पाकी दहशतवादाची पैदास - जैश-ए-मोहम्मद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |

 


जैश-ए-मोहम्मद आंतरराष्ट्रीय दबावानंतरही पाकिस्तानी सरकार आणि सैन्याकडून प्रदान केलेल्या संपूर्ण समर्थनामुळे आपल्या कारवायांना स्वतंत्र रूपाने संचालित करत आहे. १४ फेब्रुवारीची घटना भारताला दिलेला एक स्पष्ट संकेत आहे की, वर्तमान परिस्थितीमध्ये पाकिस्तानबरोबरील संबंधात कोणत्याही सुधारणा शक्य नाही. आता वेळ आली आहे की, केवळ दहशतवादी संघटनाच नव्हे, तर पाकिस्तान सरकारविरोधातही कठोर पाऊल उचलले पाहिजे.

 

राजकीय भयगंडाच्या परिणामांतून पाकिस्तानचा जन्म झाला. पण, पाकिस्तानने आपली ही पद्धती अजूनही सोडली नसल्याचेच दिसते. म्हणूनच भारताला पाकिस्तानच्या विध्वंसक कारवायांचा दुष्प्रभाव सातत्याने झेलावा लागला. १८७०च्या दशकात पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांचा बोलबाला वाढला व असे गट बळकट झाले. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यानंतर हे कट्टरपंथी गट इस्लामी राजनीतीकडे उन्मुख झाले. अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी नूर मोहम्मद तराकी यांना सत्तेतून हटविण्यात आले, त्यावेळी सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला व यातूनच शीतयुद्धादरम्यान एक मोठा संघर्ष सुरू झाला. अशावेळी अमेरिकेने पाकिस्तानच्या जनरल झिया-उल-हक या नव्या सत्ताधार्‍याला एक विश्वासू साथीदार आणि अनुयायाच्या रूपात पाहिले. इथूनच अमेरिका कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या निर्यातीची मुख्य प्रायोजक झाली अन् याचीच परिणती अमेरिकेने ८/११च्या भीषण दहशतवादी हल्ल्याद्वारे प्रत्यक्ष अनुभवलीदेखील.

 

परंतु, एका शेजारी देशाच्या रूपात भारत नेहमीच पाकिस्तानच्या कुटील कारस्थानांच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळाले. हे झिया-उल-हक यांच्या भारतावर हजारो वार करून रक्त वाहू देण्याच्या धोरणांचे मुख्य कार्यकारी अंग आहे. पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला करून पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला क्रूर चेहरा दाखवून दिला. जरी पाकिस्तान सरकार शांततेचा जप करत असले, तरी पाकिस्तानी लष्कर मात्र ‘आयएसआय’ आणि कट्टरपंथी इस्लामी संघटनांच्या माध्यमातून आपला प्रमुख उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमीच करताना दिसतो.

 

जैश-ए-मोहम्मदची पार्श्वभूमी

 

पुलवामातील घटनेची जबाबदारी घेणार्‍या जैश-ए-मोहम्मदचा शब्दशः अर्थ आहे, मोहम्मदाची सेना, जी पाकिस्तानमधील देवबंदी जिहादी संघटना आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या अन्य प्रमुख संघटनांच्या तुलनेत जैश-ए-मोहम्मद तुलनेने नवीन संघटना आहे. लष्कर-ए-तोयबाप्रमाणेच जैश-ए-मोहम्मदलादेखील पाकस्थित ‘आकां’कडून नियंत्रित केले जाते. ३१ डिसेंबर १८८८ रोजी भारताच्या ‘आयसी-८१४’ विमानाच्या अपहरणानंतर प्रवाशांच्या बदल्यात मौलाना मसूद अझहर भारतीय तुरुंगातून सुटण्यात यशस्वी झाला होता आणि त्यानेच पुढे जाऊन ‘जैश-ए-मोहम्मद’ नामक संघटनेची सुरुवात केली. या संघटनेच्या स्थापनेला पाकिस्तानच्या कट्टरपंथी उलेमांचेही समर्थन प्राप्त झाले. तीन प्रमुख कट्टरपंथी इस्लामी धार्मिक संघटनांचे प्रमुख, मजलिस-ए-तवन-ए-इस्लामीचे प्रमुख मुफ्ती निजामुद्दीन शमजई, दार-उल-इफ्ता-ए-वल इरशादचे प्रमुख मौलाना मुफ्ती रशीद अहमद, दर-उल हक्कानियाच्या शेख-उल-हदीस शेर अली यांनी उघडपणे समर्थन दिले. मसूद अझहरला भारतातून सुटका करवून घेणे शक्य झाल्याने पाकिस्तानमध्ये त्याच्याकडे मोठ्या कौतुकाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले. यामुळेही या संघटनेला कमी काळात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात यश मिळाले. मौलाना मसूद अझहर याआधी १८८४ मध्ये नव्यानेच स्थापन केलेल्या हरकत-उल-अन्सरचा महासचिव होता आणि तो ज्यावेळी आपल्या जम्मू-काश्मीर मोहिमेवर होता, त्याचवेळी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. परकीय दहशतवादी संघटनांच्या अमेरिकन यादीत ठेवले गेल्यामुळे या संघटनेने स्वतःला हरक-उल-मुजाहिद्दीनच्या रूपात नाव बदलायचे ठरवले, तेव्हा मसूद अझहरने आपल्या जुन्या संघटनेत पुन्हा सामील होण्याऐवजी स्वतःसाठी नव्या संघटनेची म्हणजेच जैश-ए-मोहम्मदची निर्मिती केली.

 

‘आयएसआय’ची भूमिका

 

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ ही हरकत-उल-मुजाहिद्दीनशी संबंधित देवबंदी दहशतवाद्यांच्या साह्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापन करण्यातली मुख्य प्रणाली आहे. १८८० च्या अंतापर्यंत पाकिस्तानी सैन्याने काश्मिरातील जिहादला आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक वैध भाग असल्याचे म्हटले होते. अशातच हरकत-उल-मुजाहिद्दीनला १८८०च्या मध्यात ‘आयएसआय’च्या समर्थनाने दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्थापन करण्यात आले. अमेरिकेने १८८८ मध्ये या संघटनेला दहशतवादी गटाच्या रूपात घोषित केले आणि अफगाणिस्तानमध्ये या संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांवर बॉम्बफेक केली. डिसेंबर १८८८ मध्ये हरकत-उल-मुजाहिद्दीनच्याच दहशतवाद्यांनी काठमांडू ते दिल्लीसाठी उड्डाणेच्छुक इंडियन एअरलाइन्सच्या ‘आयसी-८१४’ या विमानाचे अपहरण केले आणि कंदाहारला नेले, जिथे त्यांची मदत अफगाणी, तालिबानी आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांनी केली. भारत सरकारने त्यांच्या मागणीला सहमती दर्शवली आणि मौलाना मसूद अझहरबरोबरच अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगरसारख्या हरकत-उल-मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना सोडून दिले.

 

उद्देश

 

जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानच्या इस्लामी दहशतवादी जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसेत गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य दहशतवादी संघटनांप्रमाणेच ही संघटना जम्मू-काश्मीरमधून भारतीय सुरक्षा बलांच्या माघारीसाठी हिंसेचा प्रयोग करण्याचा दावा करत आली. संघटनेचा दावा आहे की, पाकिस्तानमध्ये तिचे प्रत्येक कार्यालय जिहादी शाळांच्या रूपात काम करते. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या सुटकेनंतर पाकिस्तानच्या विभिन्न शहरांत भाषणे देताना मसूद अझहरने धमकी दिली की, त्याची संघटना भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना संपवेल, ज्यांना तिने ‘अबू जहल’ म्हणजेच ‘अज्ञानाचा पिता’ असे नाव दिले होते. संघटनेचे उद्दिष्ट भारताविरोधातील आपल्या लढाईत केवळ काश्मीरलाच मुक्त करायचेच नव्हते, तर अयोध्या, अमृतसर, दिल्ली आणि बाबरी मशिदीवरही नियंत्रण ठेवण्याचेही स्वप्नरंजन केले गेले.

 

संघटनात्मक संरचना

 

जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि नेता (अमीर) मौलाना मसूद अझहर असून तो आधी हरकत-उल मुजाहिद्दीनशी संबंधित होता. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर आणि मसूद एकाच मदरशात (कराचीमधील जामिया उलूम-उल-इस्लामिया) प्रशिक्षित झाले. मसूदचे तालिबान आणि अल कायदाशी प्रदीर्घ काळ संबंध होते. मसूदने अफगाणिस्तानबरोबरच चेचन्या, मध्य आशिया आणि सोमालियातील दहशतवादी कारवायांतही सक्रिय भाग घेतला. मसूद अझहरचा भाऊ, अब्दुल रऊफ असगर, जैश-ए-मोहम्मदचा गुप्तचर विभाग समन्वयक आणि वरिष्ठ कमांडर आहे. तो ‘आयसी-८१४’ विमान अपहरण केलेल्यांपैकी एक असून २००७ मध्ये मसूद अझहरच्या अनुपस्थितीत जैश-ए-मोहम्मदच्या कार्यवाहक कमांडरच्या रूपातही त्याने काम केले आहे. २००८ पासून तो भारतातील आत्मघाती हल्ल्यांशी संबंध राखून होता अन् यात २०१६च्या पठाणकोट हल्ल्याचाही समावेश आहे. अब्दुल रऊफ असगरला अमेरिकन ट्रेजरी विभागाने ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणूनही घोषित केले आहे. अन्य महत्त्वपूर्ण अधिकार्‍यांमध्ये मौलाना कारी मन्सूर अहमद-प्रचार विभागाचा प्रमुख, मौलाना अब्दुल जब्बार-सैन्यविषयक प्रकरणांचा प्रमुख, मौलाना सज्जाद उस्मान- वित्त विभागाचा प्रभारी, शाहनवाज खान उर्फ सज्जाद जेहादी आणि गाजी बाबा-जम्मू-काश्मीरचा मुख्य कमांडर आणि मौलाना मुफ्ती मोहम्मद असगर-लॉचिंग कमांडरचा प्रमुख, हे लोक या संघटनेचे कर्तेधर्ते आहेतदरम्यान, पाकिस्तानने या संघटनेवर अधिकृत निर्बंधाची घोषणा तर केलीच, पण सरकार आणि लष्कराच्या मदतीने ही संघटना नेहमीच फुलत राहिली. बहावलपूरमध्ये २००८ साली एका साडेसहा एकरपर्यंतच्या भिंतीच्या परिसराच्या उभारणीची माहिती पुढे आली होती. ‘इंडिया टुडे’ने यावर खुलासा करत सदर कॉम्प्लेक्सला जामिया मस्जिद सुभान अल्लाहच्या रूपात प्रचारित केल्याचे आणि ती पाकिस्तानी लष्कराच्या ३१व्या कोअरच्या मुख्यालयापासून केवळ ८ किमी अंतरावर असल्याचे म्हटले होते. ही घटना पाकिस्तानच्या मानसिकतेची स्पष्ट परिचायक आहे.

 

काम करण्याची पद्धती

 

जैश-ए-मोहम्मदच्या कित्येक हल्ल्यांचे फिदायीन (आत्मघाती दहशतवादी) हल्ल्यांच्या रूपात वर्णन करण्यात आले आहे. यात संघटनेतील दहशतवादी, सुरक्षा बलांच्या ठिकाणांना, शिबिरांना आणि ताफ्यासहित एका उच्च सुरक्षेच्या लक्ष्याला भेदतात. जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या कामांना मर्यादित केले आहे. जम्मू-काश्मीरच्या बाहेरील हल्ल्याचे एकमेव नोंदीत उदाहरण म्हणजे १३ डिसेंबर, २००१ रोजी नवी दिल्लीतील संसद भवनावर झालेला हल्ला हे होते.

 

अभद्र युती

 

कराचीतील बिनोरिया मदरसा, अफगाणिस्तानमधील आधीची तालिबानी राजवट आणि तिचा संरक्षक ओसामा बिन लादेन आणि त्याची संघटना अल-कायदाबरोबर जैश-ए-मोहम्मदच्या जवळच्या संबंधांचे कारण ठरला. जेव्हा जैश-ए-मोहम्मदची सुरुवात झाली, तेव्हापासून तालिबान आणि अल-कायदाचे मजबूत संबंध होते आणि ते दोन्हीही अफगाणिस्तानमध्ये आपली प्रशिक्षण शिबिरे सामायिक करत असत. सोबतच गुप्तचर, प्रशिक्षण आणि समन्वयाचे आदान-प्रदानही करत होते. ब्रूस रिडेलसारख्या विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “२००१चा भारतीय संसदेवरील हल्ला मसूद अझहरला सोडण्यात मदत करण्यासाठीचा अल-कायदा प्रयत्न होता.” 

 
जैश-ए-मोहम्मदला सर्वात घातक आणि जम्मू-काश्मीरमधील प्रमुख दहशतवादी संघटनेच्या रूपात पाहिले जाते. २००१ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर हल्ला, २००१ मध्येच भारतीय संसदेवर हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोट हवाईतळावर हल्ला, २०१६ मध्ये मजार-ए-शरीफमध्ये भारतीय मिशनवर हल्ला, २०१६ सालचा उरी हल्ला आणि आता २०१८ मध्ये पुलवामातील हल्ला, अशा कित्येक दहशतवादी हल्ल्यांसाठी ही संघटना जबाबदार होती. संघटनेला कित्येक पाकिस्तान, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राकडून एका दहशतवादी संघटनेच्या रूपात घोषित करण्यात आले.

हे स्पष्ट आहे की, जैश-ए-मोहम्मद आंतरराष्ट्रीय दबावानंतरही पाकिस्तानी सरकार आणि सैन्याकडून प्रदान केलेल्या संपूर्ण समर्थनामुळे आपल्या कारवायांना स्वतंत्र रूपाने संचालित करत आहे. १४ फेब्रुवारीची घटना भारताला दिलेला एक स्पष्ट संकेत आहे की, वर्तमान परिस्थितीमध्ये पाकिस्तानबरोबरील संबंधात कोणत्याही सुधारणा शक्य नाही. आता वेळ आली आहे की, केवळ दहशतवादी संघटनाच नव्हे, तर पाकिस्तान सरकारविरोधातही कठोर पाऊल उचलले पाहिजे, ज्यामुळे ते चांगलाच धडा शिकतील आणि भविष्यात अशा घटनांपासून दूर राहतील.

 
- संतोषकुमार वर्मा  

(अनुवाद : महेश पुराणिक)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@