असंवैधानिक चौकटीतील प्रकाश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
संघाला संवैधानिक चौकटीत बसवण्याची विचित्र मागणी करणाऱ्या प्रकाशबापू, ‘तुम्ही खेळ सुरू केला, आम्ही अंत करू,’ अशी धमकी देणे संवैधानिक आहे का? वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान पत्रकाराला अश्लील भाषेत धमकावणे संवैधानिक आहे का? कसलाही संबंध नसताना संभाजीराव भिडेंना तुरुंगात डांबण्याची भाषा करणे संवैधानिक आहे का? याची उत्तरे देणार का?
 

बुद्धिवंतांच्या पिढीत विचारजंतही निपजू शकतो, याचा प्रत्यय प्रकाश आंबेडकरांकडे पाहिले की हमखास येतो. “आमचा लढा रा. स्व. संघाविरोधात आहे. संघ संविधान मानत नाही, तरीही प्रशासन चालवतो. संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा जो कोणी देईल, त्याच्याशी आघाडी करायला आम्ही तयार आहोत,” अशी विचित्र विधाने वंचित बहुजन विकास आघाडीची फाटकी गोधडी घेऊन ठिगळ लावण्यासाठी इकडेतिकडे फिरणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच केली. आपला वारसा काय आणि आपण करतोय काय, याचे भान नसले की कसे होते, त्याचा हा जीवंत नमुनाच म्हटला पाहिजे. कारण, प्रकाश आंबेडकर ज्या संविधानाची दुहाई देतात, त्याच संविधानाला धार्मिक गोष्टींचा मुद्दा आला की धाब्यावर बसवणाऱ्या ओवेसींशी आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वीच पाट लावला! ‘तिहेरी तलाकचा मुद्दा असो की मुस्लीम धर्मीयांच्या भावनांशी संबंधित अन्य कोणताही मुद्दा, ओवेसींना न्यायालयीन आदेश अमान्य करण्यातच रस वाटतो. तो न्यायालयाचा आणि संविधानाचा अपमान नसतो का? की आपण ज्याच्या शिरखुर्म्याची चव चाखली, त्याने काहीही केले तरी चालते? प्रकाश आंबेडकरांनी याची उत्तरेही कधीतरी दिली पाहिजेत. ‘वंदे मातरम्’चेही तसेच. ‘वंदे मातरम्’चा विषय आला की, ओवेसी अन् एमआयएमच्या चिल्ल्यापिल्ल्यांकडून धमकावण्याची, इशारे देण्याची विखारी भाषा सुरू होते. तिच भाषा मग प्रकाश आंबेडकरांच्या तोंडूनही वाहू लागते. ओवेसी असो की प्रकाश आंबेडकर, दोघेही ‘वंदे मातरम्’चा संबंध संघाशी लावून टाकतात, जणू काही संघानेच ‘वंदे मातरम्’ला जन्म दिला! ‘वंदे मातरम्ची वस्तुस्थिती निराळी असल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. ‘वंदे मातरम्’ गीत लिहिण्याशी संघाचा काही संबंध नाही अन् संघही तसे कधी म्हणत नाही. उलट मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर प्राण घेऊन ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत बलिदान देणाऱ्या असंख्य क्रांतिकारकांप्रतिची कृतज्ञता, भारतभूमीप्रतिची आस्था व्यक्त करण्यासाठीच संघ स्वयंसेवक ‘वंदे मातरम्’चा जयजयकार करताना, संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत गाताना दिसतात. उलट देश स्वातंत्र्यातील योगदान विसरून केवळ विरोधासाठी विरोध करत प्रकाश आंबेडकर ओवेसींसारख्या धर्मांधाच्या मांडीला मांडी लावून ‘वंदे मातरम्’ नाकारण्याचा कृतघ्नपणा करताना दिसतात. खरे म्हणजे आपल्या मतलबी राजकारणाचा डाव साधण्यासाठीच या मंडळींचे हे असले उद्योग सुरू असतात. आजचे प्रकाश आंबेडकरांचे संघाबाबतचे विधानही त्याचीच साक्ष देणारे.

 

संघ संविधानाच्या चौकटीत राहूनच कार्य करतो हे तर जगजाहीरच, मात्र प्रकाश आंबेडकर संविधानाची चौकट मोडताना वारंवार दिसतात. नक्षलवाद्यांच्या, माओवाद्यांच्या समर्थनाची भूमिका घेणे, हे संवैधानिक आहे का? शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद आणि नंतर राज्यभरात उद्भवलेला हिंसाचार संवैधानिक आहे का? ‘तुम्ही खेळ सुरू केला, आम्ही अंत करू,’ अशी धमकी देणे संवैधानिक आहे का? वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यानपत्रकाराला अश्लील भाषेत धमकावणे संवैधानिक आहे का? कसलाही संबंध नसताना संभाजीराव भिडेंना तुरुंगात डांबण्याची भाषा करणे संवैधानिक आहे का? ‘भारत तेरे टुकडे होंगे’ची वटवट करणाऱ्या कन्हैया कुमार, उमर खालिद यांची पाठराखण करणे संवैधानिक आहे का? याची उत्तरे प्रकाश आंबेडकरांनी सवड काढून नक्कीच द्यावीत. सध्या राज्यात एल्गार परिषद, नंतर पेटलेल्या दंगली आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडेचा मुद्दा गाजताना दिसतो. पोलीस, प्रशासन, न्यायपालिका आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, व्यवस्थेचे मनोधैर्य खच्चीकरण करणाऱ्या कारवाया करायच्या, दुहीची बीजे पेरायची, गडचिरोलीसह नक्षली पट्ट्यातल्या वनवासी, वंचित, शोषित समाजाचा छळ करायचा, त्यांचा जीव घ्यायचा, ही नक्षलवाद्यांची, माओवाद्यांची रक्तरंजित कृत्ये! देश तोडणाऱ्या, देशात अराजक माजवणाऱ्या याच लोकांना प्रतिष्ठेचे वलय असलेल्या मंडळींकडून विचारवंती मुलामा देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. आनंद तेलतुंबडे अशांपैकीच एक. मात्र, देशाला लागलेल्या तेलतुंबडेसारख्या वाळवीचा बचाव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर पुढे येतात. ‘जागतिक कीर्तीच्या थोर विचारवंताला त्रास दिला,’ असे म्हणत छाती पिटतात. एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करण्याचे कर्तृत्व बाणवलेल्या प्रकाश आंबेडकरांचे हे वागणे संवैधानिक चौकटीत बसणारे आहे का? कोरेगाव-भीमा येथील दुर्दैवी घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला. झाल्या घटनेच्या आगीत तेल ओतून भडका उडवण्याचाच हा प्रकार होता. प्रकाशबापूंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिसेल ती वाहने जाळण्याची, दुकाने उद्ध्वस्त करण्याची, समोर येईल त्या व्यक्तीला मारण्याची, संबंध नसलेल्या माणसांना त्रास देण्याची कामगिरी चोखपणे बजावली. प्रकाशबापू सांगा, हा विद्ध्वंसाचा धिंगाणा घालणे अन् एकोप्याने नांदणाऱ्यांची मने तोडणे संवैधानिक होते का? अर्थात, हिंदूद्वेषाचे, मोदीद्वेषाचे, संघद्वेषाचे, भाजपद्वेषाचे राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची यावर दातखिळच बसणार. ते याची उत्तरेही कधी देऊ शकणार नाहीत. कारण, कशाच्या तरी विरोधात असणे, हेच तर प्रकाश आंबेडकरांचे राजकारण आहे. ते तेच करतील. पण, दुसऱ्याला संविधानाच्या चौकटीत राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनी स्वतःचा पाय संविधानाच्या चौकटीबाहेर पडत नाही ना, ते नक्कीच पाहावे.

 

संघविरोधाची घोकंपट्टी करून नेहमी नेहमी चघळायची, आरोपांचा धुरळा उडवून द्यायचा अन् जनतेच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडायचे, हा शिरस्ता देशातल्या कित्येक राजकारण्यांनी वर्षानुवर्षे अवलंबला. प्रकाश आंबेडकर हेदेखील त्यातलेच आणखी एक प्यादे. पण, प्रकाश आंबेडकरांना खरेच संघाबद्दल काही माहिती आहे की, कोणीतरी कान फुंकल्याने त्यांची जीभ चालते? तसे जर असेल तर प्रकाश आंबेडकरांनी संघाशी संबंधित गोष्टी नीट लक्षात घ्याव्यात, संघकार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि मग बोलावे. प्रकाश आंबेडकरांच्या अकोला जिल्ह्यापासून जवळच नागपूर ही संघभूमी आहे. प्रकाश आंबेडकरांनी तिथे भेट द्यावी, शाखेत यावे, संघ प्रार्थना म्हणावी, तेव्हा संघ म्हणजे काय, हे प्रकाशबापूंना नक्कीच कळेल. स्वार्थी लोकांकडून कर्णोपकर्णी पसरवल्या जाणाऱ्या अफवा म्हणजे संघ नव्हे, कोणी केवळ ऐकीव माहितीवर केलेली वक्तव्ये म्हणजे संघ नव्हे! तर संघ हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा, जगण्याचा विषय आहे, टीका करण्याचा नव्हे! गेल्या वर्षी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दिल्लीच्या विज्ञान भवनात भविष्यातील भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन या विषयावर तीन दिवस जनतेशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशीच्या भाषणात सरसंघचालकांनी संविधानाबद्दलची संघाची भूमिका विषद केली. संविधानाचे पालन करणे सगळ्यांचे कर्तव्य आहे आणि संघ संविधानाला प्रथमपासूनच मानतो, हे मोहनजींनी स्पष्ट केले. पण, संघद्वेषाची काविळ झालेल्या प्रकाश आंबेडकरांना हे दिसणार नाही अन् ऐकूही येणार नाही. संघाचे आतापर्यंतचे कार्य पाहिले की, ते संविधानानुसारच सुरु असल्याची खात्री पटते. पण, मुद्दे नसले की, तरुणांची माथी कशी भडकवणार, जातीयवादाचे विषारी विचार कसे पेरणार? म्हणूनच असा कुविचार करणाऱ्या प्रकाश आंबेडकर, ओवेसी वा अन्य कोणाकडूनही संघाविरोधात बोंब ठोकण्याचा तमाशा केला जातो. पण, काश्मीरपासून कन्याकुमारी अन् जामनगरपासून दिब्रुगडपर्यंत कुठेही गेलात तरी सर्वत्र संघ म्हणजे काय हे स्वयंसेवकांच्या कार्यातून, उपक्रमातून, कार्यक्रमातून जनतेला चांगलेच समजते. संघाची जनसेवेची कळकळही सर्वांना पाहायला मिळते. संघाची देशभक्ती, प्रखर राष्ट्रनिष्ठा देशवासीयांना अनुभवायला मिळते. म्हणूनच कोणीतरी आपल्याशी आघाडी करावी, दोन-चार जागांचे तुकडे फेकावे, असला आशाळभूत विचार करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या प्रमाणपत्राची संघाला गरज नाही, याची खुणगाठ त्यांनी मनाशी बाळगावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@