‘ममते’चा ताबा अविवेकाकडे!; कोलकात्यातील थयथयाटाचे पडसाद दिल्लीसह देशभरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली / कोलकाता : शारदा चीट फंड घोटाळ्याच्या चौकशीच्या मुद्द्यावरून सीबीआय आणि बंगाल पोलिसांमधीलसंघर्षाचे संतप्त पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

 

या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराच्या तसेच शून्य तासाचे कामकाज होऊ शकले नाही. भोजनावकाशानंतर दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा सुरू होणार होती, पण गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागल्यामुळे ही चर्चा आज सुरू होऊ शकली नाही.

 

तत्पूर्वी, लोकसभेत या मुद्द्यावर निवेदन करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, “बंगालमध्ये जे काही घडले, त्यामुळे संघराज्य प्रणालीला धोका उत्पन्न झाला असून, त्याचे देशावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार आहेत,” असा आरोप राजनाथसिंह यांनी केला. राजनाथसिंह म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय शारदा चीट फंड घोटाळ्याची चौकशी करत आहे. या घोटाळ्याचे लागेबांधे अनेक राज्यात पसरले असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली बंगालमध्ये लाखो लोकांच्या कष्टाच्या पैशांची लूट करण्यात आली. या लोकांना जेव्हा आपला पैसा परत मिळाला नाही, तेव्हा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानेच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या देखरेखीखालीच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांच्या सहभागाची शक्यता न्यायालयानेच वर्तवली होती.

 

कोलकाताचे पोलीस आयुक्त चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे सीबीआयला नाईलाजाने त्यांच्या निवासस्थानी जावे लागले,” याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, “पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी जाण्यापासून बंगाल पोलिसांनी सीबीआयच्या अधिकार्‍यांना रोखले आणि त्यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बंगाल पोलीस आणि सीबीआय यांच्यात संघर्षाची स्थिती उद्भवली होती. तेथील परिस्थिती इतकी गंभीर झाली की, सीबीआय मुख्यालयावर सीआरपीएफ तैनात करावी लागली.

 

केंद्र सरकार नेहमीच संघराज्यप्रणालीचा आदर करत आले आहे, मात्र, कोलकाता येथे रविवारी रात्री जे घडले, त्यामुळे तेथे घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे ढासळल्यासारखी स्थिती उद्भवली होती,” असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, “यासंदर्भात राज्यपालांशी माझी चर्चा झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांसोबत तातडीची बैठकही घेतली. राज्यातील या घटनाक्रमाबाबत अहवाल पाठवण्याची सूचना राज्यपालांना करण्यात आली आहे. चौकशी यंत्रणांना आपले कायदेशीर कर्तव्य निष्पक्षपणे बजावू द्यावे,” असे आवाहनही राजनाथसिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले. तृणमूल काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गोंधळात राजनाथसिंह यांना हे निवेदन करावे लागले.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई - सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव

शारदा चीट फंड घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई करीत आहोत. याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात पुरावे असून, ते नष्ट करण्यात येत असल्याचे काम बॅनर्जी सरकारकडून होत आहे.

 

ममता सरकारविरोधात भाजपकडून निवडणूक आयोगाची भेट

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारसभांना प्रतिबंध केला जात असल्याचा आरोप करत राज्यात निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्या म्हणून निवडणूक आयोगाने उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपने आयोगाकडे केली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात भाजपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

 

चोर, डाकूंच्या पाठीशी ममता : काँग्रेस खासदार

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीबीआयमधील वादात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममतांना पाठिंबा जाहीर केला असतानाच, या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये फूट पडली. बंगालमधील काँग्रेसचे खासदार व माजी प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी “ममता बॅनर्जी चोर आणि डाकूंच्या पाठीशी उभ्या आहेत,” असा मोठा आरोप करून, राहुल गांधींनाच तोंडघशी पाडले.

 

पुरावे दिल्यास आयुक्तांना अद्दल घडवू - सर्वोच्च न्यायालय

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी शारदा चीट फंड घोटाळ्याशी संबंधित पुरावे नष्ट केले असल्याचे पुरावे सादर केल्यास त्यांना जन्मभराचा पश्चाताप होईल इतकी कठोर कारवाई आम्ही करू, अशी ग्वाही सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिली. बंगाल पोलीस आणि सीबीआयची भूमिका ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करण्याचे निश्चित केले.

 

बंगालच्या राज्यपालांचा अहवाल केंद्राला सादर

शारदा चीट फंड घोटाळ्याप्रकरणी राज्यात उद्भवलेल्या स्थितीवरील अहवाल राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी सोमवारी केंद्र सरकारला सादर केला. राज्यपालांनी सोमवारी सकाळी आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपविला. यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत फोनवरून चर्चाही केली.

 

घटनेच्या रक्षणासाठी सत्याग्रह सुरूच राहणार

कोलकाता देशाची लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी माझा सत्याग्रह सुरूच राहणार आहे,” अशी भूमिका बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारीमांडली. ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर दोन जिल्ह्यांमध्ये तृणमूल काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे गाड्या अडविल्या. दरम्यान, रविवारी रात्री ममता यांनी जेवणही घेतले नाही. मेट्रो चॅनेलच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या मंचावर आपल्या काही मंत्री व पक्ष नेत्यांसह त्या धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. “आज देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झालेली आहे. आणीबाणीपेक्षाही ही स्थिती भीषण असून, लोकशाही आणि राज्य घटनेचे रक्षण करण्यासाठी माझे आंदोलन सुरूच राहणार आहे,”असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@