होमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग-१०)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |
 


होमियोपॅथीक तपासणी करताना रुग्ण जर पुरुष, स्त्री किंवा एखादे लहान मूल असेल, तर त्यानुसारच तपासणीचा आराखडा ठरवण्यात येतो. रुग्णाला माहितीसाठी विचारले जाणारे प्रश्न हे त्याचप्रमाणे निश्चित केले जातात.

 

प्रत्येक रुग्णाच्या तत्कालीन माहितीनुसार, मग या प्रश्नांमध्ये बदलही करता येतो. रुग्ण जर स्त्री असेल, तर स्त्रीच्या आरोग्यविषयक व इतर लक्षणांची माहिती घेताना नैसर्गिक स्रावामध्ये मासिक स्राव किंवा मासिक पाळी याविषयी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये मासिक पाळी नियमित असणे हे एक चांगले लक्षण असते. मासिक पाळीमुळे शरीरातील संप्रेरकांमध्ये व्यवस्थित समतोल (Hormonal balance) साधला जातो. मासिक पाळी चालू होत असताना किंवा नंतरही शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. हे बदल स्त्रियांच्या मानसिक पातळीवरही होतात. या बदलांमध्ये स्त्रियांच्या मनात भावनिक पातळीवर बदल होतात आणि हे होणारे बदल जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. मासिक पाळीबद्दल माहिती देताना काही स्त्रीरुग्ण संकोचतात. हे संकोचणे स्वाभाविक आहे. परंतु, आरोग्यविषयक व आजारांच्या विषयी योग्य ती माहिती जर डॉक्टरांना दिली, तर त्यातून आजाराचे योग्य निदान करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच अशा विशेष लक्षणांमुळे होमियोपॅथीचे औषध शोधण्यासही मदत होते. मासिक स्रावाबद्दल माहिती घेताना खालील माहिती घेणे उपयुक्त ठरते.

 

मुलींना होणारी ऋतुप्राप्ती व वयात येताना त्यांच्या शरीरात व मनात होणारे बदल हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ऋतुप्राप्ती ही शरीरात होणाऱ्या अनेक सांप्रेरिक (Hormonal), शारीरिक व मानसिक बदलांची शृंखला आहे. या बदलांच्या वेळेस मुलींना विशेष सांभाळावे लागते. शरीरात व मनात होणाऱ्या बदलांमुळे मुली थोड्या भांबावतात, संकोच करतात, घाबरतात व लाजतात. परंतु, त्याच वेळी योग्य माहिती, मार्गदर्शन केल्यास आणि आधार दिल्यास त्यांना आयुष्याच्या या महत्त्वपूर्ण बदलांबद्दल खरी माहिती मिळते व ते हा बदल अतिशय सकारात्मकदृष्ट्या स्वीकारतात.

 

ऋतुप्राप्तीच्या वेळेस होणारे हे बदल होमियोपॅथीक चिकित्सक बारकाईने नोंदवून घेतात व त्याप्रमाणे रुग्णाला मदत करतात. उदा. एखादी मुलगी ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनाक्षम असते, अशा मुलींना ऋतुप्राप्तीच्या वेळेस फार त्रास होतो. त्यांना भीती वाटू शकते. सतत रडावेसे वाटते. सततची चिडचिड होणे किंवा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे भांबावून जाणे इ. मानसिक लक्षणे दिसून येतात. अशावेळी ही लक्षणे केस टेकिंगच्या माध्यमातून माहिती करून घेतली जातात. केस टेकिंग हे नुसते माहिती घेण्याचे साधन नाही, तर रुग्णाला त्याचे म्हणणे संपूर्णपणे सांगण्याची मुभा आहे व फक्त होमियोपॅथीकतज्ज्ञच इतक्या सर्व गोष्टी बारकाईने पाहातात. रुग्णाची समस्या जाणून घेतली जाते व ऋतुप्राप्तीच्या वेळेस होणाऱ्या बदलांसाठी मुलींना व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. आयुष्याच्या नवीन पर्वासाठी या वयात येणाऱ्या मुलींना तयार करून योग्य दिशा दाखवली जाते. होमियोपॅथीच्या उपचारांमुळे आजपर्यंत अशा अनेक मुलींची जीवनशैली सुधारली आहे, शिवाय चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या मुलींचेही आयुष्य सुधारले आहे. पुढील भागात केस टेकिंगबद्दल अजून माहिती पाहू.  

                                                                                    (क्रमश:)
 

- डॉ. मंदार पाटकर

 (लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@