इमरान खानचे भाकड कथापुराण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |

 


 
 
 
भारताच्या संभाव्य कारवाईने गळपटलेल्या इमरान खान यांच्यासमोर गुडघे टेकण्याशिवाय अन्य कुठला पर्याय होता? म्हणूनच खान यांनी पुलवामातील घटनेची चौकशी व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्याची तयारी दाखवली. मोठ्या युद्धात गणितं चुकतात, असे म्हणत इमरान खान यांनी महायुद्धांचे भाकड कथापुराण ऐकवले. इथे युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नसते हे खरेच, पण ते लादले कोणी याचाही विचार केला पाहिजे.
 

कत्तलखान्यात घाऊक प्रमाणात मारल्या जाणाऱ्या कोंबड्या-बकऱ्यांप्रमाणे भारताने मंगळवारी नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्यात पाकपोषित दहशतवाद्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या. भारतीय वायुसेनेने तब्बल ३५० हून अधिक दहशतवाद्यांना थेट आत घुसून टिपल्याने देशात बहुतांश ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात सैनिकांवर अभिनंदनाचा, कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. भारतात एकीकडे दिवस उजाडल्यापासून हा जल्लोषाचा माहोल असताना पाकिस्तानवर मात्र मातमी छाया पसरल्याचे पाहायला मिळाले. पुलवामातील हल्ल्यानंतर देशात, सीमेवर, पाकव्याप्त काश्मिरात आणि भारतात नेमके काय सुरू आहे, याचीही पुरेशी कल्पना नसलेल्यांना वायुसेनेच्या हल्ल्याने चांगलाच दणका बसला. आपण अण्वस्त्रसंपन्न देश असल्याने कोणतीही आगळीक केली तरी भारत काही प्रत्युत्तर देणार नाही, या भ्रमात वावरणाऱ्यांना या हल्ल्यातून सावरायलाही वेळ मिळाला नाही. परिणामी, दिवसभरातल्या पाकिस्तानी नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, पंतप्रधानांच्या, लष्करी अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून भारताने आपल्या शेजाऱ्याची किती ठासली असेल, याचीही साक्ष पटू लागली. भारताने पाकच्या नापाक भूमीवरील दहशतवाद्यांना आस्मान दाखवल्याने पिसाळलेल्या पाकिस्तानला काय करू, अन् काय नको, असे झाले. मंगळवारच्या भारतीय विमानांच्या धुमशानानंतर सीमेपलीकडून धडा शिकवण्याच्या गर्जनाही मोठ्या जोशात, पण बेहोशीत केल्या जाऊ लागल्या. तद्नंतर बुधवारी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाकिस्तानच्या या शहाणपणाला भारताने चोख उत्तर देत पाकचेच ‘एफ-१६’ लढाऊ विमान पाडले. नंतर दिवसभरात दोन्ही देशांत आणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण झाली अन् याचवेळी भारताच्या संभाव्य आक्रमकतेने टरकलेल्या इमरान खान यांनी सपशेल नांगी टाकत ‘चर्चा करू, युद्ध नको’ची याचना केली.

 

वस्तुतः १४ फेब्रुवारीच्या हल्ल्याच्या सातव्या दिवसापासून ते आजपर्यंत इमरान खान जे काही बरळलेत, त्यातून एकदाही पुलवामात हुतात्मा झालेल्यांप्रति त्यांनी ना संवेदना व्यक्त केल्या, ना निषेधाचे दोन शब्द उच्चारले. उलट पाकिस्तानी लष्कराच्या हातातले बाहुले असल्याप्रमाणेच इमरान खान यांनी पोपटपंची केली. अगदी भारताने मंगळवारी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतरही भारताला योग्यवेळी उत्तर देऊ, असे इमरान खान म्हणत होते. मग अचानक ही शरणागतीची भाषा इमरानच्या तोंडी कुठून अवतरली? ही खरेच चर्चेची मागणी होती की, इमरानकडून केवळ तसे भासवले गेले? हे दोन प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतात. पाकिस्तानच्या ताब्यातील ठिकाणांवर हल्ले केल्याने भारत स्वसंरक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, याची जाणीव इमरान खान यांना झाली आणि स्वतःची औकातही समजली. आतापर्यंत सौदी अरेबिया, अमेरिका वा अलीकडच्या काळात चीनच्या पैशांवर उड्या मारणाऱ्या पाकिस्तानला या देशांनीही शांत बसण्यास सांगितल्याने इमरान खान यांची गाळण उडाली. अशातच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अमेरिका जर पाकिस्तानातल्या बिळात दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनला ठार करू शकते, तर भारत का असे धाडस करू शकत नाही, असे वक्तव्य केले. परिणामी, भारताच्या संभाव्य कारवाईने गळपटलेल्या इमरान खान यांच्यासमोर गुडघे टेकण्याशिवाय अन्य कुठला पर्याय होता? म्हणूनच खान यांनी पुलवामातील घटनेची चौकशी व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्याची तयारी दाखवली. मोठ्या युद्धात गणितं चुकतात, असे म्हणत इमरान खान यांनी पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, अमेरिकेने अफगाणिस्तानात व व्हिएतनाममध्ये छेडलेल्या युद्धांचे भाकड कथापुराण ऐकवले. इथे युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नसते हे खरेच, पण ते लादले कोणी याचाही विचार केला पाहिजे. गेल्या ७१ वर्षांत पाकिस्तानकडूनच सातत्याने भारताविरोधात कुरापती काढल्या गेल्या, हल्ले केले गेले. भारताने दरवेळी फक्त स्वतःच्या एकता, अखंडता व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या अधिकाराचा वापर केला आणि पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले. तरीही आपल्या युद्धखोर शेजाऱ्याला हे कळत नसेल, तर लढण्याला विकल्प असू शकतो का? तर नक्कीच नाही.

 

दुसरीकडे स्वातंत्र्यापासून भारताला पाकिस्तानच्या सापाच्या जातकुळीचा प्रत्यय आला. इतिहास साक्षी आहे की, भारताने ज्या ज्या वेळी पाकिस्तानशी चर्चा केली, त्या त्या वेळी त्या देशाने उलटण्याचेच धोरण अवलंबले. उल्लेखनीय म्हणजे, समोरासमोरच्या युद्धात आपण भारताला मात देऊ शकत नसल्याचे प्रत्यंतर आल्याने पाकिस्तानने नंतर दहशतवादाचा आसरा घेतला. दहशतवादी विषवल्लीला खतपाणी घातले आणि भारताविरोधात वापरले. असा पाकिस्तान आज चर्चेची भाषा करत असेल तर, त्या देशावर भारताने का विश्वास ठेवावा? विश्वासघात करण्याची तर पाकिस्तानची परंपराच आहे, त्यामुळे या नाठाळ शेजाऱ्याला वठणीवर आणण्यासाठी शांती, चर्चा वगैरे गोंडस शब्द गुंडाळून जन्माची अद्दल घडवणेच योग्य राहील आणि हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात होऊ शकते. दुसरीकडे पाकिस्तानला लाभलेले आतापर्यंतचे सगळेच पंतप्रधान स्वतःचाच विचार करणारे होते. देशाचा, समाजाचा विचार करायला कोणाला वेळच नसल्याचे पाहायला मिळाले. केवळ स्वतःचे, पक्षाचे घर भरले, लष्करशहांपुढे माना तुकवल्या की, झाले देशकार्य, असा विचार करणारी मंडळीच तिथे पंतप्रधानपदावर बसली. इथेच नरेंद्र मोदींचे वेगळेपण उठून दिसते. ‘राष्ट्र’ सर्वोपरी मानणाऱ्या मोदींनी स्वतःच्या मतलबाचा विचार कधी केलाच नाही. म्हणूनच आज देश पाकिस्तान असो वा चीन वा अन्य कोणी, सर्वांपुढेच ताठ मानेने आणि कणखर बाण्याने उभा राहिलेला दिसतो. देश सुरक्षित हातात असल्याची ग्वाहीच यातून मिळते. म्हणूनच आज एवढे होऊनही पाकिस्तानला चर्चा करण्याची उपरती झाली. महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर आपल्या कोणत्याही संबोधनात, कार्यक्रमात एका शब्दानेही उल्लेख केला नाही. ना मोदींच्या भाषणातून ते दडपणाखाली, दबावाखाली असल्याचे दिसले. उलट मोदींचा व्यवहार प्रत्येकक्षणी सामान्यच राहिला, कोणाला त्रासही दिला नाही. काश्मिरी नागरिकांवरील हल्ल्यामुळे व्यथित झालेल्या पंतप्रधानांनी आमचे भांडण काश्मिरींशी नव्हे तर काश्मीरशी असल्याचे सांगितले. तर याहून भिन्न अशी पाकिस्तानी नेत्यांची अवस्था होती. भारताच्या हल्ल्याने अंगांगातून धूर निघालेल्या पाकिस्तानी नेते, खासदार, मंत्र्यांपासून ते लष्करी अधिकाऱ्यांनी ‘यंव करू अन् त्यंव करू’ छाप प्रतिक्रिया दिल्या. असे असले तरीही या प्रत्येकाच्या बोलण्यातून धैर्य-शौर्याऐवजी भीती, उडालेली घाबरगुंडीच जाणवली! अशा स्थितीत तो देश भारताला काय उत्तर देणार आणि काय स्वतःची जमीन सांभाळणार? तर नाहीच! उलट आक्रस्ताळेपणा करून स्वतःचीच वाट लावून घेईल, हेच खरे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@