मोदींमुळेच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |
 
 


सदैव नायकाच्या शोधात असलेल्या बुभुक्षितांनी राहुल, केजरीवाल, अखिलेश, कन्हैय्या, उमरनंतर इमरान खानला नायकत्व बहाल केले. स्वतःच्या देशाला मातृ-पितृभूमी मानण्याची लाज बाळगणारी ही जमात दुसर्‍याला पितृत्व देण्यात शहाणपणा मानू लागली. मात्र, अशा सगळ्याच बोलघेवड्यांना आज हे ठणकावून सांगावेच लागेल की, पाकिस्तान वठणीवर आला तो जिनिव्हा करारामुळे नव्हे तर त्या करारानुसार पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडणार्‍या मोदींमुळे आणि हे रण अभिनंदनच्या अटकेने वा सुटकेने ना सुरू झाले ना संपेल. जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी पिलावळ निपजत राहिल, तोपर्यंत ते सुरूच राहिल.

 

भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमानच्या सुटकेवरून देशातल्या लिबरल टोळक्याने इमरान खानची लाल करण्याचे उद्योग मोठ्या जोमात सुरू केले. लिबरल गोटाचा पोस्टर बॉय झालेल्या इमरान खानप्रति या लोकांचे प्रेम ओसंडून वाहू लागले. जिनिव्हा करारामुळेच पाकिस्तानने वर्धमानला सोडले, अशी विधाने ही मंडळी हिरीरीने करू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडला पण अभिनंदनच्या भारतात सुखरूप परतण्यात मोदींचा हात नाही, अशी विचित्र मांडणी या लोकांनी केली. मात्र, भारत व पाकिस्तानमध्ये आतापर्यंत झालेले द्विपक्षीय करार आणि पाकिस्तानची वागणूक याबद्दल कोणी चकार शब्दही काढला नाही.

 

वस्तुतः भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यापासूनच अनेकानेक करार-संधी झाल्याचा इतिहास सर्वांसमोर आहे. दोन्ही देशांत आतापर्यंत झालेल्या आग्रा, कराची, दिल्ली, लाहोर, शिमला, ताश्कंद अशा अर्धा डझनभर करारांची एक मोठी यादीच दिसते. शिवाय दोन्ही देशांतल्या शस्त्रसंधीचाही इथे उल्लेख करावा लागेल. अर्थात आपल्या जन्मापासूनच भारताशी उभा दावा मांडलेल्या पाकिस्तानने वर उल्लेखलेल्या कोणत्या कराराचे शंभर टक्के पालन केले? असा प्रश्न लिबरल कंपूबहाद्दरांना विचारला तर ते उत्तर देऊ शकतील, अशी स्थिती अजिबातच नाही. उलट भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यालाच पाकिस्तानने परराष्ट्रधोरण, मुत्सद्देगिरी मानले. म्हणूनच भारताने शांततेसाठी, मैत्रीसाठी दरवेळी पुढाकार घ्यायचा, नवा करार करायचा आणि पाकिस्तानने मात्र ठराविक काळ गेला की, टांग वर करायची हे नित्याचेच झाल्याचे पाहायला मिळते. इतकेच कशाला भारताच्या एअर स्ट्राईकपासून ते आज अभिनंदनला सोडल्यानंतरही पाकिस्तानने एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला गोळीबार करण्याचीच दुतोंडी भूमिका घेतली. आज जिनिव्हा कराराची आराधना करण्यात रममाण झालेल्यांनी ही सत्ये, ही तथ्ये नक्कीच तपासून पाहावीत. मात्र, ते केले की, आपलेच थोबाड फुटेल, हे ठाऊक असल्याने ही लोकं असे काही करण्याऐवजी इमरान खानच्या नावाने झांजा वाजवण्यातच इतिकर्तव्यता मानतील!

 

द्विपक्षीय करार असो वा अन्य कोणता, तो तोडण्यात पाकिस्तानचा हातखंडा असल्याचे वेळोवेळी समोर आले. म्हणूनच जिनिव्हा कराराचे गोडवे गाणार्‍यांना व तो इमरान खानने पाळल्याचा बभ्रा करणार्‍यांना जागतिक पटलावरील भारताची वर्तमानातील पत-प्रतिष्ठा व ती कोणामुळे वाढली, तसेच अभिनंदन वर्धमानला सोडण्याची पाकिस्तानची अगतिकता, हे सांगणे अगत्याचे ठरते. बलुचिस्तान, सिंध, खैबर-पख्तुनख्वा अशी अनेकानेक अराजके स्वतःच्या उरावर घेऊन आला दिवस ढकलणार्‍या पाकिस्तानची प्रतिमा आज ‘अपयशी राष्ट्रा’च्या रूपात झाल्याचे दिसते. पाकिस्तानात नेमकी सत्ता कोणाची, हाही प्रदीर्घ काळापासून लोंबकळत असलेला प्रश्न अजूनही तसाच आहे. परिणामी आयएसआय, लष्कर, दहशतवादी की लोकनियुक्त शासन नेमके कोण हा देश नियंत्रित करतो, हा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. अशा स्थितीत पाकिस्तानने पोसलेल्या धर्मांध जिहाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला व भारताच्या ४४ सैनिकांचा बळी गेला, पुढे पाकच्या कुरापतीला भारताने एअर स्ट्राईक करून तडाखेबंद प्रत्युत्तर दिले, नंतर पाकने पलटवार करण्यासाठी भारतीय हद्दीत विमाने घुसवली आणि या प्रत्येकवेळी पाकचे अगदी जिवाभावाचे सोबतीही त्या देशाच्या मदतीला आले नाहीत.

 

अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही पाकिस्तानला गप्प बसण्याचा सल्ला दिला तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदच्या नावाने निवेदन प्रसृत केले. सोबतच फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, इस्रायलला भारताची बाजू घ्यावी लागली. ५६ इस्लामिक देशांच्या संघटनेनेही पाकिस्तानला गोंजारणे सोडून दिले. पण हे कशामुळे, कोणामुळे झाले, याचा कोणी विचार केला का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौर्‍यावर ते पर्यटनाला जात असल्याची खिल्ली उडवणार्‍यांना याची उत्तरे देता येतील का? दहशतवाद्यांविरोधातील एअर स्ट्राईकनंतर वर्धमानच्या सुटकेवेळीही भारताने कणखर भूमिका घेत आमच्या सैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानवर प्रचंड दबाव टाकण्यात भारतीय नेतृत्व यशस्वी ठरले. परिणामी भारताने हल्ला केला, तर देश अस्तित्वात राहिल की नाही, याचा घोर लागलेल्या इमरान खानला आपली गाठ कोणाशी आहे, हे कळून चुकले. नरेंद्र मोदी या खमक्या नेत्याच्या मनात आले, तर आपले हाल कुत्रंही खाणार नाही, याची जाणीव इमरान खानसहित पाकी लष्करालाही झाली. दोन आठवडे कसेबसे घालवण्याइतकी ऐपत असलेला आपला देश भारताच्या कारवाईने कफल्लक होईल, नेस्तनाबूत होईल व वाचवायला कोणी मायीचा लाल येणार नाही, हेही पाकिस्तानला कळून चुकले अन् या जीव वाचवण्याच्या मनःस्थितीत पाकिस्तानने अभिनंदन वर्धमानला सोडले नाही, तर त्याला सोडावे लागले. मात्र, इमरान खानच्या या कृत्याला उदात्ततेचा मुलामा देणार्‍यांनी अभिनंदनच्या सुटकेवरून शांततेची कबुतरे उडवणे पसंत केले. पाकी वायुसेनेने भारतीय सीमारेषेत घुसखोरी केली तरी, ‘युद्ध नको, बुद्ध हवा’चा, धोशा सुरू केला. बुद्धीजीवी, विचारवंत, धर्मनिरपेक्ष, पत्रकार-लेखक वगैरे लेबले लावून बसलेल्या बुणग्यांनी नरेंद्र मोदींना पर्यायाने भारतालाच युद्धखोर ठरविण्यापर्यंत मजल मारली. अर्थात हे करण्यामागे या लोकांचा स्वार्थ दडलेला होता. भारताने पाकिस्तानवर मात केल्याची, मोदींनी अभिनंदन वर्धमानला सोडवून आणल्याची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचली, तर आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यापासून मोदींना कोणीही रोखू शकत नाही, या भयगंडाने या लोकांना ग्रासले. म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांचा बुद्धीभेद करण्यासाठी ल्युटयन्स दिल्लीतल्या कळपवाल्यांनी इमरान खानच्या नावाने कलमा पढणे सुरू केले. पण इथली जनता अशा लोकांना पुरती ओळखून असल्याने कोणत्याही काव्याला भुलण्याची शक्यता नाहीच अन् याचा प्रत्ययही सोशल मीडियावर संबंधित लोकांचे वाभाडे काढण्यातून आला.

 

दुसरीकडे पाकिस्तान आणि इमरान खान यांचा पुळका आलेल्यांना भारताच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांबद्दलही सांगावेच लागेल. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पाकिस्तानशी संबंध सुरळीत होण्यासाठी काम सुरू केले. आपल्या सत्तारोहणावेळी पाकिस्तानला आमंत्रण देऊन मोदींनी एक पाऊल पुढे टाकले. ज्या देशात पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचाही खून होऊ शकतो, अशा अतिशय असुरक्षित आणि बेभरवशाच्या भूमीवर नरेंद्र मोदी वाकडी वाट करून गेले. पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला जात शांततेसाठी, मैत्रीसाठी त्यांनी हात पुढे केला. मोदींनी यापेक्षा निराळा असा कोणता शांततेचा, मैत्रीचा प्रयत्न करायला हवा होता? याचे उत्तर कोणी देईल का? बरं, मोदींनी इतके करूनही पाकिस्तानचे शेपूट काही सरळ झाल्याचे दिसले नाही. एकीकडे चर्चा, शांतता, मैत्रीची हाळी द्यायची नि दुसरीकडे दहशतवाद्यांना भारतात पाठवायचे, भारतीय सैनिकांचा बळी घ्यायचा, शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे, असल्या नापाक हरकती त्यांनी सुरूच ठेवल्या. पुलवामा हल्ल्यानंतरही पाकिस्तानने भारताची खोडी काढण्याची संधी चुकवली नाही.

 

भारताने स्वसंरक्षणासाठी बिगरलष्करी कारवाई करत उत्तर दिल्यानंतर तर पाकिस्तानने मर्यादा ओलांडली. तिथल्या टिनपाट नेत्यांपासून, मंत्री, पंतप्रधानानेही योग्यवेळी आणि हव्या त्या ठिकाणी पलटवार करण्याची भाषा वापरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना एअर स्ट्राईकचे भांडवल केले, ना पाकिस्तानचे नाव घेतले, ना अभिनंदन वर्धमानच्या अटकेनंतर आक्रस्ताळेपणा केला. उलट पाकिस्तानकडून उलट-सुलट, धडा शिकवणार छाप प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मात्र, हे समजून घेण्याची कुवत नसणार्‍यांनी मोदींनाच युद्धखोर व इमरान खानला शांतिदूताची, उत्तम शासकाची, कुशल राजनीतीज्ञाची उपमा दिली. सदैव नायकाच्या शोधात असलेल्या बुभुक्षितांनी राहुल, केजरीवाल, अखिलेश, कन्हैय्या, उमरनंतर इमरान खानला नायकत्व बहाल केले. स्वतःच्या देशाला मातृ-पितृभूमी मानण्याची लाज बाळगणारी ही जमात दुसर्‍याला पितृत्व देण्यात शहाणपणा मानू लागली. मात्र, अशा सगळ्याच बोलघेवड्यांना आज हे ठणकावून सांगावेच लागेल की, पाकिस्तान वठणीवर आला तो जिनिव्हा करारामुळे नव्हे तर त्या करारानुसार पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडणार्‍या मोदींमुळे आणि हे रण अभिनंदनच्या अटकेने वा सुटकेने ना सुरू झाले ना संपेल. जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी पिलावळ निपजत राहिल, तोपर्यंत ते सुरूच राहिल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@