जुन्याच रागाचा आलाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |
 
 

आपले सरकार आल्यास तिहेरी तलाकचा कायदा बदलून टाकू, अशी वल्गना काँग्रेसने केली आहे. मुस्लीम मतांच्या गठ्ठ्यासाठी मुस्लीम महिलांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, असे हे वागणे. त्यामुळे निवडणुका येतील आणि जातील, मात्र या मानसिकतेचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. हे उच्चाटन मोदीच पुन्हा सत्तेत आल्याशिवाय शक्य नाही.

 

२०१९ची निवडणूक मोदींसाठी कशी सोपी नसेल, याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या खेळाचा गंभीर खेळाडू असलेल्या कोणासाठी खरं तर कुठलीही निवडणूक सोपी नसते; मोदींसाठीही नाही आणि राहुल गांधींसाठी तर मुळीच नाही. साधारणत: एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. आता झालेले लोकसभेचे अधिवेशन म्हटले, तर सोळाव्या लोकसभेचे शेवटचे. मोदींनी जे काही शक्य आहे, तो षट्कार या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लगावला आहेच. या षट्काराचे परिणाम दिसायला दोन ते तीन महिने लागणार आहेत. राजकारणाच्या खेळातील सवार्र्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राजकीय प्रवासाचा प्रवाह निश्चित करणे. नरेंद्र मोदींनी नेमकेपणे ती जागा अशा काही प्रकारे व्यापली आहे की, विरोधकांना मोदींनी लावलेल्या सापळ्यात जाऊन अडकणे आणि त्यांनी निर्माण केलेल्या विषयांवरच प्रतिक्रिया देत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तीन राज्यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे लोकसभेत काय होणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. कोणत्याही लढाईचा जय-पराजय हा ती लढाई लढणार्‍यांच्या मनोबलावर अवलंबून असतो. या तीन राज्यांच्या पराभवाने जो काही प्रभाव निर्माण केला, तो बराच काळ टिकून होता. पण, अर्थसंकल्पीय अधिवेशनाने देशाच्या राजकारणाला एक निराळीच कलाटणी दिली असल्याचे आपल्या लक्षात येईल. शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, निवृत्तीवेतनधारक अशा सगळ्यांनाच खूश करेल, असा हा अर्थसंकल्प होता. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.

 

‘आधुनिक व्यवस्थापनशास्त्र’ दोन संकल्पना सांगते. ‘प्रोअ‍ॅक्टीव्ह’ आणि ‘रिअ‍ॅक्टीव्ह’ अशा या संज्ञा आहेत. ‘प्रोअ‍ॅक्टीव्ह’ म्हणजे पुढाकार घेणे. एखादी गोष्ट घडवून आणि त्याच्या परिणामाचे मूल्यमापन केले जाते. ‘रिअ‍ॅक्टीव्ह’ म्हणजे घडत असलेल्या गोष्टींना प्रतिसाद देणे आणि कोणीतरी ठरवून दिलेल्या अजेंड्यावर वाटचाल करणे. मोदींनी या देशातल्या राजकीय प्रवाहाची दिशा इतकी व्यवस्थित निश्चित केली आहे की, सगळ्यांना त्या अजेंड्यावर वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. एरवी एकमेकांचे तोंडही न पाहणारे लोक आज युती, महायुती, आघाड्या करण्यात गुंतले आहेत. तीन राज्यांत भाजपचे सरकार तयार होऊ न शकल्याने ही सगळी मंडळी मोठ्या आशेने एकत्र आली आहेत. पर्यायाने आपापल्या प्रदेशात एकमेकांशी भांडणारे हे लोक एकत्र आले आहेत, तेसुद्धा नरेंद्र मोदींमुळेच!

 

निवडणुका निश्चित झाल्या की, सर्वात आधी कोणत्याही राजकीय पक्षाला निश्चित करावा लागतो तो त्यांचा कार्यक्रम. भाजपचा नेता आणि त्याने घडवून आणलेले उपक्रम हीच भाजपची सगळ्यात मोठी जमेची बाजू असेल. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कार्यरत असलेल्या नितीन गडकरी यांच्या कामाची दखल देशाने तर घेतलीच, पण त्याचबरोबर सोनिया गांधींसारख्या विरोधकांनीही घेतली. गडकरी हे मोदींचे पक्षांतर्गत स्पर्धक असल्याचे चित्र सध्या रंगविले जात आहे. मोदी डोळ्यात खुपत असलेली माध्यमे आणि राहुल गांधींसारखे बालीश लोक यात अगदी आघाडीवर आहेत. यामागचा उद्देश काहीही असला तरी अर्थोअर्थी गडकरींच्या कामाचाच हा प्रभाव मानावा लागेल. आपल्या बिनधास्त कार्यशैलीमुळे गडकरी प्रकाशात राहत असले तरी, अन्य काही क्षेत्रातही अशाच प्रकारची उत्तम कामे झाली आहेत. याउलट काँग्रेसने आपल्या ज्या चार घोषणा केल्या आहेत त्या वाचल्या की, १०० वर्षांहून जुनी असलेली ही संस्था किती पोकळ झाली आहे किंवा नुसती पोकळच नव्हे, तर काँग्रेसकडून देण्यात येणार्‍या गोष्टीही तितक्याच पोकळ आहेत. राहुल गांधी आता सौम्य हिंदुत्व खेळायचे की, आपले जुनेच मुस्लीम कार्ड वापरायचे या घोळात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून संसदेत बोलणारे, माध्यमांना सामोरे जाणारे लोक जे सांगत सुटले आहेत, ते अत्यंत क्लेषकारक मानावे लागेल.

 

‘तिहेरी तलाक’चा कायदा संमत झाल्यावर देशभरातील मुस्लीम महिलांनी जल्लोष साजरा केला होता. हा मुद्दा धर्मापेक्षा माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. यामुळे पुरुषसत्ताक विचारांनी चालणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या संतापाचा कडेलोट नक्कीच झाला. मात्र, त्याला कोणीही भीक घातली नाही. आता काँग्रेस हा विषय पुन्हा सक्रिय करण्याच्या तयारीत आहे. आपले सरकार आल्यास तिहेरी तलाकचा कायदा बदलून टाकू, अशी वल्गना काँग्रेसने केली आहे. आता याचा निकाल मुस्लीम महिलांनीच लावावा, जेणेकरून त्यांना सुकर व आत्मसन्मानाने जगता येईल की नाही, ते निश्चित होईल. यानिमित्ताने पुरोगामित्त्वाचे ढोंग धारण करणारी काँग्रेस आणि त्यांचे तळवे आपल्या जिभांनी स्वच्छ ठेवणारे अभिव्यक्तिवाले किती खोटे आहेत हे आपल्या लक्षात येईल. मुस्लीम मतांच्या गठ्ठ्यासाठी मुस्लीम महिलांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, असे हे वागणे. गेल्या निवडणुकांत ज्या मुस्लीम मतदारांनी भाजपला मतदान केले त्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. तिहेरी तलाक कायदा लागू झाल्यानंतर हे प्रमाण वाढेल, यात काहीच शंका नाही. त्यामुळे निवडणुका येतील आणि जातील, मात्र या मानसिकतेचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. हे उच्चाटन मोदीच पुन्हा सत्तेत आल्याशिवाय शक्य नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@