गलिच्छ राजकारणाचे ओंगळवाणे दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |


 


अनेक शेलक्या शब्दात बाळासाहेबांनी पवारांवर टीका केली होती. पूनम महाजन जे बोलल्या, ते तर खूपच सौम्य होते. पण मुद्दा असा की, पूनम महाजन असे काय म्हणाल्या की, त्यांच्या मृत पित्याच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण केले जावे?

 

शरद पवार कसे सुंसस्कृत,’ अशा झांजा वाजविणाऱ्यांचा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. यात कलाकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, माजी संपादक आहेत, खेळाडू आहेत, सिनेमावाले आहेत. यादी काही केल्या संपणार नाही. परवा कुमार सप्तर्षींनासुद्धा “पवार जातीयवादी नाहीत. मात्र, ते निवडणुकांत जातीयवादी होतात,” असा बचावात्मक पवित्रा घेता घेता नाकीनऊ आले होते. काही झाले की, ‘साहेब कसे सुसंस्कृतअशा झांजा वाजवायला कोणीही काहीही न सांगता ही मंडळी सुरू करतात. पवार कसे आहेत, हे राज्यतील जनता दर पाच वर्षांनी ठरवते आणि त्यांना त्यांची जागा दाखवतेच. मात्र, संघपरिवारावर मुखवट्याचे आरोप करणाऱ्याचे गलिच्छ चेहरे प्रसंगानुरूप गळून पडत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणाचा ओंगळवाणा चेहरा आता असाच समोर आहे. खा. पूनम महाजन यांच्या राजकीय विधानाला उत्तर देताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे तारतम्य सोडले आहे. रविवारी मुंबईत झालेल्या युवा मोर्चाच्या कार्यक्रमात पूनम महाजनांनी शरद पवारांची तुलना ‘शकुनी मामा’शी केली. थोडाफार चिमटा म्हणावा, असे ते विधान होते. वस्तुत: शरद पवारांचे राजकारण महाराष्ट्राने गेल्या चार दशकांत पाहिले आहे. ‘महाराष्ट्राची जाण असलेला नेता’ म्हणून पवारांचा जसा उल्लेख होतो, तसाच उल्लेख ‘पाठीत सुरा खुपसणारा राजकारणी,’ ‘आपल्याच राजकीय गुरूचा विश्वासघात करणारा अनुयायी,’ असा होत असतो. ‘भूखंडाचे श्रीखंड’ वगैरे या सगळ्या पवारांना लागलेल्या बिरूदावल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतच त्यांना मिळाल्या होत्या. दादोजी कोंडदेव प्रकरण, पुणेरी पगडी, मुख्यमंत्र्यांची जात काढणे या सगळ्या विषयांत पवारांवर टीका झालीच पण, या सगळ्यालाही मागे टाकेल, असे गंभीर आरोपही त्यांच्यावर झाले. पवारांचे असलेले गुन्हेगारी जगताशी संबध, तेलगीच्या वेळी झालेल्या चर्चा या सगळ्या पवारांच्या अपप्रतिमेत भर घालणाऱ्याच होत्या.

 

आत मुद्दा असा की, पूनम महाजन असे काय म्हणाल्या की, त्यांच्या मृत पित्याच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण केले जावे? पवारांना फक्त ‘शकुनी’ म्हटले, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाने होर्डिंग्स लावली आहेत. प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांचा खून का केला? असा सवाल याठिकाणी उपस्थित केला गेला आहे. निवडणुकांचा माहोल आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर निरनिराळे आरोप-प्रत्यारोप करणार? आणि टीकाही केली जाणार. पवारांवर अशी टीका आज पहिल्यांदा झालेली नाही. याहूनही अधिक शेलकी टीका पवारांवर बाळासाहेब ठाकरेंनी केल्या आहेत. ‘मैद्याचे पोते,’ ‘बारामतीचा म्हमद्या,’ ‘गरज सरली फिरणारा माणूस’ या आणि अशा कितीतरी लिहिताही येणार नाहीत, अशा टीका पवारांवर झाल्या आहेत. सार्वजनिक जीवनात माणूस उतरला की, त्याच्यावर आरोप-प्रत्यारोप होतच राहणार.

 

राजकारणी हे सर्वसामान्यांसाठी नायक किंवा खलनायक असतात. कोणाच्या कशा प्रतिमा निर्माण व्हाव्यात, याला ज्याचे त्याचे वर्तनच कारणीभूत असते. कोणाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात व्हाव्यात, अशा घटना राजकीय कुटुंबातही होत असतात. मात्र, त्याला विस्मयाची झालर लावून अनेक लोक आपली पोटे भरण्याचे उद्योग करीत असतात. असले गिधाडी उद्योग करणारे लोक आपली पोटे भरण्यासाठी ही कामे करतात. मात्र, एखादा राजकीय पक्ष जेव्हा आपले अधिकृत नाव लावून असले उद्योग करीत असतो, तेव्हा हे त्या पक्षाच्या प्रमुखाचेच खरे रूप असते. धरणात लघुशंका करून ते भरणारे अजित पवार, बाबांच्या नावाने लोकसभेत पोहोचून साड्यांवर चर्चा करणाऱ्या सुप्रिया सुळे, सध्या बेलगाम सुटलेले छगन भुजबळ हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. मनसबदारांचा पक्ष असलेली राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत काय करणार, हा खरा प्रश्न आहे. महाआघाडी की काँग्रेससोबत? स्वतंत्र की बाहेरून? अशा कुठल्याही प्रश्नांची उत्तरे माहीत नसलेल्या या पक्षाला स्वत:च्या पक्षापेक्षा इतर पक्षातले मोठे नेते काय म्हणतात, यातच जास्त रस आहे. मोदी-शाह यांच्यावर होणारी टीका अनेकदा रास्त वाटते. कारण, त्यांनी अशा बांडगुळांना परतीचे तिकिटे देऊन टाकली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@