ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर कालवश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचे ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगामुळे वयाच्या ७०व्या वर्षी निधन झाले. त्यांनी एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या हिंदी चित्रपटामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या मालिकांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली होती. ते अखेरच्या क्षणापर्यंत काम करत होते. 

 

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे शेवटचे दिवस काम करायचे या इराद्याने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले. तरीही रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरुन त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. 'अश्रूंची झाली फुले' हे त्यांचे नाटक तर प्रचंड गाजले होते. त्यामधील त्यांची 'लाल्या'ची भूमिका विशेष गाजली होती. तसेच त्यांची 'केव्हा तरी पहाटे', 'अखेर तू येशीलच', 'राहू केतू', 'मुक्ता' यांसारखी अनेक नाटके गाजली.

 

१९७७मध्ये आलेला 'चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे त्यांना महाराष्ट्रातील गावागावांमध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्येही ते महत्त्वाच्या भूमिका केल्या. काही वर्षांपूर्वीच ते 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत दिसले होते. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे. 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@