नैतिक अस्थिरतेचा देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019   
Total Views |


पाकिस्तानने १ लाख १० हजार डॉलर्सच्या बदल्यात अमेरिकेच्या शिकाऱ्याला पाकिस्तानमध्ये ‘मारखोर’ या जंगली बकऱ्याची शिकार करण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या देशाचा प्राणी आहे, ते वाट्टेल ते करतील म्हणा. तसेही स्वत: उपाशी, कंगाल राहतील, पण शेजाऱ्याला बरबाद करणारच, या मानसिकतेचा हा देश. त्यामुळे त्याने जंगली बकऱ्याची शिकार करायला अमेरिकेच्या शिकाऱ्याला परवानगी दिली, यात नवल ते काय!! पण, पाकिस्तानने ज्या ‘मारखोर’ नावाच्या प्राण्याची शिकार करायची परवानगी दिली आहे, त्या प्राण्याची शिकार करण्यास पाकिस्तानमध्येच खरं तर कायदेशीर बंदी आहे. कारण, हा ‘मारखोर’च पाकिस्तानचा राष्ट्रीय पशू आहे.

 
 
 

कुठचीही वास्तू, घटना, प्राणी, प्रतीक हे जेव्हा ‘राष्ट्रीय’ म्हणून संकल्पित केले जाते, त्यावेळी त्या सर्वांना राष्ट्राचा असा स्वतंत्र अभिनिवेश प्राप्त होतो. पण, पाकिस्तानला असे काही वाटत नसावे. किंबहुना, भारतावर जळताना, कुढताना त्याच्यातील स्वत्त्वाची प्रेरणाच मेली आहे. तसे नसते तर आपल्याच देशाच्या राष्ट्रीय पशूची शिकार करण्याची परवानगी द्यायचा मूर्खपणा पाकिस्तानने केला नसता? पण, तो मूर्खपणा पाकिस्तानने केला. केवळ काही डॉलर्सच्या मोबदल्यात दिलेल्या या परवानगीविरुद्ध पाकिस्तानमध्ये एकही नैतिक आवाज उठलेला दिसत नाही. ज्या देशामध्ये माणसाच्या जगण्याची किंमत नाही, तिथे त्या राष्ट्रीय पशूला काय घेऊन बसावे?

 
 
 

यानिमित्ताने एक गोष्ट मात्र कळली की, पाकिस्तानचा राष्ट्रीय पशू ‘मारखोर’ आहे. नाव पण काय गजबच आहे ‘मारखोर.’काहींच्या मते, ‘मारखोर’चा अर्थ आहे, साप मारून खाणारा पशू. काहींच्या मते, या जंगली बकऱ्याचे शिंग सापासारखे नागमोडी वळणावळणाचे असते म्हणून त्याला ‘मारखोर’म्हणतात. योगायोग म्हणा किंवा या देशाची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणा, पाकिस्तानने माणसाळलेल्या प्राण्याला ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून मान्य केले नाही, तर जंगली बकरा त्यांना ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून भावला. ज्यांना ‘जंगली युग’ आवडते, त्यांना माणसांची संस्कृती आवडणारच नाही म्हणा! त्यामुळे पाकिस्तान या राष्ट्राची मानसिकता आजही जंगली संस्कृतीला धरून आहे, हेच सिद्ध होते.

 

अर्थात, कोणी म्हणेल की पाकिस्तान आहे म्हणून काहीही संदर्भ देऊन बोलता. पण, तसे नाही. जगाची मानसिकता माणसाळलेपणाकडे जात असताना अजूनही पाकिस्तान आपल्या धर्मांध मानसिकतेचा गुलाम आहे. तसे जर नसते तर पाकिस्तानमधील सुन्नी मुस्लीम सोडून, इतर धर्मींयांनी पाकिस्तानमधून काढता पाय घेतला नसता. त्यातही हिंदू आणि शीख यांना पाकिस्तानमध्ये जगणे मुश्किल झाले नसते. काल-परवाच पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदूंच्या देवळाची तोडफोड झाली नसती.

 
 
 

अत्यंत निगरगट्टपणे पाकिस्तानने एकच भूमिका कायम ठेवली आहे, ती म्हणजे दुसऱ्याचं घर जाळताना स्वत:चे घर जळाले तरी चालेल. सगळ्याच गोष्टी सैनिकीबळावर सोडवणे, शस्त्रास्त्राच्या बळावर सोडवणे शक्य नसते. पण, आज पाकिस्तान-भारताच्या सीमेवर तर सोडाच, स्वत:च्या देशातल्या राज्यांमध्येही सैन्याचा आणि हिंसेचा अनिर्बंध वापर करताना दिसतो. बलुचिस्तान, पख्तुनख्वा आणि सिंध प्रांतामध्ये पाकिस्तानमधून फुटून निघण्याची आंदोलने होत आहेत.स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात यावे, अशी इथल्या जनतेची भावना तीव्र आहे. धर्माच्या नावावर भारतातून फुटून निघालेल्या पाकिस्तानला सांस्कृतिक अस्मितेच्या नावानेहोणाऱ्या या फुटीरतावाद आंदोलनांनी हादरवून सोडले आहे. त्यासाठी पाकिस्तान भयंकर दडपशाही करत आहे. यावर भारत तर वारंवार समर्थ मानवतावादी भूमिका घेत असतोच. पण, आता अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील हिंसक घटनांबाबत हे ट्विट केले होते. ‘खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये शांततेने विरोध करणाऱ्यांविरुद्ध हिंसेचा वापर केल्यामुळे अफगाण सरकार चिंतेत आहे.”

 

यावर काश्मीर प्रश्नावरून लष्कराच्या भाकऱ्या भाजत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानची भूमिका काय आहे? तर पाकिस्तानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानने स्वत:चे पाहावे, आमच्या देशात ढवळाढवळ करू नये. भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत वेगवेगळी भूमिका मांडणाऱ्या पाकिस्तानची अशी वैचारिक आणि नैतिक अस्थिरता दिसून येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@