संस्कृतीचा वारसा हस्तलिखिते ठेविला…

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019   
Total Views |
 
 

 
 

आजही अनेक अभ्यासक ‘संस्कृत’ या तथाकथित ‘आऊटडेटेड’ वाटणार्‍या भाषेचा सखोल अभ्यास, संशोधन करतात. अशाच आपला सांस्कृतिक वारसा शोधणार्‍या व जपणार्‍या अनिता जोशींविषयी...

 

भारताला एक प्राचीन परंपरा आहे,’ ‘भारताला सांस्कृतिक अधिष्ठान आहे’ ही वाक्यं केवळ पुस्तकातच राहतील की काय, अशी परिस्थिती निर्माण होण्याची साशंकता हल्ली प्रकर्षाने व्यक्त होताना दिसते. त्याचे कारण म्हणजे, एकीकडे भारतीय ज्ञानाचा आपल्यापेक्षा परकीयांकडूनच होणारा अभ्यास आणि आपल्याच सांस्कृतिक इतिहासाकडे होणारं साफ दुर्लक्ष. परंतु, काही ठिकाणी या प्राचीन इतिहासाच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. या सांस्कृतिक इतिहासाचे वैभव जपण्याचे गेल्या १३ वर्षांपासून जीव ओतून काम करणार्‍या नाशिकच्या अनिता जोशी...

 

संस्कृतची कोणतीही पार्श्वभूमी नसताना भांडारकर संशोधन संस्था, पुणे यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या एका कार्यशाळेमुळे अनिता यांना संस्कृतमधील अनेक विषयांमध्ये आवड निर्माण झाली. या आवडीमुळेच त्यांना महाविद्यालयीन काळात लिपितज्ज्ञ व संस्कृत अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट यांच्याकडून हस्तलिखितांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. २००५ पासून आतापर्यंत त्यांनी पुरातन काळातील तब्बल २६ हजार हस्तलिखितांची स्वत: शोधून नोंदणी केली आहे. नाशिकच्या तीर्थक्षेत्री अजूनही जुने वाडे आपल्या भव्यतेचा रुबाब मिरवत मानाने उभे दिसतात. अशा या नाशिकनगरीत पेशवाईपूर्व काळापासूनची असंख्य हस्तलिखिते सापडतात. इथे अनेकांना स्वत: हस्तलिखिते लिहिण्याची तसेच गोळा करून ठेवण्याची आवड होती. परंतु, आजच्या काळातील गरजा बदलल्यामुळे या वारशाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत अनिता जोशी व्यक्त करतात.

 

अनिता यांचा हस्तलिखितांचा अभ्यास हा गर्गे घराण्यातील हस्तलिखितांपासून सुरु झाला. अनिता यांनी भांडारकर संशोधन संस्थेत संशोधन करताना, स्वत: ‘राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’ या उपक्रमाद्वारे नाशिक, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यात हस्तलिखिते शोधण्याचे काम सुरू केले. यामध्ये हस्तलिखिते असणार्‍या घरातील लोकांचा विश्वास संपादित करणे हे कठीण काम होते. कारण, कोणीही सहजासहजी आपल्या घरातील हस्तलिखितांचा संग्रह दाखवत नसे. परंतु, अनिता यांनी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरातील हस्तलिखितांचा अभ्यास व नोंदणी करणे सुरू केले. काही घरांमध्ये धुळीत पडलेली हस्तलिखिते स्वच्छ करण्यापासून त्यांना काम करावं लागलं, पण हे शक्य झालं ते केवळ विषयाची आवड आणि इच्छाशक्तीमुळे.

 

अनिता यांनी लखनौ व भुवनेश्वर येथे हस्तलिखितांचा शास्त्रोक्त अभ्यास केला. पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘भारतीय विद्या’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.तसेच त्यांनी एकेका घरामध्ये मिळालेल्या १० पोथ्यांपासून ते १० हजार पोथ्यांचे संरक्षण, जतन आणि नोंदणीकरण केलेले आहे. त्यांनी केलेले महत्त्वाचे कार्य आहे ते ‘वारे हस्तलिखित संग्रह.’ हा संग्रह मिळवण्यासाठी त्यांना तब्बल तीन वर्षे लागली. वारे वाड्यातील एका खोलीत अस्ताव्यस्त असणारा हा संग्रह आता नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात सुस्थितीत अनिता यांनी उपलब्ध करून दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील संस्कृतप्रेमी किरण जोशी यांच्याकडील हस्तलिखितांवर काम करताना अनिता यांना सौराष्ट्रामध्ये लिहिलेले भगवद्गीतेचे हस्तलिखित मिळाले. त्यावर योग्य ते संस्कार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी २०१९ मध्ये सोलापूर दौर्‍यावर आले असताना त्यांना ही प्रत भेट म्हणून देण्यात आली. तेव्हा मोदींनी या कार्याचे कौतुक केले होते.

 

अनिता जोशी यांनी ‘नाशिक इतिहास संग्रहालय’ निर्मितीच्या वेळी नाशिकच्या इतिहासावर काम केले. राजकीय कारणांमुळे हे कार्य पूर्ण होऊ शकले नाही. नाशिक येथील वस्तुसंग्रहालय निर्मितीवेळी प्राचीन नाणी, मुद्रा आणि वस्तूंचा अभ्यास अनिता यांनी केला व या संग्रहालय निर्मितीत मोलाचे योगदान दिले. जून २०१५ ला नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात त्यांनी आकाशवाणीसाठी ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून काम केले. मराठी विश्वकोशात ’अभिजात भाषा आणि साहित्य’ यासाठी त्या ‘नोंद लेखक’ म्हणून कार्यरत आहेत. ’गोदावरीच्या अष्टांगांचा सांस्कृतिक इतिहासया संशोधन प्रकल्पाकरिता नाशिक व त्र्यंबकेश्वरसाठी त्यांचे लिखाण सुरू आहे. हस्तलिखितांमधील ’लघुचित्रशैली’ वर त्याचप्रमाणे भित्तीचित्रांवरही त्यांनी संशोधन केले. 'INTACH' (Indian National Trust for Art and Cultural Heritage) या संस्थेसोबत नाशिक जिल्ह्यातील वारसास्थळांच्या नोंदणीकार्यात त्यांचा सहभाग आहे. संस्कृती मंत्रालयाच्या ’राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’ मध्ये त्या २००५ पासून कार्यरत आहेत. अनेक संस्थांना त्या हस्तलिखिते व पुरातन वस्तूंचे संरक्षण, नोंदणी व अभ्यासकार्यात मदत करतात तसेच, अनेक संशोधन कामात त्यांनी अभ्यासक म्हणून योगदान दिले व अजूनही देत आहेत. वर्षानुवर्षे अप्रकाशित असणारे साहित्य अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचे तसेच मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करतात.

 

त्यांचे विविध विषयांवर संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. “कोणाकडेही हस्तलिखितांचा संग्रह असल्यास संस्कृती मंत्रालयाच्या 'नमामि’ कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपला अनमोल ठेवा जपावा,” असेही त्या आवर्जून सांगतात. अशाप्रकारे लुप्त होणार्‍या सांस्कृतिक वारशाचे जतन अनिता जोशी अविरतपणे करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@