सत्कर्माची जेथे प्रचिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |

 


 
 
 
अनाथ बालकांचा प्रश्न’ हा समाजापुढील मोठा प्रश्न आहे. ही बालके जीवंत समाजाचा भाग असतात. मात्र, या बालकांची काही चूक नसतानाही त्यांना आयुष्यात विनाकारण आणि सातत्याने गंभीर परिणाम भोगावे लागतात. सर्वच अनाथ बालकांच्या समस्या सोडवू शकत नाही. मात्र, बदलापूर येथे ‘सत्कर्म बालकाश्रम’ आपल्यापरीने या बालकांच्या प्रश्नावर काम करत आहे.
 

समाजापासून विविध कारणांनी दुरावलेली लहान मुले ज्यांना खेळण्याची आणि प्रेमाची गरज असते, पण पालकांच्या व्यसनाधीनतेमुळे किंवा निधनामुळे वा गरिबीमुळे प्रसंगी होणारी मारझोड, ताणतणाव अशा आणि बऱ्याच कारणांमुळे या मुलांचे बालपण हिरावून घेतले जाते आणि अशी मुले नंतर वाईट मार्गावर जातात. अशा बालपण हिरावलेल्या मुलांचा मोठेपणी समाजविघातक कृत्यांकडे जास्त ओढा असतो. परिणामी, स्वस्थ समाज निर्मितीस ते बाधा आणतात व त्यामुळे समाजाची आणि देशाची प्रगती थांबते. समाजात जशा वाईट प्रवृत्ती असतात, तशा ध्येयाने प्रेरित आणि समाजाकरिता आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ असे मानणारेही बरेच जणं असतात. त्यातील एक कृ. गो. बेडेकर. त्यांनी ‘सत्कर्म बालकाश्रम’ची स्थापना २००० साली पाच मुलांना घेऊन केली आणि गेल्या १७ वर्षांपासून अशा अनाथ बालकांसाठी सोनीवली एरंजाड रोड, बदलापूर (प) येथे कार्यरत असून तेथे सध्या २५ मुले तेथे वास्तव्यास आहेत. संस्थेचे सचिव मकरंद वढवेकर यांचे मनोगत अगदीच मनाला स्पर्श करणारे होते.

 
त्यांनी सांगितले,"इथून मागे दहा ते बारा वर्षांपूर्वी वेगवेगळ्या कार्यालयात काम करणाऱ्या सात ते आठ जणांचा समूह एकाच ट्रेनमधून कामावर जायचा. त्यांच्या एकत्र प्रवासामुळे त्या सगळ्यांची घट्ट मैत्री जमली. सगळे मिळून प्रत्येकी ५० रुपये काढायचे आणि कोणत्या तरी एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेत जाऊन ते दान करायचे. याच दरम्यान त्यांनी ‘सत्कर्म आश्रमा’त गेले. असे बरेचसे महिने त्यांनी हे कार्य विविध संस्थांत निरंतर चालू ठेवले आणि यातूनच त्यांची समाजकार्याची आवड वाढत गेली. २६ जुलै, २००५ ची महाप्रलयी काळरात्र, तर सगळेच ओळखता. याच रात्रीत मकरंदजी नदीत वाहून गेले होते. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून बचावकार्याच्या प्रयत्नांत ते वाचले आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर त्यांना या आश्रमाची आठवण झाली. लगबगीने त्यांनी आश्रमाकडे धाव घेतली. सुदैवाने सगळी मुले सुरक्षित होती पण, संपूर्ण साधनसामुग्री वाहून गेली होती. त्याच दिवशी त्यांनी ठरवले, आता या आश्रमासाठी आपण काम करायचे आणि तेव्हापासून आजपर्यंत ते स्वत:ची नोकरी सांभाळून या आश्रमात कार्यरत आहेत. ती काळरात्र म्हणजे यांच्या आयुष्यातली मोठी कलाटणी होती.” हे नमूद करताना मला लगेच हिंदीमधील एक प्रसिद्ध ओळ आठवली, ‘जो भी होता है, वो अच्छे के लिये होता है।’ अर्थात, ती काळरात्र बऱ्याचशा वाईट आठवणींसोबतही एक चांगली शिकवणसुद्धा देणारी ठरली.
 
 

 
 

त्यांना आवडता प्रश्न विचारला,"एकंदरीत या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला खूप सारी ‘हॅप्पीवाली फीलिंग येत असेल ना?” यावर त्यांनी उत्तर दिले, “इथल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर उमटणारे निरागस हसू हीच आम्हा सगळ्यांसाठी मोठी हॅप्पीवाली फीलिंग आणि यासाठीच मुळात आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत.” या आश्रमाला शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून सध्या २५ मुलांकरिता विना अनुदान तत्त्वावर मान्यता मिळालेली आहे. संस्थेत संरक्षण व काळजीची गरज असणाऱ्या प्रत्येक बालकास शिक्षण, भोजन, वैद्यकीय उपचार व निवास इ. मूलभूत सोयी विनामूल्य पुरवल्या जातात. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे संस्थेचा दरमहा दोन हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. येथील सात ते १२ वयोगटांतील मुलांना संगणक व औद्योगिक प्रशिक्षणासोबत व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना शारीरिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे सत्कर्म अव्याहतपणे चालू आहे. शासनाच्या नियमानुसार, सर्व सोयी-सुविधांनी उपयुक्त अशी पाच हजार चौ.फुटांची स्वतःच्या मालकीची इमारत आहे, ज्यामध्ये रुग्णखोली, कर्मचारी निवास, संगणक कक्ष, वाचनालय, समुपदेशन कक्ष, भोजनालय, स्वयंपाक गृह, शयनकक्ष, शौचालय, सांस्कृतिक आणि मनोरंजन कक्ष इ. सोयी उपलब्ध आहेत. 

 

 
 

मकरंद वढवेकर

 

उत्तम नागरिक घडवण्याबरोबर समाजऋण फेडण्याचे सत्कर्म करणारी ही संस्था शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्यामुळे देणगीरूपाने मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरच अवलंबून आहे. पाच मुलांनी सुरुवात झालेल्या आश्रमात आत्ता भावी पिढीचे २५ नागरिक घडत आहेत आणि यांचा मानस हा आकडा लवकरच १०० गाठण्याचा आणि इथेच निवासी शाळा उभारण्याचा आहे. त्याप्रमाणे इमारतीच्या नियोजनाचे काम सुरू आहे. १०० मुलांच्या निवासासह इतर सुविधा असणारी इमारत उभारणे सोप्पे नाहीच. भांडवल, मनुष्यबळ याची आवश्यकता आहे. आपला समाज दानशूर आहे. चांगल्या कामाला स्वप्रेरणेने हात पुढे करतो. संस्थेच्या नियोजित इमारतीसाठीही सज्जन शक्ती नक्कीच मदत करेल. तसेही या ना त्या प्रकारे समाजाचे जागृत संवेदनशील व्यक्ती संस्थेला सहकार्य करत असतात. त्यापैकीच एक पंकज मोरे. चौकटीच्या बाहेरचे विश्व खूप सुंदर असते पण, ते अनुभवण्यासाठी आधी चौकटी बाहेर पडावे लागते. असेच काही चौकटीबाहेर जाऊन ‘क्यूब आर्ट’ हा अगदीच नवीन प्रकार पंकज मोरे नावाचा तरुण स्वयंसेवक आश्रमातील मुलांना शिकवत आहे. आश्रमातील प्रत्येक मुलात एक वेगळाच स्वावलंबीपणा आहे आणि डोळ्यात विश्वासाची धमक आहे, असं सांगत त्यांनी त्यांचं मनोगत मनमोकळेपणाने व्यक्त केले. त्याने सांगितले, “माझं नाव पंकज रमेश मोरे. मी टेक्सटाईल इंजिनिअर आहे. स्पीड क्युबिंग हा माझा छंद आहे. मला क्युबिंग इतकं आवडतं की, मी ट्रेनमध्येसुद्धा क्यूब सोडवत असतो. एकेदिवशी मला एक काका भेटले ट्रेनमध्ये. 

 
 

 
 

संस्थापक श्रीकृष्ण बेडेकर


 
त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं की,‘मी त्यांच्या मुलांना शिकवू शकतो का, क्यूब सोडवायला?’ आणि मला लोकांना क्यूब शिकवायला फार आवडतं. ते काका बदलापूरचे होते आणि त्यांचं ऑफिस बोरिवलीमध्ये होतं. मग मी त्यांच्या मुलांना शिकवलं. त्यांना शिकवता शिकवता काकांनी मला विचारलं, ‘अनाथ आश्रमातील मुलांना शिकवशील का? बस्स. मग काय मला ती कल्पना खूप आवडली. त्यानंतर मी प्रत्येक रविवारी त्या मुलांना शिकवायला जायचो आणि ती मुले खूप हुशार होती. त्यांनी फक्त एका महिन्यात क्युबिंग शिकून घेतलं आणि तेही एकदम योग्य पद्धतीने. त्यानंतर आमच्यामध्ये एक सुंदर असं नातं तयार झालं. आता मी नेहमी वेळ काढून त्यांना शिकवायला जातो. आनंद याचाच वाटतो की, त्यांना जे मिळणं कठीण होतं, ते मी त्यांना देऊ शकतो. आता माझं ध्येय असं आहे की, त्यांना मला मोठ्या स्पर्धेसाठी तयार करायचं आहे. क्युबिंगचाच एक भाग म्हणून आम्ही २६ जानेवारी, २०१९ रोजी क्यूब आर्टचा कार्यक्रम पार पाडला. त्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवली होती, त्याकरिता १५०० क्यूब वापरले गेले होते. महाराजांची प्रतिमा मुलांना खूप आवडली. एवढंच नाही, तर त्यांनी प्रतिमा बनवायलासुद्धा मदत केली. मुले आनंदी झाली. त्या प्रतिमेची लांबी साडेआठ फूट, तर रुंदी सहा फूट होती. माझ्यासाठी हा सर्वात सुंदर अनुभव होता, छोट्या सवंगड्यांसोबत काम करण्याचा.”
 
 

 
 

पंकज मोरे

 

पंकजसारखे तरुण खरे तर समाजाचे भूषण आहेत. या आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमलावे म्हणून तो आपल्यापरीने खारीचा वाटा उचलत आहेत. भावी पिढीतील गरजू मुलांना देशाचे आदर्श नागरिक बनवण्याचा विडा उचललेल्या आश्रमाचे कामकाज बघण्यासाठी व बालकांना भावी आयुष्याबद्दल शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या वेळेनुसार आपण सहकुटुंब-सहपरिवार या आश्रमास भेट देऊ शकतो आणि तुमचे वाढदिवस तिथल्या मुलांसोबत साजरे करू शकतो. तसेच या संस्थेच्या बालकांना आपण दत्तकही घेऊ शकतो. शेवटी इतकं सांगेन, अशा आश्रमांच्या कोणत्याही उपक्रमात तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी झालात, तर नक्कीच त्या मुलांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या निरागस हसूच कारण तुम्ही बनू शकाल आणि ते जर तुम्ही करू शकलात, तर आयुष्यात अजून दुसरं सुखं ते काय हवं?

 

- विजय माने

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@