राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. यात एका पैशाची दलाली नाही, एका रुपयाचा गैरव्यवहार नाही, असे ठामपणे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हे दोघेही सेवाव्रती व जीवनव्रती आहेत. त्यांच्या काळात कोणताही गैरव्यवहार होणे शक्य नाही, असा विश्वास भाजप वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
 

राफेल विमान सौदा पुन्हा एकदा चर्चेत आहे. राफेल विमान खरेदी सौद्याचे दस्तावेज चोरीस गेल्याचे केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यात आता खुलासा करण्यात आला आहे. जे दस्तावेज प्रसिद्ध झाले आहेत, ते चोरीला गेलेले आहेत, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील एक बाब मात्र स्पष्ट की, राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. यात एका पैशाची दलाली नाही, एका रुपयाचा गैरव्यवहार नाही, असे ठामपणे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हे दोघेही सेवाव्रती व जीवनव्रती आहेत. त्यांच्या काळात कोणताही गैरव्यवहार होणे शक्य नाही, असा विश्वास भाजप वर्तुळात व्यक्त केला जात आहे. दोघांनाही एक रुपया कमवायचा नाही. दोघेही एक ध्येय म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या काळात राफेलच काय कोणताही घोटाळा होऊ शकत नाही, असे भाजप नेत्यांना वाटते. भाजपध्यक्ष अमित शाह, भ्रष्टाचाराबाबत बोलताना, झिरो टॉलरन्सची भाषा बोलतात. ते पाई-पाईचा हिशेब ठेवतात. मग, कोणताही घोटाळा होण्याची शक्यताच नाही, असे भाजपनेत्यांना वाटत आहे.

 

कारगिलची कहाणी

 

राफेलवर उटलसुलट चर्चा होत असतानाच, काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात हवाई चकमक झाली आणि त्यात भारताने एक ‘मिग २१’ विमान गमावले. त्याच दिवशी भारतीय वायुदलाचे एक हेलिकॉप्टर श्रीनगरजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. नेमकी हीच कहाणी कारगिल युद्धात घडली होती. कारगिल कारवाईच्या पहिल्या दिवशी भारतीय वायुदलाच्या सहा मिग विमानांनी घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली. यात चार ‘मिग-२७’ विमाने होती तर दोन ‘मिग-२१’ विमाने होती. ‘मिग-२७’ विमाने हल्ल्यासाठी वापरली जातात तर ‘मिग-२१’ विमाने त्यांना सुरक्षा कवच पुरवित असतात. पहिल्या दिवशी फ्लाईट लेफ्टनंट नचिकेतच्या ‘मिग-२७’ विमानात बिघाड झाला. त्याने विमान सोडून, पॅराशूटसह उडी मारली. त्याचा शोध दोन ‘मिग-२१’ विमानांनी सुरू केला. त्यातील एक विमान स्क्वॉड्रन लिडर रेड्डी चालवित होते तर दुसरे विमान स्क्वॉड्रन लिडर अजय आहुजा चालवित होते. दोघांनीही नचिकेतचा शोध घेण्याचे काम सुरू केले. रेड्डी यांच्या विमानातील इंधन संपत आल्याने, आहुजा यांनी त्यास परत जाण्यास सांगितले व शोधमोहीम आहुजा यांनी आपल्याकडे घेतली. त्यावेळी एका मिसाईलने त्यांच्या विमानाचा वेध घेतला व ते कोसळले. नंतर पाकिस्तानी घुसखोरांनी अजय आहुजा यांना गोळ्या घालून ठार केले. पाकिस्तानी घुसखोरांना अजय आहुजा यांचे ‘मिग-२१’ विमान पाडता आले, कारण त्या विमानात मिसाईल शोध घेणारी अद्ययावत यंत्रणा नव्हती.

 

९३ विमान अपघात

 

भारतीय वायुदलाला आधुनिक विमानांची किती तातडीने गरज आहे, याची कल्पना सरंक्षण मंत्रालयावरील एका संसदीय समितीच्या अहवालावरून सहज करता येईल. या अहवालात २००७ ते २०१६ या काळात भारताने केवळ अपघातात गमावलेल्या विमानांची चर्चा करण्यात आली आहे. या काळात भारताने एकूण ९३ विमाने अपघातात गमावली. साधारणत: १६ ते १८ विमानांचा एक स्क्वॉड्रन असतो. म्हणजे या नऊ वर्षांच्या कालावधीत भारताने आपल्या वायुदलातील पाच स्क्वॉड्रन केवळ अपघातात गमावले. यातील ४४ विमाने मिग जातीची आहे. याच मिग विमानांनी कारगिल युद्धात भारताला दगा दिला आणि याच मिग विमानाने नुकत्याच झालेल्या चकमकीत भारताला झटका दिला. या मिग विमानांना ‘फ्लाईंग कॉफिन’ म्हटले जाते ते यासाठी. दोन-तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी आणखी एक ‘मिग-२१’विमान राजस्थानात कोसळले.

 

अपघातांचे विश्लेषण

 

या सर्व अपघातांचे विश्लेषण भारतीय वायुदलाने केले असून, त्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. अहवालाचे कारण, तांत्रिक की मानवी, याचाही शोध घेण्यात आला असून, मानवी दोष असल्यास तो वैमानिकाचा होता की ग्राऊंड सपोर्ट स्टाफचा होता, हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीचा होता, याचाही सविस्तर उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यानुसार ९३ पैकी ३६ विमान अपघातांचे कारण तांत्रिक होते, असे आढळून आले आहे. यातील बहुतेक विमाने मिग जातीची होती, हे विशेष. म्हणजे कालबाह्य झालेली मिग विमाने भारतीय वायुदलाला वापरावी लागत आहेत. भारताजवळ जग्वार, मिराज ही विमाने असली तरी जग्वार विमानेही जुनी होत आहेत. म्हणजे सारी दारोमदार सुखोई व मिराज विमानांवर आहे. भारतीय वायुदलाजवळ असलेल्या हेलिकॉप्टरचा ताफाही जुनाट होत आला असून, त्याचेही तातडीने नवीनीकरण केले जाणे आवश्यक आहे. चारच दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने, भारतीय वायुदल जुन्या काळातील विमाने कशी वापरीत आहे, याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. लढाऊ विमान भारतात तयार करण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये सुरू केला होता. त्यातूनच तेजस विमान तयार झाले. पण, ही विमाने तयार होण्याची गती भारतीय वायुदलासाठी पुरेशी नाही. आतापर्यंत फक्त दोन तेजस विमाने भारतीय वायुदलात सामील करण्यात आली आहेत. म्हणून भारत सरकारने नवी विमाने खरेदी करण्याचा शोध २००७ मध्ये सुरू केला होता. फ्रान्समध्ये तयार झालेले राफेल की काही युरोपियन राष्ट्रांच्या समूहाने तयारे केलेले युरोफायटर हे दोन पर्याय भारत सरकारसमोर होते. यातून भारताने राफेल विमानांची निवड केली. २०१५ मध्ये राफेल विमानांचा सौदा झाला. भारतीय वायुदलाला १२८ विमानांची आवश्यकता असताना, पैशाअभावी भारताला फक्त ३६ विमाने खरेदी करता आली. ही विमाने सप्टेंबरपासून भारतात येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि ३६ विमाने भारतात येण्यासाठी २०२२ उजाडावे लागेल.

 

पाकिस्तानची तयारी

 

दुसरीकडे पाकिस्तानजवळ कमी विमाने असली तरी अद्ययावत आहेत. पाकिस्तानही मिराज, एफ-१६, जेएस-१७ थंडर ही विमाने वापरीत असला तरी २०२५ पर्यंत आपले वायुदल आधुनिक करण्याचे त्याने ठरविले असून, आता त्याचा मुख्य भर चिनी बनावटीची जेएस -१७ थंडर विमानांवर आहे. ही विमाने पाकिस्तानात तयार केली जात आहेत. चीन-पाकिस्तान संयुक्त उपक्रमात ती तयार केली जात आहेत. २०२५ पर्यंत पाकिस्तानी वायुदलात एफ-१६ व थंडर ही प्रमुख दोनच जातींची विमाने असतील, असे सांगितले जाते.

 

तणाव कायम

 

भारत-पाकिस्तान यांच्या संबंधात हवाई चकमकीनंतर सध्या शांतता असली तरी, पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. पाक-अफगाण सीमेवरील जवळपास ९० हजार सैन्य त्याने भारत-पाक सीमेवर आणण्याचे काम सुरू केले आहे. २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळीबार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने १५५ मिलिमीटर तोफांचा वापर चालविला आहे. आपल्या आयुध निर्माणींना दारुगोळ्याचा पुरवठा वाढविण्यास सांगितले आहे. याला भारताकडूनही जोरदार उत्तर दिले जात असून, आणखी काही दिवस सीमेवर ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@