अश्रू होता अनावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |
 


आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जसे व्यक्ती रडून दु:ख व्यक्त करते, तसेच आपल्या घरात नवे बाळ जन्माला आले की आनंदाश्रूसुद्धा येतात. आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जायचे म्हटले तर जसे वियोगाचे अश्रू डोळ्यांत दाटतात, तसेच खूप वर्षांनी आपली आवडती व्यक्ती भेटली की त्या भेटीचे सुंदर क्षण समाधानाने व्यक्त करणारे अश्रू माणसाच्या डोळ्यातच ओघळतात. अशा विविध प्रसंगांतून दिसणारे अश्रू त्याच व्यक्तीच्या डोळ्यांतून वाहतात. पण, त्या अश्रूमागे लपलेल्या विविध भावनांचे मग त्या दु:खी असो वा आनंदी असो, त्यांचे वर्णन करणे हे कौशल्य आहे.

 

आपण आपल्या आयुष्यात कधीतरी रडले असूच. कधीतरी रडलो म्हणून आपण सगळेच काही ‘रडवे’ नसतो. पण, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की, मनाचा बांध फुटतो आणि मग अश्रू अनावर होतात. हुंदका फुटतोच. असे का होते? काहीजण पटकन रडत नाहीत, तर काहीजणांना अगदी छोटीशी दु:खद गोष्ट मग ती दुसऱ्याच्या जीवनातलीअसो, अगदी परक्याच्या जीवनातलीसुद्धाअसो, ती ऐकली की रडू कोसळतेच. अर्थात, दोन्ही बाजूंचा तसा विचार करण्यासारखा आहेच. जेव्हा इतरांना रडू आवरत नाही, तेव्हा एखाद्याला रडू कसे येत नाही किंवा काहीजणांना छोट्या छोट्या कारणांनीसुद्धा रडू कसे येते?

 

आपण इतरांपेक्षा थोडे जास्त रडतो तेव्हा ‘असे का?’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे व तो समजून घ्यायला हवा. अर्थात, जगात असे काही नियम नाहीत कीआपण किती वेळा रडतो म्हणजे ते ‘जास्त वेळा’ म्हणून ठरविता येईल. बरं एका वेळी आपण साधारण किती मिनिटे रडलो म्हणजे ते जास्त रडणे होते, याचे काही ढोबळ नियम नसतात. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांच्या तुलनेत आपण व्यक्तीच्या वागण्या-चालण्याची नियमितता ठरवतो. रडणे हे त्यापैकी एक आहे. असे पाहिले तर असे म्हणतात की, रडण्यामुळे मन मोळळे होते. रडल्यानंतर आपण आयुष्यातील कठीण प्रसंगांना व्यवस्थित हाताळतो. मनावरचा भावनिक दबाव रडल्यामुळे थोडासा कमी होतो व व्यक्ती मग त्या त्या कठीण समस्येचे विश्लेषण शांतपणे करू शकतेआता ‘रडायला येणे’ ही आपल्या मनातली प्रक्रिया आहे. मग अश्रू कुठे आणि कसे निर्माण होतात? याची कारणे जीवशास्त्रानुसार समजली पाहिजे. ‘लॅक्रीमल’ म्हणून ज्या ग्रंथी डोळ्यांमध्ये असतात, तेथून अश्रू उत्पन्न होतात. आज अश्रूंची शारीरिक वा मानसिक कारणे यावर इतके संशोधन झालेले नाही.

 

रडल्यामुळे आपल्या मनाला खूप बरे वाटते वा रिलॅक्स वाटते. हे तसे पूर्ण खरे नाही. काहींना रडल्यामुळे त्यांचा मूड बरा झाला वा चिंता कमी झाली असे अनुभव येतात. पण, जेव्हा विपरित परिस्थितीत सुहृदयांचा आधार मिळत होता, रडल्यानंतर सकारात्मक अनुभव वाटत होता, रडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला आपल्या भावना समजून घेता आपल्यामुळे रडण्याच्या ओघात आपण आपल्या समस्या कशा सोडवाव्यात, या प्रश्नाकडे लक्ष दिले होते किंवा रडण्यामुळे इतरांनासुद्धा तुमची समस्या समजावी व मदतीचा हात त्यांनी दिला होता, तर अशावेळीरडल्यानंतर मन शांत झाले, असे वाटू शकते. थोडक्यात काय, रडण्याची काही कारणे असतात व त्याचे काही खास परिणामही असतात. काही मानसिक आजारांत नैराश्य किंवा चिंतेच्या आजारांत लोकांना वारंवार रडायला येते असे दिसते. त्यांनाही कळत नाही की, आपल्याला असे वारंवार रडू का येते? पण, मानसिक रोग जर रडण्याचे कारण असेल, तर योग्य वैद्यकीय किंवा मानसिक उपचार पद्धती त्या व्यक्तीला देणे आवश्यक आहे. जसा रोग नियंत्रणात येतो, तसे रडणेही थांबते.

 

शिवाय आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांत रडायला येणे हे प्रसंगानुरूप मानले आहे. अगदी माणसांशिवाय इतर प्राणिमात्रांच्या डोळ्यांतूनसुद्धा दु:खाचे अश्रू येतात. पण, माणसांकडे रडण्यातून आपला तणाव व दु:ख प्रकट करण्याची सवय जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जसे व्यक्ती रडून दु:ख व्यक्त करते, तसेच आपल्या घरात नवे बाळ जन्माला आले की आनंदाश्रूसुद्धा येतात. आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जायचे म्हटले तर जसे वियोगाचे अश्रू डोळ्यांत दाटतात, तसेच खूप वर्षांनी आपली आवडती व्यक्ती भेटली की त्या भेटीचे सुंदर क्षण समाधानाने व्यक्त करणारे अश्रू माणसाच्या डोळ्यातच ओघळतात. अशा विविध प्रसंगांतून दिसणारे अश्रू त्याच व्यक्तीच्या डोळ्यांतून वाहतात. पण, त्या अश्रूमागे लपलेल्या विविध भावनांचे मग त्या दु:खी असो वा आनंदी असो, त्यांचे वर्णन करणे हे कौशल्य आहे. कदाचित या रडण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या शब्दांत व्यक्त न करता येणाऱ्या भावना अश्रूंच्या रुपाने म्हणा किंवा रुदनाच्या वैशिष्ट्यपूर्ण नादाने म्हणा, पण व्यक्त करू शकतो.

 

- डॉ. शुभांगी पारकर

(क्रमश:)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@