देशाच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी मोदींना परत निवडून देणे आवश्यक : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |

 

 
 
 

भाजयुमोच्या ‘युवा महासंगम’मध्ये ‘सीएम चषक’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 

मुंबई : येणारी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नव्हे, तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल, तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे,” असे आवाहन आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केले. चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदानात पार पडलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित ‘युवा महासंगम’ या राज्यस्तरीय मेळाव्यात ‘सीएम चषक’ स्पर्धेचेपारितोषिक वितरण करताना ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, आ. संतोष दानवे, राज के. पुरोहित, अमोल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ ‘सीएम चषक’ स्पर्धा उत्तम पार पडली तरी, आता कुठे ही सुरुवात आहे.” भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘’बाज की उडान अभि बाकी है। रणांगणात गेल्यावर मोगलांचा खात्मा करणारे मावळे मला समोर दिसत आहेत. जंगलातील कितीही जनावरे एकत्र आली तरी, ती सिंहाला हरवू शकत नाहीत,” असे सांगून ते म्हणाले की, “मोदी हे आज देशाचे सिंह आहेत. बाकी सर्व नेते केवळ आपापल्या भागाचे नेते आहेत. पण मोदी देशात कुठेही गेले तरी लाखभर लोक सहज त्यांना ऐकण्यासाठी जमतात,” असे त्यांनी नमूद केले.

 

आजवर अनेकदा देशात ‘गरिबी हटाव’ची घोषणा झाली पण गरिबी कधी हटली नाही,” असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, “आज मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे गरिबांना खरा फायदा मिळतो आहे. गरिबांना गॅस, वीज मिळत आहे. जनधन खात्यातून थेट सबसिडी खात्यात मिळते आहे. आज खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. ११ कोटींपेक्षा जास्त युवकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे. कालच्या बजेटमध्ये गरीब शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत मिळण्याची घोषणा करण्यात आली. मजुरांकरिता पेन्शन योजना सुरू केली आहे. आम्हीही ६९ लाख शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात दिली आहे,” असेही ते म्हणाले. “देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व भाजयुमो कार्यकर्त्यांनी कसून काम करावे,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

 

हर युवक कमल खिलायेगा !

 

यावेळी बोलताना भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन यांनीही ‘हर बुथ कमल खिलयेगा, हर युवक कमल खिलयेगा’ अशी घोषणा दिली. ‘विकासाची लक्ष्मी ही कमळावरूनच येते,’ या प्रमोद महाजन यांच्या वाक्याची त्यांनी आठवण करून दिली. “भारताला विश्वगुरुपदाकडे केवळ नरेंद्र मोदीच वेगाने घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, म्हणून सर्वांनी जोरदार प्रयत्न करावेत,” असे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना भाजयुमो प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर हे म्हणाले, “बाकी देशात सुराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी, देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी भाजयुमो कसून काम करेल. गेल्या ६० वर्षात लटकून पडलेले प्रश्न या सरकारने मार्गी लावले असून मुख्यमंत्र्यांचे कार्य ईश्वरी असल्याची भावना जनतेत असल्याचे ‘सीएम चषक’ स्पर्धेच्यावेळी लक्षात आले,” असेही ते म्हणाले. मोहित भारतीय यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे युवाशक्तीचे प्रतीक असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. विक्रांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेसाठीआणि ‘युवा महासंगम’साठी आ. मंगलप्रभात लोढा यांनी विशेष मेहनत घेतली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@