फक्रुद्दीन अहमद ते नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
काँग्रेसकाळात देशाच्या एका मंत्र्याला पाकिस्तानच्या विरोधावरून आंतरराष्ट्रीय परिषदेतून परत यावे लागले, तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्याच परिषदेत भारताला ‘गेस्ट ऑफ ऑनर’ने सन्मानित करणार असल्याचेही सांगितले गेले. देशाला सर्वोच्चपदी घेऊन जाण्याच्या ध्येयाने झपाटलेली व्यक्ती नेमके काय करू शकते, काय घडवू शकते, त्याचा हा वस्तुपाठच!
 

जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी संघटनेच्या जिहाद्याने पुलवामात आत्मघाती हल्ला करून भारताच्या ४० पेक्षा अधिक सैनिकांचा बळी घेतला. काश्मिरातील या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतातून पाकिस्तानविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आणि ‘जित्याची खोड मरेल’ असा बदला घेण्याची मागणी होऊ लागली. देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या भावनांशी तादात्म्य पावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तुमच्या मनातल्यासारखीच आग माझ्याही मनात पेटल्याचे स्पष्ट करत पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा दिला. देशात एका बाजूला सत्ताधारी आणि जनतेचे शब्द एकसारखेच घुमू लागलेले असतानाच जागतिक पातळीवरही पुलवामा घटनेचे पडसाद उमटले. इस्रायल, रशिया, अमेरिका, जपान, फ्रान्स, इराण आदी देशांनी भारताच्या बाजूने उभे राहत दहशतवादाविरोधात कंबर कसण्याला प्राधान्य दिले. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात खोडा घालणाऱ्या चीनलादेखील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ जारी केलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करावी लागली. महत्त्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दिलेल्या निवेदनात जैश-ए-मोहम्मदच्या नावाचादेखील थेट उल्लेख केला गेला. सुरुवातीला पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यानंतर भारताविरोधात बोंबा मारत संयुक्त राष्ट्रांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आणि चीननेही आपल्या जवळच्या यारासाठी आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले. मात्र, भारताचे जागतिक स्तरावरील स्थान आणि महत्त्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन्ही देशांच्या भूमिकेकडे फारसे लक्ष न देता दहशतवाद आणि जैश-ए-मोहम्मदविरोधातच मत मांडले. परिणामी चीनलाही पाकिस्तानला पाठीशी घालण्याऐवजी सदर निवेदनावर स्वाक्षरी करावी लागली व हे निवेदन १५ पैकी १५ देशांच्या सहमतीने प्रसिद्ध करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती भारताला अनुकूल असल्याचेच या सगळ्या घटनाक्रमातून स्पष्ट होते.

 

दुसऱ्या बाजूला, पुलवामात दहशतवादी हल्ला झाला, त्याचवेळी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी आपला नियोजित पाकिस्तान दौरा एक दिवस पुढे ढकलला. पुढे ते पाकिस्तानात गेलेही आणि २० अब्ज डॉलर्सच्या सहकार्याचे आश्वासनही सलमान यांनी इमरान खान यांना दिले. सर्व काही ठरल्याप्रकारे पार पडले असते तर युवराज मोहम्मद पाकिस्तानातूनच भारतात येणार होते, पण पुलवामातील हल्ल्यामुळे भारताने नापाक इस्लामाबादेतून थेट दिल्लीत पाऊल ठेवण्यावर आक्षेप घेतला व सलमान यांना पुन्हा रियाधला जावे लागले. तद्नंतर सौदीच्या युवराजांनी स्वदेशातूनच भारतात प्रवेश केला. भारताची उर्जेची आणि तेलाची निकड सर्वश्रुतच आहे. ही गरज भागवण्यासाठी आपण सौदीकडून मोठ्या प्रमाणात तेलदेखील आयात करतो. सोबतच लाखो भारतीय कामगारही सौदी अरेबियासह आखाती देशात कार्यरत आहेत. असे असतानाही पाकिस्तानसारख्या इस्लामिक देशाला भेट दिल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेचा विरोध न करता बिन सलमान यांनी रियाधमार्गे येण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने ‘मी नाही त्यातला’ म्हणत स्वतःलाच दहशतवादग्रस्त असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानच्या कोणत्याही थापेबाजीला न भुलता सौदी अरेबियाने कोणाचेही नाव न घेता दहशतवादाविरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आणि भारतातही तसेच सांगितले. सोबतच भारतात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यासंबंधीचे करारही केले. इतकेच नव्हे तर जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही इस्लामिक देशाने किंवाऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज-ओआयसी’च्या सदस्यांनीही पाकिस्तानची बाजू घेतली नाही. उलट पुढच्या आठवड्यात भारताला संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या परिषदेवेळी ‘गेस्ट ऑफ ऑनर’ पुरस्कार देण्याचे जाहीर केले. हे कसे झाले?

 

इथे इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असतानाचा एक किस्सा सांगणे गरजेचे वाटते. १९६९ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री फक्रुद्दीन अली अहमद यांना ‘ओआयसी’ सदस्य देशांच्या मंत्रीस्तरावरील परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारतातील मुस्लिमांच्या मतांसाठी प्रारंभापासून झोळी घेऊन उभ्या असलेल्या काँग्रेसने फक्रुद्दीन अली अहमद यांना मोरोक्कोची राजधानी रब्बात येथील परिषदेसाठी धाडलेही. मात्र, जन्मापासूनच भारताशी शेपूट वाकडे करून वागणाऱ्या पाकिस्तानने अहमद पर्यायाने भारताच्या सहभागाला विरोध केला. इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या याह्या खान या अध्यक्षाने अहमद रब्बातमध्ये जेथे उतरले तेथे धरणेही दिले. परिणामी ५६ इस्लामिक देशांच्या ‘ओआयसी’ या समूहाने पाकिस्तानची कड घेत फक्रुद्दीन अली अहमद यांना माघारी जाण्यास सांगितले. ही घटना आजच्या भारतीय नेतृत्वाचा व राजनीतीचा, धोरणांचा विचार करता महत्त्वाची ठरते. आज ५० वर्षांपूर्वीची आणि ५० वर्षानंतरची, अशा दोन्ही घटना आपल्यासमोर आहेत. काँग्रेसच्या काळात देशाच्या एका मंत्र्याला पाकिस्तानच्या विरोधावरून आंतरराष्ट्रीय परिषदेतून परत यावे लागले, तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्याच परिषदेत सुषमा स्वराज यांना भारताच्या प्रतिनिधीच्या रूपात पाचारण करण्यात आले वगेस्ट ऑफ ऑनर’ने सन्मानित करणार असल्याचेही सांगितले गेले. देशाला सर्वोच्चपदी घेऊन जाण्याच्या ध्येयाने झपाटलेली व्यक्ती नेमके काय करू शकते, कसे राजकारण करू शकते, कसे देशोदेशांशी संबंध प्रस्थापित करू शकते आणि काय घडवू शकते, त्याचा हा वस्तुपाठच! विशेष म्हणजे या सर्व घटना घडल्या, त्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. स्वतःला दहशतवादाने पीडित असल्याचे कानीकपाळी ओरडून सांगत असला तरी जगातल्या ५६ इस्लामी देशांना भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा देण्याची आवश्यकता वाटली नाही. सौदी अरेबियाच्या युवराजांना भारताशी संबंध सुरळीत चालू ठेवण्यातच शहाणपण असल्याचे पटले. यामागे तेलाची बाजारपेठ ही कारणे तर आहेतच, पण नरेंद्र मोदींच्या प्रभावी मुत्सद्देगिरीचाही हा लाजवाब दाखला आहे. म्हणूनच संयुक्त अरब अमिरातीला अबुधाबी येथे हिंदू मंदिरनिर्मितीला परवानगी देण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूमिपूजनासाठी बोलावण्याचेही सुचले होतेच.

 

आज मोदीविरोधासाठी कोणत्याही मुद्द्याचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या काँग्रेसादी पक्षांना मात्र हे समजणारही नाही किंवा समजले तरी ते मान्य करण्याची त्यांची तयारी नसेल. कारण स्वार्थी राजकारणात गुरफटलेल्या या लोकांची तितकी पात्रताच नाही. पण देशातल्या तमाम सर्वसामान्यांना मोदींच्या कार्यकाळात जगभरात वाढलेली भारताची प्रतिष्ठा पाहायला मिळत आहे आणि अनुभवताही येत आहे. म्हणूनच आगामी काळातही हेच देशाला पुढे नेण्याचे कार्य आणखी जोमाने करण्याचा निर्धार देशातली हीच जनता करेल, हे नक्की!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@