हुंडाबळीचे समर्थक पुरोगामी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019   
Total Views |
 
एकदा मुलीचे लग्न लावून दिले, मग तिचे माहेरशी असलेले नाते संपले, ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली धारणा आहे. जन्मापासून मुलीला आपल्या जन्मघरातच पराया धन मानले जाते आणि पुढे कधी तिच्यावर सासरी अन्याय-अत्याचार झाला, तरी जन्मदातेही तिला सबुरीने घेण्याचा सल्ला देत असतात- थोडं सहन कर. हळूहळू स्थिती बदलेल वगैरे. असेच सहन करीत एकेदिवशी त्या सासुरवाशिणीला हुंडा किंवा अन्य कारणासाठी ठारही मारले जाते. त्यानंतर कल्लोळ सुरू होतो. आजच्या जमान्यात असे काही बोलणार्या वा सल्ला देणार्याला प्रतिगामी मानले वा ठरवले जाते. त्या विवाहितेला नवर्याशी वा सासरच्या लोकांशी दोन हात करायला प्रोत्साहन देण्याला पुरोगामी म्हटले जाते. कुठलाही अन्याय सहन करण्याच्या भूमिकेला प्रतिगामी म्हणण्याची फॅशन आपल्याकडे बोकाळली आहे. पण, असेच सामाजिक जीवनात प्रसंग येतात, तेव्हा तशाच पुराणमतवादी भूमिकेत जाणारा पहिला बुद्धिवादी पुरोगामी असतो. हा किती विरोधाभास आहे ना? माहेरचे प्रतिगामी आपल्याच मुलीला काय सल्ले देत असतात? उद्या काय करशील? त्यांनी घरातून हाकलून लावले तर तुझे भविष्य काय? आईबाप आयुष्यभर पुरणारे नाहीत. भाऊ वा वहिनी किती काळ पोसतील? त्यांची मुले पुढल्या काळात काय करतील? अशी भीती घालणारे प्रतिगामी असतात. कारण ते सहन करण्याचे सोशीकतेचे सल्ले देण्यात पुढे असतात. पण, असाच प्रसंग भारतीय समाजाच्या जीवनात पाकिस्तानी वा दहशतवादी संदर्भात आला, मग पुरोगाम्यांचे तेच शौर्य कुठल्या कुठे अस्तंगत होऊन जाते आणि ते भारत सरकार वा भारतीय जनतेला विवाहितेला दिले जाणारे प्रतिगामी सल्ले बुद्धीच्या आवरणात झाकून देऊ लागतात. उरी, पठाणकोट वा आता पुलवामाची घटना घडल्यावरची पुरोगामी भाषा त्या विवाहितेला अन्याय सहन करण्यातले कल्याण सांगणारी नाही काय?
 
 
भारत-पाकिस्तानचा संघर्ष वा विवाद सासुरवाशीण विवाहितेपेक्षा तसूभर वेगळा नाही. सतत या शेजारी देशाने भारताशी कुठलेही कारण नसताना वैर जोपासलेले आहे. कधी अकारण युद्ध पुकारून, तर कधी जिहादी दहशतवादाचा पवित्रा घेऊन. जेव्हा युद्धात भारताशी दोन हात करणे शक्य नसल्याचे जाणवले, तेव्हापासून पाकिस्तानने कायम दहशतवादाचा व घातपाताचा मार्ग पत्करलेला आहे. त्याला युद्धाने संपवणे अशक्य नाही. पण, तसा नुसता विचार सुरू झाला, तरी आपल्याच देशातले पुरोगामी तत्काळ युद्धाचे दुष्परिणाम सांगून भारतीय जनता व सरकारला हतोत्साहित करण्याचा आटापिटा सुरू करतात. थेट पाकिस्तानशी दोन हात करण्यापेक्षा त्या मुजोर देशाला व त्यांच्या भेकड हल्ल्यांना प्रेमाने जवळ करण्याचे सल्ले प्रत्येक वेळी पुरोगामीच देत असतात. त्यातून कधी पाकिस्तान सुधारला नाही, की कुठला मस्तवाल पती सुधारत नसतो. तिथे अशा सोशीक विवाहितेचा बळी जातो. तिला जिवंत जाळले जाते आणि मग कित्येक वर्षे कोर्टात खटले चालूनही ती पुन्हा जिवंत होत नसते. इथे प्रतिवर्षाला शेकडो भारतीय जवान शहीद होत आहेत आणि अधूनमधून काही नागरिकांचाही हकनाक बळी जातो आहे. पण, त्याची वेदना कधीच पुरोगामी चेहर्यावर दिसलेली नाही. उलट सोशीकतेचे सल्ले दिले जातात. मुंबईत बॉम्बस्फोट होवो किंवा कसाबचा हल्ला. त्यानंतर चिडलेल्या मुंबईकरांनी वा भारत सरकारने पाकिस्तानवर हल्ला चढवू नये, याची फिकीर सर्वाधिक पुरोगाम्यांनाच असते. मरणार्या जवान वा भारतीयांच्या जिवापेक्षाही त्यांना आपल्या तथाकथित पुरोगामी अब्रूची अधिक फिकीर असते. जगासमोर आपण उदारमतवादी दिसले पाहिजे, यासाठी अशाच लोकांनी हजारो निरपराध भारतीयांचा बळी घेतला आहे. अन्याय करणारा गुन्हेगार नसतो, इतका अन्याय सोसणारा व त्यासाठी सोशीकतेचे डोस पाजणारा गुन्हेगार असतो. पुरोगामी तसेच भारताचे गुन्हेगार आहेत.
 
मध्यंतरी अशीच स्थिती आली, तेव्हा पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास वा काम करण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी पुढे आलेली होती. तेव्हा राजकारण आणि कला-क्रीडा यांची गल्लत करू नका, असले सल्ले याच दिवट्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या बोलण्यात किंचित तथ्य असते, तरी भारताकडून मानधन घेतलेल्या पाकच्या कलाकार खेळाडूंनी त्यांच्याच देशातल्या दहशतवादी जिहादींचा तिथेही निषेधच केला असता. पण, इम्रानपासून कुठल्या पाक खेळाडूने वा कलाकाराने उरी-पठाणकोटच्या घटनांचा साधा निषेधही केलेला नव्हता. यात नवे काहीच नाही. कुठलाही व्यसनी आक्रमक नाकर्ता नवरा पत्नीला मारहाण केल्याचे दु:ख व्यक्त करीत नसतो. पत्नीला मारहाण करणे, हा त्याला आपला अधिकारच वाटत असतो ना? पाकिस्तानची अवस्था आज त्यापेक्षा किंचितही वेगळी नाही. मुद्दा इतकाच आहे, की पाकशी लढायला आपली सेना सज्ज आहे. सीमेवर किंवा युद्धक्षेत्रामध्ये दहशतवादाला सामोरे जायला आपले जवानही तयार आहेत. सवाल त्यांच्याशी दोन हात करण्याचा नसून, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा आहे. विवाहिता जशी आपल्या बळावर छळवादी सासरशी झुंजत असते, तसे आपले जवान आहेत. पण, माहेरच्यांनी विवाहितेला धीर देणे आणि नैतिक पाठिंब्यासाठी उभे राहणे आवश्यक असते. तिला निराश, हताश करणार्यांना नामोहरम करण्याची जबाबदारी अशा माहेरच्या लोकांची असते. तशीच आपण सामान्य नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य सैनिकांना हतोत्साहित करणार्या पुरोगाम्यांना नामोहरम करण्याची आहे. युद्ध नको, पाकिस्तानला समजून घ्या. पाकिस्तानी कलाकार वा खेळाडूंवर अन्याय नको; असली भाषा इथे बोलणारे आपल्या अस्तनीतले निखारे आहेत. त्यांचा बंदोबस्त आपण करणे भाग आहे. ते काम सरकार किंवा सैनिकांचे नाही. ते पाप आपल्याला नित्यजीवनात निस्तरावे लागणार आहे.
 
युक्तिवाद वा बुद्धिवादाच्या सापळ्यात अडकलेल्या समाजाला त्यातून सोडवण्याचे काम सामान्य नागरिकांचे असते. अशा लोकांना आपल्या जगण्यात प्रतिष्ठित करणे थांबवले पाहिजे. मग तो कोणी महान चित्रपट कलावंत असेल, किंवा क्रिकेटपटू असेल. साहित्यिक वा प्राध्यापक असेल, तर त्याच्या अन्य क्षेत्रातील गुणवत्तेचे कौतुक बाजूला ठेवून, अशा राष्ट्रीय सुरक्षेतली त्याची देशद्रोही ढवळाढवळ आपण रोखली पाहिजे. असे लोक मायावी असतात आणि पुराणातल्या मायावी राक्षसाप्रमाणेच विविध रूपात आपल्यासमोर येत असतात. कधी ते नयनतारा बनून साहित्याच्या क्षेत्रात धुडगूस घालू लागतात, तर कधी अवार्डवापसीचे नाटक रंगवून आपल्याला भ्रमित करीत असतात. अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल पिटून आपली दिशाभूल करीत असतात. इथे त्यांच्या शब्द-वाणीच्या अधिकाराची जपणूक व्हावी म्हणून आकाशपाताळ एक केले जाते. पण, भारतीय सीमेवर भारतीय सैनिकालाही संचारस्वातंत्र्य असते आणि त्याच्या जपणुकीची वेळ आली, मग हे भुरटे पाकिस्तानच्या हल्लेखोरीला खतपाणी घालत असतील, तर आधी अशा गद्दारांचे अविष्कार स्वातंत्र्य संपवले पाहिजे. कारण जे स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्याची गळपेची करण्याला प्रोत्साहन देते, त्याला आधीच संपवले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि त्यातच कला, क्रीडा किंवा अन्य कुठलेही स्वातंत्र्य सामावलेले आहे. जे अन्य स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्याच्या नरडीला नख लावत असेल, आधी त्याचा गळा दाबणे भाग असते. कारण हे युद्ध आहे आणि विद्यमान स्थिती युद्धजन्य आहे. त्यात अगोदर कोण कोणाला मारतो, त्यावर जगण्याच्या स्वातंत्र्याचा निवाडा होत असतो. कारण जगलात तरच पुढली सगळी स्वातंत्र्ये असू शकतात किंवा उपभोगता येत असतात. ज्यांना त्यात गल्लत करायची असते, ते पुरोगामी आणि जिहादी घातपाती यात तसूभर फरक असू शकत नाही. जिहादी घातपाती दूरचा शत्रू असतो आणि असा दिवाळखोर पुरोगामी जवळचा शत्रू झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@