सीमेवरील संघर्षामुळे विधिमंडळाचे अधिवेशन अधिवेशन आटोपते घेणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |
 


मुंबई : भारत-पाकिस्तान सीमेवरील संघर्षामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारीच संपवण्याचा विचार सुरु आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मुंबई शहराला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून या स्थितीत अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अडकून पडले आहेत. त्यामुळे उद्याच लेखानुदान मंजूर करून अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता आहे. उद्या गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारपर्यंतचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना मंगळवारी भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला. या हल्ल्यामुळे कांगावाखोर पाकिस्तानने आज भारतीय हद्दीत घुसखोरी केली व भारताचे एक विमान पडल्याने सीमेवरील संघर्ष चिघळला आहे. यामुळे देशातील प्रमुख शहरात व विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून लष्कर व तटरक्षक दलाबरोबरच पोलिसांवरही सर्व प्रमुख ठिकाणांच्या बंदोबस्ताची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी आज विधानभवनात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

 

अधिवेशनामुळे विधानभवन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. शिवाय अधिवेशन काळात येणाऱ्या मोर्चामुळे आझाद मैदान परिसरातही मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतो. पाच ते सहा हजार पोलीस यात अडकून पडतात. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी सद्य परिस्थितीबाबत माहिती दिल्यानंतर विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्याबाबत चर्चा झाली. गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून या बैठकीत अधिवेशन गुंडाळण्याबाबत निर्णय होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याला मंजुरी देणे आवश्यक आहे. सध्याच्या कार्यक्रमानुसार याबाबतचे विनियोजन विधेयक शुक्रवारी मंजुरीसाठी येणार होते. त्याऐवजी उद्याच त्याला मंजुरी देऊन अधिवेशन संस्थगित करण्याचा विचार सुरु आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@