अशी ‘नाटके’ करून किती काळ तग धरता येईल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019   
Total Views |


पश्चिम बंगालच्या चीट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे हात बरबटलेले आहेत. या सर्व प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. पण, ते ममता बॅनर्जींना आपल्या विरूद्धचे कटकारस्थान वाटते. केंद्र सरकारविरुद्ध विविध प्रकारे आणि विविध मार्गांनी अपप्रचार करूनही त्याद्वारे आवश्यक तो परिणाम साधला जात नसल्याचे लक्षात घेऊन ममतादीदींनी हा मार्ग चोखाळल्याचे ठरविलेले दिसते.

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या जानेवारी महिन्यात कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर सर्व विरोधकांना निमंत्रित करून शक्तिप्रदर्शन केले. ते बघून त्या चेकाळून गेल्या आहेत की काय, असे केंद्र सरकार, केंद्र सरकारच्या सीबीआयसारख्या संस्था यांच्यावरून त्यांचा जो आक्रस्ताळेपणा सध्या चालू आहे, त्यावरून वाटते. सरकारने केलेल्या कोणत्याही कृतीकडे त्या वाकड्या नजरेनेच पाहतात. रविवारपासून त्यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह जे बेमुदत धरणे धरण्याचे ‘नाटक’ चालू केले, तो प्रकार यामध्येच मोडणारा मानावा लागेल.

 

पश्चिम बंगालमध्ये झालेला चीट फंड घोटाळा सर्वविदित आहेच. या घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे हात बरबटलेले आहेत. या सर्व प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. पण, ममता बॅनर्जी यांनी सीबीआयशी उभा दावा मांडला असल्याने त्या संस्थेची कोणतीही कृती म्हणजे आपल्या विरूद्धचे कटकारस्थान आहे, असे त्यांना वाटते. केंद्र सरकारविरुद्ध विविध प्रकारे आणि विविध मार्गांनी अपप्रचार करूनही त्याद्वारे आवश्यक तो परिणाम साधला जात नसल्याचे लक्षात घेऊन ममतादीदींनी हा मार्ग चोखाळल्याचे ठरविलेले दिसते. केंद्र सरकार आपल्याविरुद्ध कारस्थान करीत असल्याचा कांगावा करायचा आणि असे करून त्या सरकारची जेवढी बदनामी करता येईल तेवढी करायची, असा त्यांचा उद्योग. अन्य विरोधी पक्ष तर काही निमित्तच शोधत असतात. पण, मोदी सरकारविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी त्यांच्या हाती काहीच सापडत नाही. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून आपण देशात वादळ निर्माण करू, अशी जी हवा काँग्रेसने निर्माण केली होती; ती विरून गेल्याचे दिसत असताना आता ममतादीदींनी सीबीआयने जी कृती करण्याचे ठरविले होते, त्यात विघ्न आणण्याचे जे पाऊल उचलले, त्यामुळे हर्षभरित झालेल्या समस्त विरोधकांनी ममतादीदींना पाठिंबा देऊ केला आहे.

 

ममता बॅनर्जी यांनी जे धरणे सुरू केले त्यामागची पार्श्वभूमी पाहिली की, हा सर्व प्रकार आपला राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी हाती घेतल्याचे लक्षात येते. कोलकाता शहराचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चीट फंड घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी सीबीआय पथक त्यांच्या निवासस्थानी गेले असता, असे करण्यापासून सीबीआयला रोखण्यासाठी ममता बनर्जी मैदानात उतरल्या. राजीवकुमार यांच्यामागे उभे राहण्याचे त्यांनी ठरविले. त्यातून सीबीआयचे तपास अधिकारी आणि राज्य पोलीस यांच्यातील संघर्षाचे दर्शन केवळ बंगालमधीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील जनतेला झाले. सीबीआयच्या अधिकार्‍यांना तेथून पळवून लावण्यात आले.

 
 

सीबीआय अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, ते राजीवकुमार यांची चीट फंड घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी गेले होते. राजीवकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी केली जात होती. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही धागेदोरे हाती लागत आहेत का, याचा शोध घेण्याचा सीबीआयचा त्यामागील हेतू होता. असे असताना ममता बॅनर्जी यांनी तशी चौकशी करण्यास हरकत घेण्याची काही गरज नव्हती. राजीवकुमार यांच्यामागे आपली, आपल्या पक्षाची ताकद उभी करून आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून त्यातून त्यांना काय साधायचे आहे? देश, देशातील जनता आणि घटना यांना वाचविण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे ममता बॅनर्जी यांनी यावेळी घोषित केले असले तरी अशी कृती करून त्यांनी पोलीस यंत्रणेचे स्वातंत्र्यच धोक्यात आणले आहे. तसेच एकप्रकारे संघराज्यीय चौकटीलाच आव्हान दिले आहे. केंद्रातील सरकारने कोणतीही कृती केली की, घटना धोक्यात आल्याची आवई उठवायची आणि काही ‘स्टंट’ करायचा, असे ममता बॅनर्जी यांचे राजकारण. पोलीस आयुक्त राजीवकुमार जगातील एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी असून ते प्रामाणिकपणे दिवस-रात्र काम करीत असतात, असे शिफारसपत्रही ममता बॅनर्जी यांनी यानिमित्ताने त्यांना देऊन टाकले!

 

ममता बॅनर्जी यांनी ज्या मेट्रो चॅनल येथे घटना वाचविण्यासाठी आपले बेमुदत धरणे आंदोलन चालू केले, ते ठिकाण ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने तसे महत्त्वाचे आहे. याच ठिकाणी ममता बॅनर्जी यांनी २००६ मध्ये सिंगूर जमीन संपादन प्रकरणी २५ दिवसांचे उपोषण केले होते. त्या आंदोलनापासून त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला होता. आता त्याच स्थानावरून नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीका करून केंद्राची ही कृती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हा सर्व ‘कट’ रचल्याचा आरोप त्यांनी केला.

 

आपण गेल्या १९ जानेवारी रोजी जी महासभा आयोजित केली होती, त्याचा धसका घेतल्याने सीबीआयकडून अशी कृती करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. आपल्याविरुद्ध काही ठोस कृती करण्यात यावी, असे आदेश सीबीआय अधिकार्‍यांना देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आपल्याकडे असल्याचे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. ममता बॅनर्जी यांनी जे पाऊल उचलले, त्याचे देशाच्या ऐक्यावर, देशाच्या संघराज्यीय चौकटीवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, याचा विचारच त्यांनी केला आहे, असे दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळत असलेला चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन त्याचा तर धसका त्यांनी घेतलेला नाही ना? चीट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे नेते अडकल्याने चिंताक्रांत झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आपली पापे झाकण्यासाठी केंद्र सरकारच्या बदनामीची मोहीम यानिमित्ताने हाती घेतली असल्याचे म्हणायला खूप वाव आहे.

 

 
 

ममता बॅनर्जी यांनी जे आंदोलन सुरू केले त्यास लगेचच राहुल गांधी, एम. के. स्टालिन, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, चंद्राबाबू नायडू, एच. डी. देवेगौडा, शरद पवार, तेजस्वी यादव, यशवंत सिन्हा, फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांनी पाठिंबा देऊ केला. केंद्र सरकारविरुद्ध आपण जो लढा पुकारला आहे, त्यामध्ये आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू , असे आश्वासन या नेत्यांनी त्यांना दिले आहे. या सर्व नावांवरून नुसती नजर टाकली तरी, ही सर्व मंडळी ममता बॅनर्जी यांच्यामागे का उभी आहेत याची कल्पना यावी!

 

लोकसभा निवडणुकांना फारसा अवधी राहिला नाही. केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध कितीही अप्रचार केला तरी, त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. विरोधकांचे ऐक्य साधण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. जनताही विरोधी पक्षांच्या मागे उभी राहताना दिसत नाही. विरोधी पक्षातील अनेक नेते चौकशीच्या ससेमिर्‍यात अडकले आहेत. केंद्र सरकारवर विरोधकांकडून जी टीका केली जात आहे, त्यावर विश्वास ठेवायला जनता तयार नाही. विरोधकांची सर्व तकलादू अस्त्रे बोथट झाली आहेत. आता केंद्र सरकारवर, भाजपवर नव्याने सोडलेले अस्त्र काय परिणाम करते की, फुसका बार ठरते ते नजीकच्या काळातच दिसून येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@