सीमेवरील संघर्षामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019
Total Views |


 

 पावसाळी अधिवेशन १७ जूनला मुंबईत

 

मुंबई : पाकिस्तान सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षेत गुंतलेले पाच ते सहा हजारांचे पोलीस दल मुंबईच्या सुरक्षेसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार दोन दिवसआधीच अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आल्याची घोषणा आज गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. पुढील पावसाळी अधिवेशन १७ जूनला मुंबईत घेतले जाणार आहे.

 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन संस्थगित करून सुरक्षेसाठी असलेले पोलीस दल शहराच्या अंतर्गत सुरक्षेसाठी उलपब्ध करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच येत्या ४ महिन्यांसाठी मांडण्यात आलेल्या लेखानुदानाला एकमताने मंजुरी देण्यात आली. लेखानुदान मंजूर झाल्यानंतर लगेचच सभागृहाची बैठक तीनवेळा म्हणजे सुमारे दीड तासांसाठी तहकूब करण्यात आली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री म्हणाले, देशातील परिस्थितीमुळे तणावाचे वातावरण आहे. देशांतर्गत सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. सीमेची काळजी घेण्यासाठी जवान समर्थ आहेत. मात्र मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आता येथे अधिवेशन सुरू असल्याने सुमारे पाच हजार पोलीस इथल्या बंदोबस्तात गुंतले आहेत. त्यांना मोकळं करून मुंबई आणि राज्याची सुरक्षा करणं गरजेचं असल्याचे सांगतानाच अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संस्थगित करण्यात येत असलं तरी यामुळे नागरिकांनी अजिबात भयभीत होऊ नये असे आवाहन केले. यावेळी विरोधी पक्षनेते तसेच सर्वपक्षीय गटनेत्यांचे त्यांनी आभार मानले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी अधिवेशन गुंडाळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे गटनेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही संपूर्ण देश लष्कराच्या पाठीशी असल्याचे सांगत या प्रस्तावाला पाठिंबा दिला. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

  

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@