यंदा करवाढ नाही; मुंबईकरांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |

 

 


मुंबई : मुंबई महापालिकेचा २०१९-२०२० या वर्षीचा ३० हजार, ६९२ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नसून, मुंबईकरांना करवाढीपासून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी ३,३२३.६४ कोटींची तरतूद केली आहे. रस्ते, पर्जन्यजल वाहिन्या आणि माहिती- तंत्रज्ञान विकासाबरोबरच आरोग्यसेवेवर यात भर दिला आहे.

 

यंदाच्या वर्षाकरिता आर्थिक तरतुदीची विभागणी करताना जास्त प्राधान्यक्रम देण्यात आलेल्या खात्यांना एकूण अर्थसंकल्पापैकी ५१ टक्के तरतूद केली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा मोठा भाग हा रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या आणि महिती-तंत्रज्ञान या बाबींवर खर्च करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा व मलनिस्सारण यासाठी १५ टक्के म्हणजेच ४,५२८ कोटी, तर आरोग्यासाठी १३ टक्के म्हणजेच ४,१५१ कोटींची तरतूद केली आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पालिकेने याच अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तर महापौर बंगला उभारण्यासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. मुंबईतील महत्त्वाचा अशा कोस्टल रोडला चालना मिळावी, यासाठी या अर्थसंकल्पात १,६००.०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सन २०१९-२० मध्ये एकूण ३७० किमी रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअरचे धडे मिळणार

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअरसह थ्रीडी डिझाइन आणि प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक रोबोट, मोबाईल अ‍ॅप बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतच्या तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा सन २०१९-२० चा २७३३.७७ कोटीचा अर्थसंकल्प सोमवारी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांना सादर केला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात १६४.४२ कोटींनी वाढ केली.

 

मुंबईला विकासाच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प

मुंबईकरांवर कोणत्याही प्रकरची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर केल्यामुळे मुंबईकरांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. शिवसेनेने मुंबईकरांना दिलेल्या वचनानुसार अनेक विकास कामे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प मुंबईला विकासाच्या दिशेने नेणारा ठरेल.

- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

अर्थसंकल्पातील योग्य वापरावर लक्ष ठेवणार

एकीकडे पालिकेचे महसुली उत्पन्न कमी होत असताना दुसरीकडे सुरू असलेल्या प्रकल्पांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे विद्यमान प्रकल्प पूर्ण करण्यावर महापालिका आयुक्तांनी भर दिलेला दिसून येतो. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा योग्य वापर करण्याकडे भाजप लक्ष ठेवणार आहे

- मनोज कोटक, गटनेता भाजप

काल्पनिक अर्थसंकल्प

कोस्टल रोड पाणीपुरवठा प्रकल्प ,सायकल ट्रॅक आदी प्रकल्पासाठी तरतूद केली आहे. मात्र खर्च होत नाही. तसेच सेवाशुल्क का मुंबईकरांवर का लादण्यात आले? हा काल्पनिक अर्थसंकल्प आहे. खोटी स्वप्ने दाखविण्याचा प्रयत्न आहे. ३०० कोटींचे गाजर दाखवले आहे.

- रवि राजा, विरोधी पक्षनेते

 

या आहेत मुख्य अर्थसंकल्पातील तरतुदी

 

> मुंबईतील महत्त्वकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी १६०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

 

> बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहत दुरूस्तीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे.

 

> बेस्टला ३४.१० कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

 

> रस्ते विभागासाठी १५२० कोटी रूपये तर पूल विभागासाठी ६०० कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे.

 

> गोरेगाव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

 

> मुंबईच्या 'विकास आराखडा २०१४ - २०३४'च्या अंमलबजावणीसाठी ३३२३ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

 

> तानसा मुख्य जलवाहिन्यांलगत सायकल मार्गिकेसाठी १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

> महापौरांचे नवे निवासस्थान शिवाजी पार्कात होणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद केली असून २७४५ चौमी जागेत होणाऱ्या या निवासस्थानाच बांधकाम यावर्षीच सुरू करण्यात येणार आहे.

 

> देवनार इथे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे.

 

> मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्यासाठी ४३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

> राणीबाग प्राणी संग्रहालय विस्तारीकरणासाठी ११० कोटी दिले आहेत.

 

> दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५ कोटींची तरतूद केली आहे.

 

> मुंबईच्या 'विकास आराखडा २०१४ - २०३४'च्या अंमलबजावणीसाठी ३३२३ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@