उंदीर-राजा आणि बालकथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 
राहुल गांधींना घाबरून मोदी सरकारने असा अर्थसंकल्प सादर केला’ : पृथ्वीबाबा उर्फ पृथ्वीराज चव्हाण साहेब (संदर्भ १- महाराष्ट्राचे कोणे एकेकाळचे मुख्यमंत्री, संदर्भ २- शरद पवार काकांनी ज्यांच्या हाताच्या लकव्यावर भाष्य केले होते ते, इतके संदर्भ पृथ्वीराज चव्हाणांच्या ओळखीसाठी पुरेच आहेत म्हणा.) ‘असा’ म्हणजे अतिशय चांगला, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प भाजप सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना घाबरुन तयार केला, असा उल्लेख पृथ्वीराजबाबांच्या विधानात होता. चव्हाणांच्या या विधानाची तर्कसंगती तपासली, तर कशाला कशाचा पत्ता आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. पण पृथ्वीराज असे म्हणाले. कारण, श्रद्धाशील लोकांचे देवाबाबतचे जसे म्हणणे असते की ‘उसके मर्जी बगैर पत्ता नही हिलता’; त्याचप्रमाणे काँग्रेसवाल्यांची मारूनमुटकून तयार केलेली संकल्पना आहे की, हायकमांडच्या मर्जीशिवाय काही होऊच शकत नाही. (पण चांगलेबिंगले झाले तरच हायकमांडचा संबंध असतो बरं का) त्यामुळे सत्ताधारी भाजप पक्षाने जरी अर्थसंकल्प तयार केला असला तरी, त्यामध्ये भाजप पक्षाचे योगदान नसून सगळे श्रेय राहुल गांधी यांचेच आहे, असे बिनदिक्कत पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. यावरून काँग्रेसची संस्कृती काय आहे, हे कळू शकते. आता राजा आणि खुषमस्कऱ्यांचे युग नाही. मात्र, तरीही काँग्रेसमध्ये ही परंपरा चालूच आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पृथ्वीराज यांचे विधान. आपण बालपणी गोष्टी ऐकायचो. त्यातली एक गोष्ट - निर्बुद्ध राजाच्या नाकर्तेपणामुळे, त्याची राजसत्ता निसटते. मात्र, तरीही हे कोण सांगेल, या भीतीमुळे राजाच्या हाताखालचे हुजरे त्याला सदासर्वदा हेच भासवत असायचे की ‘वा... वा... राजा तूच ग्रेट!’ तशीच दुसरी गोष्ट तर फारच भारी आहे. एक उंदीर राजाची टोपी पळवतो. ती परत घ्यावी. तर उंदीर म्हणतो “राजा भिकारी.” बरं उंदराला परत द्यावी, तर उंदीर म्हणतो, “राजा घाबरला.” पृथ्वीराज चव्हाणांनी या बालकथा ऐकल्या आहेत का? असो. राजकुमारांना काही नतद्रष्ट लोक चिडवतात की, ‘त्यांनी छोटा भीम, पोगो पाहावा.’ पण, त्यापेक्षा राजकुमार आणि त्यांच्या सेवेकऱ्यांनी राजा आणि उंदराची गोष्ट ऐकली तर फार बरे होईल.
 

तेलतुंबडेंचा योगायोग

 

डॉ. आनंद तेलतुंबडे हे भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर पुढे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांचे नातेवाईक. आनंद तेलतुंबडेंच्या मते गांधीवाद आणि आंबेडकरवाद काही कामाचा नाही, तर मार्क्सवाद आता उपयोगी आहे. काय म्हणावे याला? दलित स्कॉलर मिरवायचे आणि ज्या बाबासाहेबांनी कोटी कुळे उद्धरली, त्या बाबासाहेबांचा विचार मात्र नाकारायचा. आनंद तेलतुंबडे बाबासाहेबांना विसरले आहेत. त्यांनी बेधडकपणे तोंड वर करून सांगितले होते की, “बाबासाहेब काही विचारवंत नव्हते, खरे विचारवंत मार्क्सच.” असो. आनंद तेलतुंबडे यांच्या आयुष्यात विलक्षण योगायोग आहेत हे मात्र नक्की. त्यांचे माओवाद्यांशी काही संबंध नाहीत. मात्र, अनुराधा गांधी या माओवाद्यांशी संबंधित असलेल्या महिलेच्या संस्थेसंदर्भात त्यांचे नाते जगजाहीर आहे. कोरेगाव-भीमा घटनेशी त्यांचा काही संबंध नाही, असे ते म्हणतात. मात्र, त्यांच्यावरील आरोप मागे घ्यावेत, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणारी प्रमुख सहभागी संस्था आहे - आंबेडकर इंटरनॅशनल मिशन - एआयएम. कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक व्हावी, यासाठी विदेशामध्ये आंदोलन करण्यात हीच संस्था पुढे होती. भारतामध्ये अनुसूचित जाती-जमीतींवर अत्याचार होतो, हे खोटेनाटे सांगण्याचा कांगावाच होता तो. आश्चर्य आहे, आनंद यांचा भीमा-कोरेगावशी काही संबंध नाही. मात्र, भीमा-कोरेगावसंबंधी देशाची प्रतिमा विदेशामध्ये मलिन करणाऱ्या या संस्थांना आनंद यांच्या सुटकेबद्दल भारी आस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काम करणाऱ्या काही संस्था दिसतात. या पार्श्वभूमीवर तेलतुंबडेवरील आरोप मागे घ्यावेत, यासाठी स्वारस्य दाखवलेल्या संस्थांना आनंद तेलतुंबडेमध्ये स्वारस्य का आहे? जर वंचितांच्या हक्कांसाठी या संस्था काम करतात; तर त्यांच्या मते, आनंद तेलतुंबडेची वंचितता काय आहे, हेसुद्धा तपासायला हवे. भारतातल्या जातीप्रश्नाबरोबरच या संस्थांची जगभरातला दहशतवाद, वंशभेद, वर्णभेद यावर काय भूमिका आहे, हेही पाहणे गरजेचे आहे. कदाचित यातूनच आनंद तेलतुंबडे आणि त्यांच्यासारख्या इतर कित्येक विचारवंतांच्या आयुष्याचे योगायोग कळू शकतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@