निवडपरीक्षेचा पेपर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019   
Total Views |
 

 
 
 
एका आय.टी. कंपनीत काम करणारी ती तरुणी मला प्रश्नामागुन प्रश्न विचारीत होती. रक्तपेढी पाहताना इतके प्रश्न विचारले जाऊ शकतात हे मला त्यावेळी नव्यानेच कळत होते. कारण कोणाला तरी रक्तपेढी फ़िरुन दाखवण्याचा तो कदाचित माझा पहिलाच अनुभव होता. माझं नशीब की रक्तदानासंबंधातील माझ्या कल्पना मी त्या वेळेपर्यंत बऱ्यापैकी स्पष्ट करुन घेतल्या होत्या, नाही तर माझी विकेट निश्चित पडली असती तेव्हा. ’माझ्या मोकळ्या वेळेत मला रक्तदानाशी संबंधित काम करायला आवडेल’ अशी इच्छा फ़ोनव्दारे व्यक्त केलेली ही मुलगी आमच्याच सांगण्यावरुन रक्तपेढी पहायला आलेली होती. अत्यंत चिकित्सक वृत्तीने एक-एक बाब ती समजून घेत होती.
 
याच भेटीत रक्तदानापूर्वी रक्तदात्याने भरावयाची प्रश्नावली हातात घेऊन तिने मला विचारले, ’’या फ़ॉर्ममध्ये ’काल रात्री आपल्याला शांत झोप लागली आहे का ?’ असं का विचारलं आहे ?’, ’याचा रक्तदानाशी काय संबंध ?’, ’त्याने रक्ताच्या गुणवत्तेवर काय फ़रक पडणार आहे ?” का कुणास ठाऊक पण तिच्या विचारण्यामध्ये ’प्रश्नावलीतील हा प्रश्न निरर्थक आहे’ असा काहीसा भाव मला जाणवला. तिच्या या प्रश्नावर मी तिला हसुन म्हटलं, ’सगळ्या प्रश्नांचा संबंध रक्ताच्या गुणवत्तेशीच असतो असं नव्हे तर ज्याच्याकडुन रक्त घ्यायचं आहे त्या रक्तदात्याची काळजी म्हणूनही काही प्रश्न अंतर्भूत केलेले असतात. हा प्रश्नही याच प्रकारातला आहे. जर रक्तदात्याची रात्रीची झोप व्यवस्थित झालेली नसेल आणि अशा अवस्थेत सुमारे ३५० ते ४५० मिलि रक्त जर त्याच्या शरीरातून काढुन घेतले गेले तर या रक्तदात्यालाच त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच रक्तदान करण्यापूर्वीच्या रात्रीची झोप ही चांगली झालेली असायला हवी.’ माझ्या या उत्तराने तिचे समाधान झाले असावे, कारण यावर तिने काही प्रतिप्रश्न केला नाही.
 
प्रत्यक्ष रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याला स्वत:ची वैद्यकीय पात्रता सिद्ध करण्यासाठी काही टप्पे पार करणे अनिवार्य असते. समुपदेशन हा त्यातला पहिला आणि महत्वाचा टप्पा. वर उल्लेख केलेली प्रश्नावली भरली जाते ती याच पायरीवर. वैयक्तिक आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न यात विचारलेले असतात. या प्रश्नावलीमध्येच शेवटी एक ’अनुमतीपत्र’ही (consent) असते. प्रत्येक रक्तदात्याने ही प्रश्नावली भरुन आणि अनुमतीपत्र वाचून त्यावर स्वाक्षरी करणे अनिवार्य असते. सिनेमाचं किंवा नाटकाचं तिकिट दारावर दाखवून आत प्रवेश मिळविण्याइतका हा साधा उपचार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण घटक आपण देऊ करणार असून हा घटक दुसऱ्या एका चालत्या-बोलत्या व्यक्तीला दिला जाईल, ज्यामुळे कदाचित या व्यक्तीस जीवनदानही मिळु शकेल किंवा एखादी जन्माची व्याधीही मागे लागु शकेल, हे भान प्रश्नावली भरताना रक्तदात्याने ठेवण्याची गरज असते. त्याकरिताच विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर – जरी ’हो/नाही’ असेच द्यायचे असले तरी – विचारपूर्वकच देणे आवश्यक आहे. हा विचार योग्य दिशेने होण्यासाठी रक्तपेढीचे समुपदेशक मदत करतात. रक्तदात्याने भरलेली प्रश्नावली काळजीपूर्वक तपासून आणि आवश्यक तिथे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारुन रक्तदात्याच्या आरोग्याबाबत खातरजमा करणे हे समुपदेशकाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे प्रश्नावली भरताना आणि नंतर समुपदेशकाशी बोलताना विचारलेली सर्व माहिती खरेपणाने सांगण्याची जबाबदारी रक्तदात्याचीही आहेच. विशेषत: रक्तदान-शिबिरांमध्ये तर रक्तदान करण्याच्या इच्छेने अनेकजण आलेले असतात, त्यामुळे वेळेची मर्यादा आणि रक्तदात्यांची संख्या लक्षात घेऊन समुपदेशनाला भरपूर वेळ देणे शक्य होत नाही. तरीही – न्याहारी झाली आहे ना, काही औषधे चालु नाहीत ना, मोठी शस्त्रक्रिया झाली होती का, पूर्वीचे रक्तदान कधी झाले आहे, त्यावेळी किंवा त्याआधीही रक्तदान करताना त्रास झाला होता का – यांसारखे काही महत्वाचे प्रश्न समुपदेशकांकडुन विचारले जातातच. पण तरीही काही प्रश्न हे अगदीच वैयक्तिक स्वरुपाचे असल्याने त्यावर अशा शिबिरांतून फ़ार उहापोह होऊ शकत नाही. पण त्यामुळे त्याचे गांभीर्य कमी होत नाही.
 
काही चुकीच्या सवयींमुळे किंवा अन्य काही घटकांमुळे रक्त बाधित होण्याची शक्यता कुणाच्याही बाबतीत असु शकते. जसे, शरीरावर कायमस्वरुपी टॅटू गोंदवून घेण्याची क्रिया जर झाली असेल तर एक वर्षासाठी रक्तदान करता येत नाही. कारण गोंदविण्यासाठी ज्या सुया वापरलेल्या असतात त्या सुया निर्जंतुक असतील असे गृहीत धरता येत नाही. परिणामी असे रक्तदाते – या प्रक्रियांमुळे होऊ शकणारे सर्व संसर्ग लक्षात घेऊन – वर्षभरासाठी नाकारले जातात. अर्थात ही गोष्ट रक्तदात्याला विचारुन लक्षात येऊ शकते. पण अशा संसर्गांचे आणखी एक कारण असलेल्या लैंगिक वर्तनाबाबत मात्र मोकळेपणाने विचारता येतेच असे नाही. भारतीय समाजात तर याबद्दलच्या चर्चा अजूनही फ़ार संकोचाने होतात. परंतु रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याने या बाबीचा अवश्य विचार केला पाहिजे. विशेषत: प्रस्तावित रक्तदात्याला एकापेक्षा अधिक लैंगिक साथीदार असतील तर असा व्यक्ती ’अतिजोखमीचा रक्तदाता’ (high risk donor) समजला जातो. त्यामुळे एका बाजुला या बाबतीत ’बोलावे कसे’ हा समुपदेशकाला पडणारा सवाल आणि दुसऱ्या बाजुला जर रक्तदाता खरोखरीच असा असेल तर रक्तसुरक्षिततेपुढे उभे राहणारे आव्हान या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. यावर मार्ग कसा काढायचा, याचे एक चांगले प्रात्यक्षिक नुकतेच एका ’समुपदेशक प्रशिक्षण वर्गात’ पहायला मिळाले. या वर्गात उपस्थित असलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षिकांनी स्वत:च याबाबतचे रोल-प्लेज करुन दाखवले. यात ’हायरिस्क’ रक्तदाता बनलेल्या एकजणाशी झालेला त्यांचा हा संवाद पहा –
 
समुपदेशिका : ’आपल्याला हे माहित आहे ना, की आपण दिलेल्या रक्तापासून बनवले गेलेले रक्तघटक एखाद्या रुग्णाला गरजेनुसार दिले जातील ?’
 
रक्तदाता : हो. माहिती आहे.
 
समुपदेशिका : अच्छा. मग ’आपले रक्त पूर्णत: सुरक्षित आहे’ याची आपणास खात्री आहे ना ?’
 
रक्तदाता : पूर्णत: सुरक्षित म्हणजे ?
 
समुपदेशिका : म्हणजे असं की कुठल्याही कारणाने आपल्या रक्तात एखादा बाह्यसंसर्ग आला असेल अशी काही शक्यता नाहीये ना ?
 
 
रक्तदाता (थोडं अडखळत) : नाही..नाही. असं काही नाही.
 
रक्तदात्याच्या अडखळण्याने आता समुपदेशिका काहीशी सावध होऊन विचारते,
 
’ठीक आहे. पण एक लक्षात घ्या. आपण दिलेलं रक्त कदाचित नुकतीच प्रसुती झालेल्या एखाद्या मातेलाही दिलं जाऊ शकतं आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाला पुढे आयुष्यभर आई मिळेल की नाही, याचा निर्णय आत्ता तुम्ही करणार आहात…आपण पुढे जाऊ या ना मग ?’
 
समुपदेशिकेने असं म्हटल्यावर मात्र हा रक्तदाता अंतर्मुख होतो आणि रक्तदान करण्याचा आपला विचार मागे घेतो, असा हा रोल-प्ले होता. केवळ हा रक्तदाताच नव्हे तर उपस्थित असलेले सर्वच प्रशिक्षणार्थी या शेवटच्या प्रश्नामुळे अंतर्मुख झाले. रक्तदानासारख्या छोट्याशा कृतीचे परिणाम – चांगले आणि वाईटही - किती व्यापक असु शकतात हे यामुळे सर्वांच्या लक्षात आलं. अर्थात जिथे एकेकट्याला इतका वेळ देता येत नाही अशा ठिकाणी प्रत्यक्ष रक्तदान शिबिराच्या आधी रक्तदान प्रबोधनाचे कार्यक्रम घेता येऊ शकतात, ज्यात या सर्व बाबतीत सामुहिक समुपदेशनही शक्य होते. जनकल्याण रक्तपेढी असे कार्यक्रम नेहमीच घेत असते. ’योग्य रक्तदात्याची निवड’ हाच या उपक्रमांमागचा मुख्य हेतु. या निमित्ताने रक्तदाता-प्रश्नावलीचीही ओळख सर्वांना होते. कुठला प्रश्न का विचारला गेला आहे, याची चर्चा इथे करता येते.
 
एक युवक रक्तदान करण्याच्या तीव्र इच्छेने आला पण त्याचा अठरावा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असल्याने त्याला नाकारले गेले. त्याचं म्हणणं होतं, ’एक दिवसाने माझ्या रक्तात असा काय फ़रक पडेल ?’ पण याचेही उत्तर डॉक्टरांनी व्यवस्थितपणे दिले. रक्तदानापूर्वीची प्रश्नावली भरताना रक्तदात्याने रक्तदानासाठी आणि रक्तावर होणाऱ्या चाचण्यांसाठी द्यावयाची लेखी अनुमती देताना सदर व्यक्ती हा कायद्याने सज्ञान असावा लागतो. त्यामुळे जोपर्यंत वय वर्ष अठरा पूर्ण होत नाही, तोपर्यंत अनुमतीअभावी रक्तदानही करता येणार नाही हे उघड आहे. अशा अनेक गोष्टी या प्रश्नावलीमुळे स्पष्ट होतात आणि रक्तदात्याची निवड अधिक चांगल्या पद्धतीने करता येते.
 
अर्थात कुठलीच अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रक्तदान करण्यासाठी आलेला रक्तदाता हा सामान्यत: या सर्व बाबतींत जागरूक असतोच. जनकल्याण रक्तपेढीचा तर सर्व रक्तदाता-वर्ग हा असाच आहे. पण तरीही समुपदेशनाच्या या टप्प्यावर ’निवडपरीक्षेचा पेपर’ भरुन त्यात उत्तीर्ण होण्याला मात्र पर्याय नाही. शेवटी एखाद्याला जीवनदान द्यायचे असेल तर आपलेही जीवन त्या तोलामोलाचे असायला नको का ?
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@