...म्हणून शिक्षक उपेक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 
गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मागील काही वर्षे प्रशासनावर मजबूत पकड ठेवली आणि परिणामी सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेत प्रशासकीय कामे सुरू होती. परंतु, सत्ताधाऱ्यांची ही मूठ हळूहळू सैल झाल्याने त्यांचा वचकही दिवसेंदिवस कमी होत चाललेला दिसतो. पूर्वी प्रशासनाकडून जे मागितले जात होते, ते सत्ताधाऱ्यांना सहज उपलब्ध होत होते; अन्यथा कायद्याच्या चौकटीत राहून ते हक्काने मिळवून घेण्याचे कसब सत्ताधाऱ्यांकडे होते. विरोधकांचा दराराही तेवढाच होता. परंतु, ही परिस्थिती आता बदलली आहे. जेवढे मिळेल तेवढेच पदरात पाडून घेण्यावर आता नगरसेवक धन्यता मानू लागले लागले आहेत. पण, सत्ताधाऱ्यांच्या अंगवळणी पडलेल्या या वृत्तीमुळे बेस्टपासून आरोग्य सेविका, शिक्षक, सफाई कामगारांचे नुकसान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतील विनाअनुदानित शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना वाढीव अनुदान मिळावे, या मागणीसाठी ते गेले १२ दिवस आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. महापालिकेच्या वैधानिक समित्यांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवला. शिक्षण समिती अध्यक्षांनी तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाची धमकी दिली. सर्वपक्षीय नेत्यांनी गाजावाजा करून शिक्षकांना न्याय देणार, असा डंकाही वाजवला. पण, आयुक्तांनी निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळी कोणत्याच राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता शिक्षकांना राज्य शासनाचे दरवाजे ठोठावण्यास सांगितले. विकासकामांच्या निधीतही अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून देण्यास आयुक्तांनी नकार दिला. मागील तीन वर्षांपासून सत्ताधारी शिवसेनेला आयुक्तांनी जेरीस आणले आहे. मग बेस्ट विलीनीकरणाचा प्रस्ताव असो किंवा कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न असो, शिवसेनेचे अनेक मुद्दे आयुक्तांनी कायद्याच्या कचाट्यात बंदिस्त करून ठेवले आहेत. बेस्ट कामगारांच्या नऊ दिवसांच्या संपात तर शिवसेना कामगार संघटनेतच फूट पडली होती. आयुक्तांच्या हेकेखोर वृत्तीमुळे शिवसेनेत खदखद वाढली. आयुक्तांच्या वाढत्या अडेलतट्टू भूमिकेच्या निषेधार्थ शिवसेनेने विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा महापालिका सभागृहात हरकतीचा मुद्दा उपस्थित करून कार्यपद्धतीवर टीका केली. परंतु, प्रशासनाची भूमिका जाणून न घेताच, लोकप्रतिनिधींनी झटपट सभा तहकूब करून निषेध व्यक्त केल्याचा आव आणत पळ काढला. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शिक्षक मात्र उपेक्षित राहिले.
 

कणखर नेतृत्वाची गरज

 

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कामकाजामध्ये प्रश्न विचारून प्रशासनाला अडचणीत आणणारे आणि प्रशासनावर आपला वचक निर्माण करणारे अनेक नगरसेवक होऊन गेले. किंबहुना, दहा वर्षांपूर्वी प्रश्नोत्तरांची माहिती ही अनेकदा कार्यपत्रिकेपेक्षा मोठी असायची. इतकेच नव्हे तर प्रश्न विचारण्याची संधी मिळावी म्हणून कार्यपत्रिकेवरील एखादा विषय प्रलंबित ठेवून ती सभा तहकूब करण्याची विनंती संबंधित नगरसेवक करायचे. महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या. पण, सध्या पालिकेच्या सभेचे कामकाज चालविण्यापेक्षा इतर कामांनाच नगरसेवक जास्त महत्त्व देत असल्याचे दिसून येते. त्यातून प्रश्नोत्तरे करून कोणाचा फायदा होणार, असाही भाव असतो. त्यामुळे अनेक सर्वसाधारण सभांमधून प्रश्नोत्तरे वगळण्यातच येतात. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेच मिळत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर प्रश्न विचारण्याचाही उत्साह संपतो आणि प्रमाण कमी व्हायला लागते. याचबरोबर पालिका आयुक्त आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनाही पालिकेची सर्वसाधारण सभा हा कामाचा अपव्यय वाटतो. आता मात्र महापालिकेचा कारभारच विचित्र पद्धतीने चालतो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी ६६ ब, ६६ क, सभा तहकुबी, विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनासाठी अगदी मोजका वेळ देण्यात येतो. त्यामध्ये संबंधित नगरसेवकाने शहराच्या किंवा त्याच्या भागाशी संबंधित अतिशय तातडीचा प्रश्न उपस्थित करायचा आणि प्रशासनाने त्याला उत्तर द्यायचे एवढेच अपेक्षित असते. परंतु, अतिरिक्त आयुक्तांमार्फत प्रशासन खुलासा करते. अनेकदा आयुक्तांना बोलाविण्याची मागणी केल्यानंतरही आयुक्त कामात असल्याचे सांगण्यात येते. पूर्वीचे नगरसेवक सभागृहात आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत सभा किंवा भाषण सुरू करत नव्हते. महिन्याला महापालिकेची सभा पाच ते सहा दिवस चालायची. त्यामध्ये दररोज प्रश्नोत्तरे व्हायची. नगरसेवकांची भूमिका स्पष्ट करणारी भाषणे व्हायची. त्यातून लोकशाहीला आवश्यक असलेले नेते घडायचे. आता महिन्यातून दोन दिवसच सभा होते. परंतु, आताचे नगरसेवक प्रशासनावर वचक ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे प्रशासन जुमानत नाही. प्रशासनावर सत्ताधारी म्हणून वचक ठेवायचा झाल्यास पालिकेत कणखर नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे.

- नितीन जगताप
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@