पालघर जिल्ह्याला बसला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |


 

पालघर : पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी तालुक्यात पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. आजवरचा हा सर्वात मोठा धक्का मनाला जात आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे घराला धक्के बसले असून काही ठिकाणी भिंतींना तडे पडले आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यासह गुजरातमधील उंबरगाव, सिल्वासा, वापीही या गावांनाही भूकंपाने हादरले बसले आहेत.

 

आजच्या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. आजपर्यंतच्या भूकंपांपेक्षा हा धक्का मोठा असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गुजरात सीमेपासून ते ठाणे परिसरापर्यंत या भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपासून जवळ जवळ ६ मध्यम स्वरूपाचे धक्के बसले त्यानंतर अकरा वाजून १४ मिनिटाला आतापर्यंत सर्वाधिक क्षमतेचा ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या तीव्रतेच्या नोंदीनुसार गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, वापी तसेच केंद्रशासित प्रदेशातील सेलवासपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील डहाणू ,तलासरी, पालघर, बोईसर, केळवे, सफाळे, विक्रमगड ,जव्हार भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाचा विस्तार वाढीस लागल्याचे जाणवू लागले आहे.

 

जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्यांमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रहिवाशांनी घराबाहेर झोपण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. यादृष्टीने त्यांच्या सोयीसाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून एनडीआरएफचे तंबू मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून शनिवारी या तंबूंचे संबंधित ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले आहे. त्या प्रमाणे ४२ ठिकाणी २०० तंबू उभारण्यात ही आले आहेत.

 

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या भागात रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे.

 

पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

 

११ नोव्हेंबर - ३.२ रिश्टर स्केल

२४ नोव्हेंबर - ३.३ रिश्टर स्केल

१ डिसेंबर - ३.१ आणि २.९ रिश्टर स्केल

४ डिसेंबर - ३.२ रिश्टर स्केल

७ डिसेंबर - २.९ रिश्टर स्केल

१० डिसेंबर - २.८ व २.७ रिश्टर स्केल

२० जानेवारी - ३.६ रिश्टर स्केल

२४ जानेवारी - ३.४ रिश्टर स्केल

१ फेब्रुवारी - ३.३, ३.५, ३.०, ४.१ रिश्टर स्केल

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@