आनंदवनभुवनी... भारतमातेचा शूर सुपुत्र परतला..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |
 
 

अभिनंदन वर्धमान मायभूमीत परतले, भारतभरातून जल्लोष

 

नवी दिल्ली : पाकिस्तानी वायुदलाच्या भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानांना पिटाळून लावताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पाकिस्तानने शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केले.

 

भारतीय वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी व अभिनंदन यांच्या कुटुंबीयांनी अटारी (वाघा) बॉर्डर येथे उपस्थित राहून अभिनंदन यांचे स्वागत केले. वास्तविक, अभिनंदन यांना शुक्रवारी दुपारी भारताच्या ताब्यात दिले जाणे अपेक्षित होते. परंतु, ही प्रक्रिया लांबत गेली आणि त्यामुळे अभिनंदन मायभूमीत परतण्यास रात्री साडेनऊची वेळ उजाडली. देशभरातून त्यांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणात प्रार्थना केली जात होती. सीमेपलीकडून विंग कमांडर अभिनंदन हे सुखरूपपणे भारतात परतत असल्याची दृश्ये दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून पाहताच देशभरातून एकच जल्लोष करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आणण्यासाठी वायुदलाच्या 5 गाड्या अटारी येथे गेल्या होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव अटारी बॉर्डर येथील ‘बिटिंग रीट्रिट’ सोहळाही रद्द करण्यात आला. अभिनंदन यांना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथून लाहोरमार्गे वाघा बॉर्डर येथे आणण्यात आले. तसेच, त्यांना अमृतसरमार्गे नवी दिल्ली येथे नेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.

 

दि. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर येथील काही ठिकाणांवर हवाई हल्ले करत तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या पाकिस्तानने भारतीय हद्दीत आपली विमाने घुसवत हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क भारतीय वायुदलाने हा हल्ला परतवून लावला. तसेच पाकचे एक ‘एफ-१६’ लढाऊ विमानही जमीनदोस्त केले. या कारवाईच्या वेळी पाकी विमानांना पिटाळून लावत असताना भारताचे ‘मिग-२१’ चे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकच्या हद्दीत शिरले व तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. यावेळी अभिनंदन यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात दिले. ही बाब समजताच अभिनंदन यांच्या सुखरूप सुटकेची आग्रही मागणी भारताने केली, तसेच त्यादृष्टीने प्रचंड प्रमाणात दबावदेखील आणला. आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी पाकवर दबाव आणला गेला. यामुळे अभिनंदन यांची सुटका करण्यावाचून पाकिस्तानकडे काहीच पर्याय उरला नाही.


पाकच्या नापाक हल्ल्याला परतवत असताना शत्रूच्या ताब्यात सापडलेल्या अभिनंदन यांच्या सुटकेसाठी देशभरातून प्रार्थना केली जात होती. शुक्रवारी त्यांची सुटका झाल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात आला. “अभिनंदन, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, भारतमातेचा एक शूर सुपुत्र आज मायभूमीत परतला आहे,” अशा शब्दांत हजारो-लाखो नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेकांनी अभिनंदन यांचे ट्विटरवरून ट्विट करत स्वागत केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@