अशी ही पाकी धर्मनिरपेक्षता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
अल्पसंख्याकांना कसे वागवायचे ते मोदी सरकारला दाखवून देऊ,” असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एक-दीड महिन्यापूर्वी केलं होतं. पाकिस्तानमधील ताज्या बातम्या पाहिल्या तर इमरान यांनी ते दाखवून द्यायला सुरूवात केली आहे, असं मानता येईल. सिंध प्रांतात एके ठिकाणी मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं. शिवाय, तेथील धार्मिक पुस्तके आणि मूर्तीही आगीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आल्या. आता या कृत्यानंतरच्या प्रतिक्रियाही लक्षणीय आहेत. सिंधमध्ये जिथे ही घटना घडली, त्या खैरपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी म्हणाले की, “हे कृत्य ज्यांनी केलं, त्यांचा शोध सुरू आहे.” पाकिस्तान प्रशासनानेही या घटनेबद्दल काळजी व्यक्त करूनकाही समाजकंटकांना धार्मिक सलोखा नष्ट करायचा आहे’ अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली. स्वतः इमरान खान यांनीही या घटनेचा निषेध वगैरे केला. पण, कारवाई मात्र झालेली नाही.
 

बहुधा हेच इमरान खान यांना मोदी सरकारला दाखवून द्यायचं असावं. पाकिस्तानमध्ये अगदीच दोन-अडीच टक्के उरलेल्या हिंदूंना कसं वागवायचं, त्यावर थाटामाटात प्रतिक्रियाही द्यायच्या आणि प्रत्यक्षात अळीमिळी गुपचिळी करून राहायचं, हेच इमरान खान यांचं धोरणच. धार्मिक सलोखा, सद्भावना, धर्मनिरपेक्षता वगैरे वगैरे शब्द ऐकायला खूप छान, गोडगोंडस वाटतात. पण, प्रत्यक्षात ते किती फसवे असतात, हे पाकिस्तानमधील हिंदू चांगल्याप्रकारे सांगू शकतील. ‘हिंदू’ हे नाव ज्या सिंधू नदीवरून मिळाल्याचं सांगितलं जातं, त्या सिंधू नदीच्या किनारीच हिंदूंनी नरकयातना पाहिल्या, यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. फाळणी झाली, त्यावेळी तत्कालीन पाकिस्तानात १२-१३ टक्क्यांच्या आसपास असलेली हिंदू लोकसंख्या आज जेमतेम २ टक्के उरली आहे. दुसरीकडे भारतातील मुस्लिमांची परिस्थिती पाहायची झाली तर फाळणीच्या दरम्यान ९-१० टक्क्यांच्या आसपास असलेली भारतातील मुस्लीम लोकसंख्या आज १४-१५ टक्क्यांच्या आसपास आहे. मुस्लीम लोकसंख्येचा वृद्धीदर अनेकदा हिंदूंपेक्षाही जास्त आढळून आला आहे. पाकिस्तानात सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला अल्पसंख्यांक समुदाय हा हिंदूंचा आहे, ज्याची लोकसंख्या २ टक्के आहे. हेच भारतात बहुसंख्यांक हिंदूंनंतर दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे १५ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लीम समुदायाला ‘अल्पसंख्याक’ म्हणवले जाते. हे सारे आकडे कुणाच्या मनातले नाहीत, तर अधिकृत जनगणनांचे आहेत. असं असतानाही, इमरान खान आमच्या केंद्र सरकारला सांगतात की, अल्पसंख्याकांना कसं वागवायचं, हे आम्ही तुम्हाला शिकवू! वाह.. भारत-पाकिस्तान फाळणीनंतरच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विनोद ठरावा.

 

ही जी काही दोन टक्क्यांची हिंदू लोकसंख्या पाकिस्तानात उरली आहे, ती बहुतेककरून सिंध प्रांतात आहे. त्याखालोखाल पंजाब, पण ती अगदीच असून नसल्यासारखी आहे. बाकी प्रांतांबद्दल न बोललेलंच बरं. म्हणजे त्यातल्या त्यात लक्षणीय संख्या ज्या भागात, तिथेही खुलेआम हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली जातात, मूर्ती-धर्मग्रंथ जाळले जातात, यावरून हिंदू समाज तिथे काय यातना भोगतो आहे, याची कल्पना येईल. आपल्याकडील उदारमतवादी, बुद्धिवादी आणि सेक्युलर वगैरे म्हणवून घेणारी मंडळी पाकिस्तानला जातात आणि तिथे सद्भावनेचे अश्रू ढाळून येतात. पाकिस्तानच्या प्रेमाचे गोडवे गातात आणि त्यानंतर भारतात येऊन भारतातच कशी धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे, हे बोंबलत बसतात. हा दांभिकपणा करणाऱ्यांना आपल्याकडे ‘बुद्धिवादी’ म्हणतात, ही आपली शोकांतिका आहे.

 

दरवर्षी साधारण पाच हजार पाकिस्तानी हिंदू हे भारतात पलायन करतात. पाकिस्तानी संसदेत एका मुस्लीम खासदाराने सांगितलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. हिंदू मुली, युवती आणि महिलांवर अनन्वित अत्याचार होतात, हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्तीने कुराण वाचायला लावले जाते, पाकिस्तानातील शैक्षणिक अभ्यासक्रमांत हिंदूविरोधी मजकूर शिकवला जातो, सार्वजनिक कार्यक्रमांत हिंदू समाजाला ‘कुत्ता’ वगैरे म्हटलं जातं आणि लोकही त्यावर टाळ्या वगैरे वाजवतात. हेही पाकिस्तानातून पळून आलेल्या हिंदूंचे अनुभव आहेत. बाकी सामुहिक हत्याकांड, घरांवर आणि मालमत्तांवर जबरदस्तीने ताबा वगैरे गोष्टीही सहजपणे घडत असतात. जिवंत हिंदू माणसाची ही अवस्था तर त्याच्या मंदिरांची काय, हेही लक्षात येईलच. खैरपूरमधील मंदिर उद्ध्वस्त केल्याची ही याच मालिकेतील दुर्देवी घटना म्हणावी लागेल. त्यामुळे इमरान खान यांनी अल्पसंख्याकांच्या सुरक्षेविषयी जगाला आश्वस्त करण्यापेक्षा, अशी दुष्कृत्ये करणाऱ्या समाजकंटकांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@