तूच तुझा रे सखासोबती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |




वत्सल सखा दुसरा-तिसरा कोणी नसून आपणच आहोत, हे समजायला आपला पूर्ण जन्म जातो. या प्रिय सख्याबरोबर संवाद साधताच आला नाही, याची जाणीव आपल्यापैकी कित्येकांना होतच नाही. अज्ञानाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, पण हे सत्य आहे.

 

आपण जेव्हा महासंकटात असतो, तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासते? शत्रुची की मित्राची? याच्या उत्तरासाठी आपल्याला खूप अक्कल वापरण्याची अजिबात गरज नाही. संकटाच्या महाभारतात गरज भासते ती कृष्णाची. आपल्या कल्याणाचा सदैव विचार करणार्‍या सख्याची. आपल्यापैकी बर्‍याचजणांना, जवळजवळ सर्वांनाच हा सखा शोधायचे अपरिमित कष्ट घ्यावे लागतात. बर्‍याच वेळा अथक प्रयत्नांची पराकष्ठा करूनसुद्धा हा स्नेही कोणाला सापडत नाही. सापडणार तरी कसा? तो जेथे असतो तेथे आपण त्याला आपण शोधत नाही आणि पूर्ण जग धुंडाळत राहतो. याचे कारण हा सखा कोण आहे, याचे मुळातच आपल्याला ज्ञान नसते. खरे तर या अवस्थेलाच आपण ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असे म्हणतो. हा वत्सल सखा दुसरा-तिसरा कोणी नसून आपणच आहोत, हे समजायला आपला पूर्ण जन्म जातो. कधी कधी आपले या पृथ्वीतलावरचे अस्तित्त्व पूर्ण होते. पण, आपल्याला या प्रिय सख्याबरोबर संवाद साधताच आला नाही, याची जाणीव आपल्यापैकी कित्येकांना होतच नाही. अज्ञानाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, पण हे सत्य आहे.

 

आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला स्वाभिमान वा स्वत:बद्दलचा सन्मान महत्त्वाचा वाटतो. कारण, आपला आनंद त्यावर अवलंबून आहे, अशी आपली धारणा असते. अर्थात, आपल्या सन्मानात आपले ऐहिक व मानसिक स्वातंत्र्य आपण अनुभवत असतो. आपली योग्यता व जगातले आपले महत्त्व आपण आपल्या ‘स्व’ सन्मानातून अनुभवत असतो. तसे पाहिले, तर ते सर्वसामान्यपणे खरे आहे. आपण ताठ मानेने वावरतो, तेव्हा आपली मानसिक ताकद भक्कम आहे, याची प्रचिती आपल्याला येत राहते. पण, जोपर्यंत आपण आपल्या योग्यतेसाठी आपल्या सन्मानावर अवलंबून राहत नाही, तोपर्यंत सगळे आलबेल असते. पण, जेव्हा आपण स्वत:ला ‘चांगले’ वा ‘वाईट’ या संकल्पनेचा केवळ ‘स्व’ सन्मानाच्या नजरेतून पाहतो तेव्हा गोष्टी बिघडतात. त्या अर्थाने स्वाभिमान हा आपल्यासाठी पोषक नसतो. कारण, आपण स्वत:ला एक इहलोकीचा पामर आहोत, ही गोष्टच नाकारतो. आपण काही चुका माणूस म्हणून करतो किंवा या आपल्याकडून अजाणतेपणी होतात, हे विसरून जातो. यामुळे आपण स्वत:लाच न्याय-अन्यायाच्या, चूक-बरोबरच्या, सत्य-असत्याच्या न्यायालयात उभे करतो. स्वत:शीच निर्दयी वागू लागतो. अशावेळी आपणच हल्लेखोर असतो आणि त्या हल्ल्याचे बळीही ठरतो. खरे तर मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ वास्तवातून आपल्या जीवनचक्राकडे पाहणे जास्त उपयुक्त आहे.

 

समस्यांना ओळखून, त्यांना स्वीकारून आपल्या जीवनाला मार्गी लावण्यात आपल्या जीवनाचा सहिष्णूतात्मक पाया रचला जातो. हा पाया खर्‍या अर्थाने आपली आपल्या जीवनाशी झालेल्या सख्याचे घोतक आहे. हे सख्य दीर्घकालीन असतेच, शिवाय ते खंबीर असते. यात माणसाला जीवनातील नकारात्मक पैलूंची जाणीव असल्यामुळे ते लपविण्याची गरज भासत नाही. जीवनाच्या अनपेक्षित जेरीत आणणार्‍या अनुभवाला आपण स्वत: तर आत्मविश्वासाने सामोरे जातोच, शिवाय जगासमोरसुद्धा कणखरपणे उभे राहतो. अशावेळी केवळ आत्मविश्वास नाही, तर आपण एक पामर आहोत, यामुळे आपत्याही काही मर्यादा आहेत, हे आपण समजून घेतो. माणूसपणाच्या मर्यादा जेव्हा माणसाला समजतात, तेव्हाच त्याला स्वत:बद्दल जितका आपलेपणा वाटतो, तितकाच तो दुसर्‍याबद्दल वाटतो. आपण असे म्हणतो की, दुसर्‍याचे दु:ख समजायला आपल्या स्वत:ला ते दु:ख अनुभवायला यावे लागते. खरे तर यात तथ्य नाही. दु:खाची व्यक्तता आणि भाषा, आविर्भाव वेगवेगळे असतात. पण, त्याचा अव्यक्त गाभा मात्र समान असतो. हा अव्यक्त गाभा समजून घेणार्‍याकडे मात्र माणुसकी असते. या माणुसकीत माणसाबद्दलचा विश्वास औदार्य, सुरक्षिततेची भावना, सहचार्य या सर्वांचा सहभाग आहे. जोपर्यंत प्रेमाची व दयेची भाषा माणसाच्या अंतर्मनात वसलेली असते, तोपर्यंत त्याच्या भावविश्वात विश्वबंधुत्त्वाची भावना वस्तीला असते. अशावेळी माणसाला या जगातील कायमच अस्तित्त्वात असणारी माणुसकी कायम अनुभवता येईलच.

 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@