नाणार प्रकल्प रद्द करून कोकणी तरूणांच्या पोटावर लाथ मारू नका : प्रमोद जठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |
 
 

रिफायनरी समर्थक शिष्टमंडळाने मुखमंत्र्यांची घेतली भेट

 

मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा जटील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील किमान दिड लाख स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सरकारने रिफायनरी प्रकल्प रद्द करून कोकणी तरूणांच्या पोटावर लाथ मारू नये, असे आवाहन आज सोमवारी भाजपचे माजी आमदार व प्रकल्प समर्थक प्रमोद जठार यांनी केले.

 

राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या तीन लाख कोटी रूपये गुंतवणुकीच्या रिफायनरी प्रकल्पावरून अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. भाजपने शिवसेनेशी युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट मान्य केल्याचे म्हटले जाते. यापाश्र्वभूमीवर माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द न करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे जठार यांनी सांगितले.

 

रिफायनरी समर्थक शिष्टमंडळाने नाणार प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने नाणार प्रकल्पाबाबत सद्सद्विवेकबुध्दीने विचार करावा, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा कुणाचा विरोध आहे म्हणून रद्द करणार नाही. तसेच प्रकल्प रद्द करण्यासाठी आपल्यावर कुणाचाही दबाव नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला असून नाणार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण विभागाच्या परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे जठार यांनी सांगितले. यावेळी निलेश पाटणकर, पंढरी आंबेरकर, अविनाश महाजन, अनिल करंगुटकर, अबिद दावत, सतीश महाजन, रमेश किरकिरे, रविंद्र अवसरे आदी कार्यकर्ते शिष्टमंडळात उपस्थित होते.

 

जमिन मालकांचा रिफायनरीला विरोध नाही, विरोध कसणाऱ्या कुळांचा

नाणार प्रकल्पाला स्थानिक मुळ जमिन मालकांचा विरोध नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यांनपिढ्या जमिन कसणाऱ्या कुळ शेतकऱ्यांचा विरोध आहे, असे जठार यांनी सांगितले. सरकारला हा प्रकल्प रद्द करायचा असेल तर जनमत घ्या, समृद्धी महामार्गाप्रमाणे पॅकेज जाहिर करा. त्यानंतरही या प्रकल्पाला विरोध झाल्यास तो खुशाल रद्द करा, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@