अण्णांच्या अंगणाचा ‘राज’मार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019   
Total Views |



 

राजकारणात कधी, कोण, कोणाच्या गळ्यात हात घालून अगदी पळत सुटेल आणि कधी, कोण, कोणाच्या पायात पाय घालून त्याला जमिनीवर पाडेल, याचा नेम नाही. सध्या हेच चित्र देशात अगदी धडधडीतपणे दिसते. एकमेकांच्या सावलीलाही कधी उभ्या न राहणार्‍या सार्‍या मोदीविरोधकांनी आता हातात हात घातल्यामुळे त्यांना मनगटातएकीचे बळ’ संचारल्याचे भ्रम होतात. आज या राज्यात, तर उद्या त्या राज्यात या एकीच्या शक्तिप्रदर्शनाचे छोटे-मोठे सोहळे पार पडतात आणि मोदींवर एकत्र तुटून पडण्याची ही आयती संधी कोणीही सोडत नाही. महाराष्ट्रातही सध्या हे मोदीविरोधाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यात धड ना काँग्रेसकडे, ना शिवसेनेकडे झुकलेल्या राज ठाकरेंनाही महाआघाडीचे वेध लागल्याचे दिसते. शरद पवार, अहमद पटेल यांच्याशी झालेल्या चर्चा हे वरकरणी तसे संकेत देतात. उद्धव ठाकरे यांनी अण्णा हजारेंच्या उपोषणावर त्यांचा पक्ष स्वत:च सहभागी असलेल्या सरकारला याकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिला. मग काय, राज कसे बरं मागे राहतील म्हणा. त्यांनी थेट राळेगणसिद्धीचा रस्ता धरला. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, म्हणून राज यांनी अण्णांची समजूतही काढली. पण, कोणाचं सहजासहजी ऐकतील ते अण्णा कसले... राज ठाकरेंनी अण्णांना भेटायला जाण्यात गैर काहीच नाही. पण, तिथेही जाऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं बिनकामाचं, अपेक्षाभंग करणारं, दगाबाज आहे, याचाच पाढा राज यांनी वाचला. एवढंच नाही, तर उपोषण सोडून ही राजवटच गाडून टाकण्यासाठी काय करता येईल, ते करावे असा न मागता अण्णांनाही सल्ला दिला. यावरून हाच प्रश्न पडतो की, इतक्या वर्षांत किती वेळा राज ठाकरे यांनी जनलोकपाल विधेयकाविषयी अण्णांशी चर्चा केली? सरकारी पातळीवरील भ्रष्टाचाराचा मुद्दा राज यांनी किती वेळा मांडला? फडणवीस-मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे तरी समोर आली का? तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असेल. अण्णांचा वापर करून केजरीवाल, मोदी सत्तेवर आले, असंही राज म्हणाले. केजरीवालांचं ठीक, पण अण्णांच्या आंदोलनाचा आणि मोदी सत्तेवर येण्याचा तसा काडीमात्रही संबंध नाही. उलट, आता खुद्द राज ठाकरेच अण्णांच्या अंगणी न बोलवता दाखल झाले, ते केवळ अण्णांच्या समर्थनासाठी की मोदींवर आगपाखड करण्यासाठी? त्यामुळे मोदीविरोधातील लढाईत उगाच अण्णांच्या खांद्यावरून बंदुक चालण्याचा हा प्रयत्न सर्वस्वी केविलवाणाच म्हणावा लागेल.

भैय्या-भैय्या... भाई-भाई...

 

झाडावरील कोमजलेले फूल पाहून कोणाला दु:ख होईल, तर किमान फूल कोमेजले तरी झाड तर तग धरून आहे ना, यातही समाधान मानणारेही दिसतील. ‘अपना अपना नजरिया.’ राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातही सध्या हाच ‘नजरिया’ प्रकर्षाने नजरेत भरतो. कोणी ‘फिर एक बार मोदी सरकार’च्या घोषणा देतं, तर कोणाला राहुल गांधींमध्ये देशाचे भावी पंतप्रधानच दिसतात. यापूर्वी द्रमुकच्या स्टालिनने जाहीररीत्या राहुलच पंतप्रधानपदाचे योग्य दावेदार असल्याचे सांगितल्यानंतर आता लालूपुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही राहुल भैय्याच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचा पुनरुच्चार पाटण्यातील एका रॅलीत केला. तेजस्वींकडून राहुल गांधींचे समर्थन तसे अगदी नैसर्गिकच. कारण, आपल्या पक्षाचा ‘दिवा’ काँग्रेसच्या ‘हाती’ दिल्यामुळेच लालू इतके वर्षं चारा घोटाळा करूनही तुरुंगवासापासूनच दूर राहिले. पण, मोदी लाटेत ‘हात’ पुरता खिळखिळा झाला, ‘दिवा’ मिणमिणला आणि लालू कारागृही झाले. त्यामुळे आपल्या पित्यावरील उपकारांचे हे काँग्रेससोबतीचे ओझे तेजस्वी भैय्याला वाहण्यासाठी दुसरा पर्यायही नाही. नितीशचाचांशीही त्यांनी युती करुन बघितलीच, पण चाचा हुशार निघाले. पुन्हा रालोआच्या तंबूत दाखल झाले. त्यामुळेच काँग्रेसच्या ‘भैय्या’शिवाय राजदला दुसरा ‘भाई’ सापडूच शकत नाही. गेल्या वर्षी या तेजस्वी-राहुलची ‘खाने पे चर्चा’ दिल्लीत झाली होती. म्हणजे भैय्या-भाईचे संबंध अगदी जिव्हाळ्याचेच. त्याचे दर्शन पाटण्याच्या रॅलीतही झालेच म्हणा. राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगताना मात्र तेजस्वींनी या महागठबंधनाच्या सरकारात प्रत्येक पक्षाला उचित सन्मान मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राहुल भैय्यांनीही तेजस्वी भाऊंचा शब्द अगदी उचलूनही धरला. कारण, बिहारमधील यादव, मुस्लिमांची मोठी व्होटबँक आज राजदकडे आहे. त्यामुळे बिहारमध्ये राजदशिवाय काँग्रेसला पर्याय नाही. बिहारमध्येही अजून लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाह यांनाही सोबत घेतल्यामुळे काँग्रेस-राजदला काही जागांवर पाणी सोडावे लागेल आणि तेजस्वी भैय्या तर किमान २० जागा लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे बिहारमध्ये भैय्या-भैय्या ‘भाई-भाई’ होणार हे निश्चित, पण थोरला कोण आणि धाकटा कोण, ते जागावाटवपानंतर कळेलच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@