दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात आजपासून होत आहे. राज्यात असलेल्या २२ हजार २४४ माध्यमिक शाळांतील १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेची नोंदणी केली असून त्यात ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात दहावीची ही परीक्षा तब्बल ८ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

 

दहावीच्या या परीक्षेला मुंबई विभागीय मंडळातून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ही परीक्षा मुंबईतील ९९९ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात जुन्या अभ्यासक्रमातील १६ हजार ३०७ विद्यार्थी आहेत. राज्यात या परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून गुरुवारी देण्यात आली.

 

राज्यात ८ हजार ८०० दिव्यांग परीक्षार्थी देणार परीक्षा

 

राज्यभरातून ८ हजार ८०० दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच, मुंबई विभागीय मंडळात दहावीच्या परीक्षेला तब्ब्ल २ हजार ४८३ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार असून मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांना २२ हून अधिक प्रकारच्या विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@