बुडत्याला काडीचा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |


 


मागच्या वर्षी पाकिस्तानचा सध्याचा जिगरी दोस्त असलेल्या चीनचा दौरा इमरान यांनी केला. त्यावेळी चीनने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सची म्हणजे १४ हजार, २०० कोटी रुपयांची मदत केली होती. गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला एवढी जास्त आर्थिक मदत करणारा चीन हा एकमेव देश ठरला आहे.


पाकिस्तान सध्या कर्जात पूर्ण बुडालेला आहे. म्हणजे, गरज न ओळखता फक्त कर्जरूपात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पैशांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कदाचित त्यांना जाणीव झाली की, पाकिस्तानात विश्व बँकेचा किमान मुद्रा निधीही उपलब्ध नाही. त्यामुळे इमरान यांनी पदभार स्वीकारल्या स्वीकारल्या चीन, सौदी अरेबिया आणि युएई या काही 'मित्रांच्या' गाठीभेटी घेतल्या. या सगळ्यामागचा उद्देश हा केवळ पैशांची जमवाजमव करणे इतकाच असला तरी या तिन्ही मित्रांनी मदतीचा हात पुढे केला. खाडी देशांकडून पाकिस्तानला २८ हजार, ४०० कोटी रुपयांची मदत आतापर्यंत मिळालेली आहे, जे तीन वर्षांनी परत करणे बंधनकारक आहे. जर पाकिस्तान तसे करण्यास असफल ठरला, तर त्यांना खाडी देशांचाही हात सोडावा लागणार आहे. पाकिस्तानची सध्याचा परकीय चलनसाठा केवळ ८.१२ अब्ज डॉलर्स आहे. ही रक्कम पाकिस्तानला केवळ सात आठवड्यांसाठी पुरणारी आहे, त्यामुळे विश्व बँक आणि आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला यापुढे कर्ज देण्यास मनाई केली. त्यामुळे इमरान यांना लाचार होऊन देशोदेशी फिरावे लागणार आहे. कारण, पाकिस्तानी रुपयाची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारत पडतच चालली आहे. त्यामुळे सध्या ते काडीपेक्षाही मजबूत आधाराच्या शोधात आहेत. दरम्यान, पाकिस्तानात निवडणुकीचे वारे वाहत असताना, इमरान यांनी देश चालवण्यासाठी 'कर्ज कोण घेतं?' अशा शब्दात आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यानंतर अगदी गाळात रुतलेल्या आपल्या देशाची अवस्था पाहता, त्यांना आपले शब्द मागे घेत, 'कर्ज देता का कर्ज' करत इतर देशांचे दौरे करावे लागलेच. या सगळ्या परिस्थितीला इमरान यांच्या पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना कारणीभूत ठरवले आहे. कारण, नवाज यांनी आपल्या कारकिर्दीत जागतिक बँकेकडून मोठ्या प्रमाणात उचल घेतली.

 

मागच्या वर्षी पाकिस्तानचा सध्याचा जिगरी दोस्त असलेल्या चीनचा दौरा इमरान यांनी केला. त्यावेळी चीनने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सची म्हणजे १४ हजार, २०० कोटी रुपयांची मदत केली होती. गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला एवढी जास्त आर्थिक मदत करणारा चीन हा एकमेव देश ठरला आहे. याला कारण म्हणजे भारतावर हल्ले चढवण्यासाठी चीन पाकिस्तानला आपला मोहरा म्हणून वापरू शकतो. मात्र, चीनच्या या दोन अब्ज डॉलर्सच्या मदतीनेही पाकिस्तानला विशेष काही फायदा झाला नाही. कारण, पाकिस्तानला विश्व बँकेकडून घेतलेले कर्ज आणि किमान मुद्रानिधीकरिता २५ अब्ज डॉलर्सची गरज आहे. त्यातील १७ अब्ज डॉलर्सच पाकिस्तान आतापर्यंत जमा करू शकले. त्यामुळे चीनने आता पुन्हा पाकिस्तानला अडीच अब्ज डॉलर्स म्हणजे १७ हजार, ८३५ कोटी रुपये एवढी मदत करण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे आतापर्यंत पाकिस्तानला चीनकडून तब्बल ३१ हजार, ९५० कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले आहे. याचा अर्थ या मदतीनंतर पाकिस्तानची अर्ध्याहून जास्त नगद ही चीनने दिलेली असेल. म्हणजेच पाकिस्तान हा जवळजवळ चीनच्या छायेतच असेल. चीनने पाकिस्तानला कोणत्या उद्देशाने मदत केली, हे साऱ्या जगाला ठाऊक असले तरी, हे दोन जिगरी यार भारतासाठी त्रासदायक ठरत आहेत. याआधीही चीन आणि पाकिस्तानने एकत्र येऊन भारताला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, ज्याप्रमाणे चीनने भारताला आण्विक साठा गटाचे सदस्यत्व नाकारले. गेली तीन-चार वर्षे हा वाद असाच सुरू आहे. कारण, चीनला भारताआधी पाकिस्तानला या गटात घ्यायचे आहे. पण पाकिस्तान त्या गटात सामिल होण्यासाठी अर्जही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे सर्वच देशांनी पाकिस्तानला मदत करण्याचे टाळले असून, दुसरीकडे अमेरिकेनेही पाकिस्तानला मदत करणार नसल्याचे सांगितले आहे. अशा आर्थिक अरिष्टांच्या छायेत अडकलेले असताना, पाकिस्तानला फक्त चीनच आधार देऊ शकतो, अशी भाबडी अपेक्षा पाकिस्तानचीही होती. असो. तरी पाकिस्तानच्या अडचणी संपल्या आहेत, अशातला भाग नाही. त्यामुळे या काडीच्या आधारावर पाकिस्तान किती दिवस तग धरून राहतो, हे येणाऱ्या काळात कळेलच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@