मराठी पाऊल पडते पुढे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल असताना जळगावसारख्या ठिकाणी वातानुकूलित मराठी शाळा सुरू करणाऱ्या अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या कार्याचा आज मराठी राजभाषा दिनानिमित्ताने घेतलेला हा विशेष आढावा....
 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

 

अशा या मराठी भाषेची महती वर्णावी तेवढी कमीच. आज, २७ फेब्रुवारी. कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस आपण ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करतो. मातृभाषा मराठीचा जाज्वल्य अभिमान आज मराठीजनांच्या मनात असला तरी दुर्देवाने तो प्रत्येकाच्या कृतीत मात्र दिसत नाही. आज आपण आपल्या ओळखीत कोणालाही विचारले की, तुमचे पाल्य कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकते? तर बहुतांशी पालकांचे उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत. कारण, हल्लीच्या पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढत चालला आहे. केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाचे हे अनाठायी आकर्षण वाढलेले दिसते आणि मग मराठी माणूसच मराठी शाळा अखेरच्या घटिका मोजत असल्याची आरोळी ठोकताना दिसतो. या परिस्थितीत मराठी शाळा टिकवणे अवघड आहे आणि मोफत शाळा चालविणे तर त्याहूनही कठीण. पण, आजही कित्येक मुलामुलींना परिस्थितीमुळे शिक्षणाला मुकावे लागते. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी असाच एक पुढाकार घेतलेले समाजसेवक अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर

 

१९८८ साली जळगाव येथे अ‍ॅड. बाविस्कर यांनी प्रबोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांतील समाजोपयोगी कार्ये लोकसहभागातून केली जातात. १९९९ साली प्रबोधन संस्थेने गरीब व होतकरू मुलांसाठी शाळा सुरू केली. पण, सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो जागेचा. पण, जागाही भाड्याने घेऊन शाळा सुरू करण्यात आली. सुरक्षानगर (खोटेनगर) जवळ भाड्याच्या इमारतीमध्ये ‘मातोश्री प्राथमिक विद्यालया’चा शुभारंभ झाला. यामुळे खोटेनगर, निमखेडी परिसरातील गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षणाची सोय झाली. सुरुवातीला बालवाडी, मग पहिलीचे वर्ग सुरू करून दरवर्षी एक वर्ग वाढत जाऊन आज आठवीपर्यंतचे शिक्षण या शाळेत विद्यार्थी घेतात. या शाळेने सुरुवातीची सात वर्षे सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दप्तर, वह्या-पुस्तके दिली. त्यानंतर गरीब व होतकरू अशा जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांना आजही शालोपयोगी साहित्य पुरविले जाते. इतकेच नव्हे, तर या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सुविधाही पुरविण्यात येतेआता ही शाळा स्वत:च्या नवीन इमारतीत ज्ञानदानाचे काम करीत आहे. शाळेमध्ये प्रशस्त वातानुकूलित खोल्या, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हाईट बोर्ड, एल.सी.डी. प्रोजेक्टर्स, अग्निशमन यंत्रे, दोन स्वतंत्र संगणक कक्ष, पिण्यासाठी शुद्ध पाणी, इन्व्हर्टर सुविधा, विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृहे, पाणी उपलब्धतेसाठी कुपनलिका तसेच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी पक्क्या स्वरूपाचे व्यासपीठ, संगीतमय परिपाठासाठी ध्वनियंत्रणेची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांतील शेतकरी, मजूर यांच्या मुलांनाही शिक्षण घेता यावे म्हणून नवीन स्कूल बस सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे.

 

आजच्या काळात राज्यातील मराठी शाळा पटसंख्येच्या अभावी, तसेच सरकारी अनास्थेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या इंग्रजी शाळांमध्ये असलेले भरमसाठ शुल्क भरताना मध्यमवर्गीय पालकांना बरीच कसरत करावी लागते. गरिबांची मुले या शाळांतील भरमसाठ शुल्कामुळे प्रवेश घेऊ शकत नाहीत. अशा या सर्व परिस्थितींचा विचार करून संस्थेने आपली शाळावातानुकूलित मराठी शाळा’ म्हणून नावारूपाला आणलेली आहे. ही शाळा शिक्षणाबरोबरच संस्कार घडविण्याचे कार्य करीत आहे. विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरे करून त्यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना केली जाते. दैनंदिन परिपाठातून संगीतमय प्रार्थना, इंग्रजी, गणित अशा विषयांच्या सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे, दिनांकांनुसार पाढे पाठांतर, जेवणापूर्वी हात धुणे, श्लोक म्हणणे, शालेय वर्गसफाई, आवार सफाई विद्यार्थ्यांच्या मदतीने करून घेतली जाते. दर शनिवारी संस्कारक्षम वाचनाचा उपक्रम, सामूहिक वाचन उपक्रम, सुसज्ज ग्रंथालय असे उपक्रम या शाळेत आहेत. शिवजयंती, शून्य सावली दिवस, औद्योगिक भेटी असे विविध उपक्रम शाळेत राबवण्यासोबतच २० किलोमीटरच्या परिघातील विविध खेड्यापाड्यात जाऊन अधिकाधिक समाजाभिमुख करून राबविले जातात. अशा उपक्रमांबरोबरच विविध सहली, क्षेत्रभेटी, बागकाम, निसर्गभेट, बँकिंग ज्ञान याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण म्हणजेच बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास साधण्यासाठी संस्था व शाळा प्रयत्न करत आहे. कारण, संस्थेचे ब्रीदवाक्यच आहे ‘शिक्षणच नव्हे, संस्कार!’ तेव्हा, आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने, माय मराठीच्या संवर्धनासाठी अशा शाळेसारख्या अनेक मराठी शाळा सुरु होवोत, त्यांना पालकांचा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभो, हीच मनस्वी इच्छा...

 
 - नितीन जगताप
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@