कांगावखोर आनंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |


मुद्दा तेलतुंबडेचा जरी असला तरी बुद्धिजीवी गोटातला दुटप्पीपणाही समोर आणलाच पाहिजे. दुसरीकडे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत जर तेलतुंबडेला अटक केली असेल तर त्यात काय चुकीचे केले? कारण, सर्वोच्च न्यायालयानेच सत्र न्यायालायात जाण्यास सांगितले होते, तसे ते गेलेही. सत्र न्यायालयाने निकाल दिला व तेलतुंबडेला अटक झाली.

 

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आनंद तेलतुंबडेने काल मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद न घेता वार्तालाप केला. वार्तालाप कार्यक्रमाच्या आधीच प्रश्न न विचारता आनंद तेलतुंबडेकडून केवळ माहिती घ्यावी, असे आवाहन करत आयोजकांनी एकप्रकारे अडचणीत आणणारे प्रश्न विचारलेच जाऊ नयेत अशी खेळीही केली. उल्लेखनीय म्हणजे, माओवाद्यांशी संबंध असल्याचा, माओवाद्यांनी पॅरिसमधील परिषदेला पैसा पुरवल्याचा तसेच शनिवार वाड्यावरील एल्गार परिषद व नंतर उसळलेल्या दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या आनंद तेलतुंबडेचा येथे ‘सुप्रसिद्ध विचारवंत’ असे म्हणत गौरवही करण्यात आला. मात्र, पुणे सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडेबद्दल जी विधाने केली, ती लपवण्याची चलाखीही केली गेली. पुणे सत्र न्यायालयाने आनंद तेलतुंबडेचा जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट शब्दात, तेलतुंबडेवर असलेल्या गुन्ह्यामध्ये पुरेसा पुरावा असल्याचे म्हटले होते. याच निर्णयाचा आधार घेऊन पुणे पोलिसांनी तेलतुंबडेला ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर त्याआधी मुंबई उच्च न्यायालयातही तेलतुंबडेने जामिनासाठी अर्ज केला होता. तेव्हा, याचिकाकर्त्याविरोधात सबळ पुरावे आहेत आणि राज्य सरकार किंवा पोलीस त्यांना गोवण्याचा प्रयत्न करत नाही, असे स्पष्ट केले होते. शिवाय हा गंभीर गुन्हा असून खोलवर रुजलेला, घातक परिणाम करणारा कट असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. म्हणजेच न्यायालयाने आनंद तेलतुंबडेवरील आरोप नाकारले नव्हते. तरीही आज आनंद तेलतुंबडे आणि त्याला पाठींबा देणार्‍या टोळक्यांनी जणू काही आनंद एखादा निष्पाप मनुष्य असल्याच्या थाटात वार्तालापाचे आयोजन केले.

 

आनंद तेलतुंबडेच्या अटकेवरून देशात हुकुमशाही माजल्याचा, लोकशाही धोक्यात आल्याचा, संवैधानिक संस्थांचे अस्तित्व संपवण्यात येत असल्याचा खोटारडेपणा गेल्या दोन दिवसांपासून ‘बुद्धिवादी’ म्हणवल्या जाणार्‍या वर्तुळातून केला गेला. पण, याच लोकांना परवा पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनी सीबीआय अधिकार्‍यांची राज्य पोलिसांनी केलेली अटक दिसली नाही. तिथे तर ‘राज्य विरुद्ध केंद्र’ असा उभा दावा ममतांनी मांडला. पण, त्याविरोधात कोणाच्या तोंडातून हु की चू सुद्धा निघाले नाही. मुद्दा तेलतुंबडेचा जरी असला तरी बुद्धिजीवी गोटातला दुटप्पीपणाही समोर आणलाच पाहिजे. दुसरीकडे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत जर तेलतुंबडेला अटक केली असेल तर त्यात काय चुकीचे केले? कारण, सर्वोच्च न्यायालयानेच सत्र न्यायालायात जाण्यास सांगितले होते, तसे ते गेलेही. सत्र न्यायालयाने निकाल दिला व तेलतुंबडेला अटक झाली. तेलतुंबडेच्या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांच्या मुदतीची महतीही कित्येकांनी गायली. पण, तो केवळ तांत्रिक मुद्दा आहे. त्यात कुठेही तेलतुंबडे निर्दोष असल्याचे म्हटलेले नाही. दुसरीकडे आनंद तेलतुंबडे ज्या सफाईने आपला बचाव करताना दिसतात, त्यावरून हा माणूस फार पोहोचलेला असल्याचा प्रत्यय येतो. कारण, आपला माओवाद्यांशी संबंध नसल्याचे आनंद तेलतुंबडेने जे सांगितले, ते कोणालाही सत्य वाटावे असेच आहे. मात्र, मानवी स्मरणशक्ती बर्‍याचदा जुन्या घटना लक्षात ठेवत नाही व याचाच फायदा तेलतुंबडेसारखे लोक घेतात.

 

गेल्या वर्षी १७ एप्रिल रोजी सुधीर ढवळे, हर्षली पोतदार वगैरेंच्या घरी पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी सापडलेल्या कागदपत्र व पुराव्यांच्या आधारावर आनंद तेलतुंबडेचे नाव या प्रकरणात समोर आले. नंतर पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या एका पत्राचाही उल्लेख केला होता. या पत्रात आनंद तेलतुंबडेचे नाव घेतले होते. पण, हे मुद्दे नेहमीच विसरले जातात किंवा हे पोलिसांनी रचलेले कुभांड असल्याचा कांगावा करताना ते दिसतात. पण, अनुराधा गांधी या माओवादी महिलेशी, तिच्या संस्थेशी व विचारांशीही आनंद तेलतुंबडेचा जवळचा संबंध आहे. २०१२ साली आनंद तेलतुंबडेने अनुराधा गांधीने लिहिलेले लेख पुन्हा प्रकाशित केले. हे तर काहीच नाही, पण ‘रिव्होल्युशनरी व्हायोलेन्स व्हर्सेस डेमोक्रसी’ नावाचे एक पुस्तक आहे. त्यामध्ये आनंद तेलतुंबडेने लेख लिहिला. याच लेखात त्याने माओवाद्यांची हिंसा कशी बरोबर आहे, असे लिहित हिंसाचाराचे समर्थन केले. आज ‘सीपीडीआर’ या संस्थेचा आनंद तेलतुंबडे सेक्रेटरी आहे, पण ही संस्थाही अनुराधा गांधी आणि कोबड गांधी या दोन माओवाद्यांनीच सुरु केली होती. आज हाच माओवाद्यांशी एवढा जवळचा संबंध असलेला माणूस बेधडकपणे माओवाद्यांशी असलेला संबंध नाकारतो, याला ‘वेड घेऊन पेडगावला जायचे’ असे नाही म्हणणार तर काय म्हणणार? सोबतच आनंद तेलतुंबडेला अटक झाल्यानंतर त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम उघडणारी ‘आंबेडकर इंटरनॅशनल’ संस्थाही याच अनुराधा गांधीशी संबंधित आहे.

 

इथे आणखी एक मुद्दा उपस्थित केला जातो, तो म्हणजे विचारवंतांच्या गळचेपीचा. पण, आनंद तेलतुंबडे असो किंवा आधी बेड्या ठोकलेले वरवरा राव, सुधा भारद्वाज आदी असोत, या लोकांना संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेने आणि पुराव्यानिशीच अटक केलेली आहे, ही गोष्ट आधी लक्षात घेतली पाहिजे. जर तसे नसते तर आनंद तेलतुंबडेला ऑगस्ट २०१८ मध्येच अटक केली असती. पण, तसे केलेले नाही. सोबतच सर्वोच्च न्यायालयात आपल्यावरील एफआयआर रद्द करण्याचा आनंद तेलतुंबडेचा दावाही फेटाळला गेला होता. म्हणजेच, इथे कोणत्याही प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट सर्वसामान्य वनवासी, वंचित, शोषितांचा आवाज दाबण्याचे, त्यांचे खून करण्याचे सत्र जंगली माओवाद्यांनी आरंभले. हिंसाचार हाच शिष्टाचार झाला, सरकारी योजनांचे फायदे माओवाद्यांनी वनवासी बांधवांना मिळू दिले नाहीत. मुली पळवून नेल्या, तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना मारायलाही कमी केले नाही. असे असतानाही आनंद तेलतुंबडे असो की अन्य कोणी, ते या हिंसाचाराचीच पाठराखण करतात. आजही आनंद तेलतुंबडेने मी याआधी अटकेत असलेल्या लोकांच्यासाठी झटल्याचे म्हटले. कारण, ते लोक जनतेची बाजू मांडत होते. पण तसे काहीही नाही, हे त्यांच्या कृत्यावरून व त्यांचे ज्यांना समर्थन आहे, त्यांच्या वागणुकीवरून दिसते. खरे म्हणजे हे सगळेच लोक अराजकाचे पाठीराखे आणि समर्थक आहेत आणि पोलीस, सरकार, न्यायालयावर प्रश्नचिन्ह लावून किंवा त्याचा हवा तसा अर्थ काढून त्यांना देशात अनागोंदी माजवायची आहे. त्यासाठीच त्यांची सगळी धडपड चालू आहे आणि आपल्यातला कोणी गजाआड गेला की भांडे फुटू नये म्हणून त्यांची अशी आजच्यासारखी फडफड होताना दिसते. म्हणूनच जनतेने यांचे खरे रूप ओळखले असल्याने कितीही आदळआपट केली तरी त्यांना मूठभरांच्या हल्ल्यागुल्याशिवाय काहीही मिळत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@