सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला पंतप्रधान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मोदींच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाय धुण्याच्या कृत्याची चेष्टा करणारे आणि निरनिराळ्या प्रांताची वेशभूषा करण्यावर जोक, मिम्स पसरविणाऱ्या या लोकांची एकच जातकुळी असते. पण, लोकांचा ओढा मात्र अशा लोकांत मिसळणाऱ्या लोकांच्या पंतप्रधानाकडेच असतो, हे टीका करणाऱ्यांनी विसरू नये.
 

हिंदू धर्मीयांच्या पवित्र उत्सवातले सर्वोच्च पर्व म्हणजेच, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा. यंदा गंगाकिनारी प्रयागराज येथे कोट्यवधी श्रद्धाळूंच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगास्नान करत परमेश्वराचे आशीर्वाद घेतले. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने सुमारे ५४ वर्षांनंतर कुंभमेळ्यात स्नान करण्याची ही पहिलीच वेळ. हजारो वर्षांपासून प्रयागराज, हरिद्वार, नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळ्याचा सोहळा साजरा होत आला. स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू धर्मीयांची इथली उपस्थिती नेहमीच वाढती राहिली, पण पंडित नेहरुंनंतर पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने पदावर असताना कुंभमेळ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, परंपरेनुसार गंगेत डुबकी मारली आणि भगवंताचे दर्शन घेतले. तना-मनावर हिंदुत्वाचे संस्कार झालेली आणि ते संस्कार कार्यकर्तृत्वातूनही दाखवून देणारी व्यक्तीच असे करू शकते. पंतप्रधानांचे कुंभमेळ्यात येणे देशभरातल्या प्रत्येकासाठीच कौतुकाचा विषय ठरलेला असतानाच सर्वाधिक चर्चा झाली ती मोदींनी केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाद्यपूजेची. विशेष म्हणजे, ही चर्चा जितकी मोदींच्या बाजूची होती, तितकीच विरोधातलीही होती. मोदींच्या प्रत्येक हालचालीवर टीका करण्यासाठी आसुसलेल्यांच्या दृष्टीने पंतप्रधान पदावरील व्यक्तीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुणे, हे तसे अनपेक्षितच. म्हणूनच कुंभमेळ्यात मोदींची स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्याची ध्वनिचित्रफित प्रसारित होताच अनेकांना पोटशूळ उठला. कित्येकांनी पंतप्रधानांच्या या कृतीला नौटंकी ठरवत टीकेचा सूर आळवला. काही काही लोकांनी तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केलेले हे लांगूलचालन असल्याचेही म्हटले. पण सर्वसामान्य भारतीयांनी मात्र मोदींच्या या कृतीचे स्वागत, समर्थन केल्याचे पाहायला मिळाले. खुर्चीवर बसूनही देशातल्या गोरगरीब-वंचित-पीडितांशी नाळ जोडलेलीच व्यक्ती असे करू शकते, हेही लोकांच्या बोलण्यातून जाणवले.

 

पंतप्रधानांनी पदाची शपथ घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाची, शौचालय उभारणीची घोषणा केली, तेव्हाही स्वतःला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, दीन-दुबळ्यांचे कैवारी वगैरे म्हणवणाऱ्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली होती. शौचालय नसल्याने दररोज कोट्यवधी लोकांना उघड्यावर प्रातर्विधीसाठी जावे लागत असे, त्यातून कितीतरी आजारांचाही प्रसार होई व गरिबांचा पैसाही औषध-उपचारांवरच खर्च होत असे. नरेंद्र मोदींनी याच मुद्द्यांच्या आधारावर स्वच्छ भारत अभियान सुरू केले व देशभरात, शाळा-विद्यालयांत, गाव-खेड्यांत सर्वत्र शौचालयांची निर्मिती केली. परिणामी, आज देशातले बहुतांश जिल्हे उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त झालेले दिसतात. पण, केवळ गरिबांच्या भल्यासाठी काम करण्याचा आव आणणाऱ्यांना हे काही रुचले नाही. म्हणूनच त्यांनी त्यावरही टीकाच केली. आताही मोदींनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले तर विरोधासाठीच विरोध करणाऱ्यांना हा ‘पब्लिसिटी स्टंट’ वाटला. खरेच आहे की, या लोकांना असेच वाटणार! ज्याच्या बुद्धीची झेप जितकी, तितकाच ते विचार करणार! खरे म्हणजे भारतात स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रति लोकांच्या मनात अनादराची भावना असल्याचे पाहायला मिळते. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी सन्मानाने, सौजन्याने बोलावे, असेही कित्येकांना वाटत नाही. गेल्या ७० वर्षांतल्या सत्ताधाऱ्यांचेच हे अपयश, जे की या विषयावर कधी जनजागृती, प्रबोधन करू शकले नाही. आज तेच लोक मोदींवर टीका करताना आढळतात, पण याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या रस्ते मात्र स्वच्छ, नीटनेटके असावे, असे वाटते. नाल्यातला गाळ, कचरापेटीतला कचरा उचललेला असावा, असे वाटते. एखाद्या ठिकाणी तुंबलेले गटार स्वच्छ करण्यासाठी झाकण उघडले तर नाक वाकडे करत तोंडाला रुमाल लावत पळापळी करत तिथून निघून जाणारे हेच लोक असतात. स्वच्छता कर्मचारी मात्र त्याच घाणेरड्या खड्ड्यात उतरून ती जागा साफ करत असतात. म्हणूनच अशाच व्यक्तींचा नरेंद्र मोदींनी सत्कार केला, तर तो टीकेचा विषय कसा असू शकतो? हा प्रश्न उपस्थित होतो. वर्षानुवर्षे एकाच घराण्याच्या चरणाशी लीन होणाऱ्यांकडे मात्र याचे उत्तर असूच शकत नाही.

 

वस्तुतः राष्ट्राचा प्रमुख जेव्हा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतो, तेव्हा ते नाटक नसते, तर ती प्रतिकात्मक कृती असते. देशाचा पंतप्रधान संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याला, प्रयत्नांना समजून घेत आहे व त्यांचे महत्त्व ओळखून गौरव करत आहे, हे सांगणारी ती घटना असते. ज्यांच्यामुळे सतत तीन महिने चालणारा समारंभ अतिशय उत्तमरित्या पार पडला, त्यांच्याप्रति व्यक्त केलेली ती कृतज्ञता असते. विशेष म्हणजे यातूनच सर्वांपुढे एक आदर्श उभा केला जात असतो. आतापर्यंत ज्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिले गेले, तेच देशाला दररोज सुंदर ठेवतात, म्हणून अशा कर्मचाऱ्यांचा आपण आदरच करायला हवा, सन्मान द्यायला हवा, हा संदेश देणारा तो प्रसंग असतो. पण विरोधकांना हे कसे पटेल? गेल्या काही महिन्यांत देश-विदेशातले कोट्यवधी भाविक कुंभमेळ्याला आले, घाण-कचराही करून गेले, पण ती जागा टापटीप ठेवली कोणी, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी. अन् हे न विसरता, ती जाणीव मनात जागृत ठेवून मोदींनी या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले. ही भावना किती उदात्त आणि मनाला सुखावणारी! मात्र, ज्यांची असे काही करण्याची कुवत नसते, ते त्याविरोधातच बडबडणार. देशातली कितीतरी नेतेमंडळी मंदिर, मशीद, दर्गा, चर्च, शाळा, महाविद्यालये, झोपडपट्ट्यांत, शेतात आणि अन्य ठिकाणी जातात, छायाचित्रे काढतात आणि ती छापूनही आणतात. अशा घटनांवर कोणी कधी टीका केल्याचे दिसत नाही. पण, मोदींच्या एका कृतीविरोधात मात्र उतारेच्या उतारे सोशल मीडियातूनही प्रसवले गेले. नरेंद्र मोदींबाबत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. पूर्वोत्तर भारतातील राज्यांचा मोदींनी दौरा केला की, ते तिथल्या जनजातींची परंपरागत पगडी, टोपी, फेटा, कपडे परिधान करताना दिसतात. मोदींच्या अशा सर्वसामान्यांशी जिव्हाळा दाखविणाऱ्या कृत्यावरही टीकाच केली जाते, उपहास उडवला जातो. ज्यांच्यासाठी जिन्स पॅन्ट आणि शर्ट हाच एकमेव ‘ड्रेस’ असतो, तेच लोक असे करतात. विविधतेत एकतेचा संदेश देणारे भारतीयत्व या लोकांना माहितीच नसते. आपापल्या डबक्यातल्या जगण्यालाच ही मंडळी विश्व समजत असतात. मोदींच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाय धुण्याच्या कृत्याची चेष्टा करणारे आणि निरनिराळ्या प्रांताची वेशभूषा करण्यावर जोक, मिम्स पसरविणाऱ्या या लोकांची एकच जातकुळी असते. पण, लोकांचा ओढा मात्र अशा लोकांत मिसळणाऱ्या लोकांच्या पंतप्रधानाकडेच असतो, हे टीका करणाऱ्यांनी विसरू नये. अर्थात ते जरी ही गोष्ट विसरले तरीही हाच चेहरा, हीच व्यक्ती त्यांना यापुढेही दिल्लीत बसलेली पाहायला मिळेल, हे नक्की.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@