी येतील, अशी भाबडी आशा त्यांना वाटत असावी. म्हणून मग कधीकाळी ‘मोदींना पंतप्रधान करा’ तर आता ‘मोदींनी देशाची वाट लावली’ अशा कोलांटउड्या राज मारत राहिलेत. आचारसंहिता लागली की तुम्ही काय करायचेय, ते तुम्हाला सांगेन, असेही राज आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले. पक्षाला फक्त आचारसंहिता काळात कार्यक्रम देऊन भागत असते तर कितीतरी पक्ष, नेते ‘पार्टटाइम’ राजकारणी नसते का झाले? गावोगाव हिंडणे, कार्यकर्त्यांचे जाळे जोडणे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणे, लोकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे, हे सगळे कशाला करावे लागले असते? हे सगळे दृश्य या लोकशाहीतले ‘लोक’ काळजीपूर्वक पाहत आहेत. नोंद घेत आहेत. म्हणूनच कदाचित या ‘राजा’ला साथ द्यायला कुणी तयार होत नसावे. जो असा कधीतरी उगवतो, काहीतरी बरळतो, ज्याला आपल्या पक्षाचा एक आमदारही टिकवता येत नाही, ज्याला आपल्या प्रश्नांचे गांभीर्यही नाही, असा ‘लहरी’ राजा आम्हाला नको, असे जनता आज स्पष्टपणे म्हणताना दिसते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@